ग्रामपंचायत कार्यालयात घुसून तोडफोड

नायक वृत्तसेवा, देवळाली प्रवरा 
घरकुल मंजूर झालेले असून, त्याचे काम सुरू करायचे आहे, असा आग्रह धरत म्हैसगाव ग्रामपंचायत कार्यालयात घुसून तोडफोड केल्याप्रकरणी दोन जणांविरुद्ध राहुरी पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला.
राहुरी तालुक्यातील म्हैसगाव ग्रामपंचायतीचे पाणीपुरवठा कर्मचारी कैलास शिवराम केदार यांनी राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.  शिवाजी बाळा गागरे व पोपट नामदेव विधाटे हे ग्रामपंचायत कार्यालयात आले. त्यांनी केदार यांना आमचे घरकुल मंजूर झाले आहे, त्याचे काम सुरू करायचे असल्याचे सांगितले. त्यावर केदार यांनी ग्रामसेवक भाऊसाहेब आले, की त्यांच्याशी बोला, माझा त्याच्याशी काहीही संबंध नाही, असे सांगून ते ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप लावून सरपंच सुजाता अरुण पवार यांच्या घरी ग्रामपंचायतीच्या हजेरीपत्रावर सही घेण्यासाठी गेले.त्यानंतर काही वेळातच केदार पुन्हा ग्रामपंचायत कार्यालयात परत आले असता, दोन्ही आरोपींनी ग्रामपंचायत कार्यालयाच्या दरवाजावर दगडफेक करून नुकसान केल्याचे दिसले. याप्रकरणी कैलास केदार यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिसांनी शिवाजी बाळा गागरे व पोपट नामदेव विधाटे (दोघेही रा. म्हैसगाव, ता. राहुरी) यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार रामनाथ सानप करत आहेत.
Visits: 145 Today: 1 Total: 2060195

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *