चर्चेच्या बहाण्याने बोलावून तरुणावर टोळक्याचा खुनी हल्ला! महिलेला फोन केल्याचा जाब विचारला; पंचवीस जणांच्या टोळक्याकडून दहशती कृत्य..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचे अक्षरशः धिंडवडे निघाले असून, मंगळवारी रात्री समनापूर चौफुली परिसरात एका तरुणावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. महिलेला वारंवार फोन करुन त्रास देणार्‍या तरुणाला केवळ जाब विचारला, या रागातून आरोपीने आपल्या 20 ते 25 साथीदारांसह ‘त्या’ तरुणासह त्याच्या चौघा नातेवाईकांवर लोखंडी रॉड, चाकू आणि स्क्रू ड्रायव्हरसारख्या जीवघेण्या शस्त्राने हल्ला चढवला. या रक्तरंजित संघर्षात 28 वर्षीय शेख मुजम्मील हा तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याच्या शरीरावर चाकूचे सहा ते सात खोलवर वार झाले आहेत. ‘चर्चेला या’ असे सांगून आरोपीने जखमी तरुणाला मृत्यूच्या सापळ्यात ओढण्याचा प्रयत्न केल्याचे या घटनेतून समोर आले आहे. या प्रकाराने परिसरात काहीकाळ तणावाचे वातावरणही निर्माण झाले होते.


या धक्कादायक घटनेची सविस्तर पार्श्वभूमी अशी की, आरोपी जुनेद शेख हा जखमी झालेल्या तरुणाच्या घरातील एका महिलेला वारंवार मोबाईलवरुन फोन करीत मानसिक त्रास देत होता. या छळाबाबत विचारणा करण्यासाठी मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाने जुनेदला संपर्क केला असता, त्याने कमालीचा उर्मटपणा दाखवत ‘समोरासमोर येऊन बोला’ असे आव्हानच त्याला दिले. त्यावर कुठे भेटू? असा प्रतिसवाल विचारला गेला असता त्याला मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास समनापूर चौफुली येथील महिंद्रा शोरुमसमोर बोलावण्यात आले. यावेळी वाद मिटवण्याच्या उद्देशाने मुज्जमील शेख आपल्या चार नातेवाईक मित्रांसह घटनास्थळी पोहोचला.


मात्र, आरोपी जुनेदने आधीच ‘त्या’ परिसरात मोठ्या टोळक्याला घातक शस्त्रांसह दबा धरुन बसवले होते. या प्रकरणातील जखमी व त्याचे सोबती गाडीवरुन उतरताच, दबा धरुन बसलेल्या या 20 ते 25 जणांच्या झुंडीने त्यांच्यावर अचानक हल्ला चढवला. संबंधिताने चर्चेच्या बहाण्याने त्यांना बोलावले असल्याने मुज्जमीलसह पाचहीजण बेसावधत स्थितीत तेथे गेले होते, मात्र आरोपींच्या मनात वेगळेच काही असल्याने त्यांनी ही मंडळीे घटनास्थळी येताच ठरल्याप्रमाणे त्यांच्यावर हल्ला करुन पाचहीजणांना बेदम मारहाण केली.


या घटनेत हल्लेखोरांनी मुजम्मील शेख याला लक्ष्य करत त्याच्यावर चाकू, टॉमी आणि लोखंडी रॉडने एकामागून एक प्रहार करण्यास सुरुवात केली. या धुमश्‍चक्रीत मुजम्मीलच्या अंगावर ठिकठिकाणी चाकूचे वार झाल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. इतर चार जणांनाही किरकोळ दुखापत झाली आहे. घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली. जखमीला तातडीने शहरातील कुटे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या मुजम्मीलची प्रकृती चिंताजनक असून तो सध्या शुद्धीवर नसल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. रुग्णालयात दाखल असलेला मुज्जमील शेख हा तरुण सध्या जबाब देण्याच्या स्थितीत नसल्याने या प्रकरणाची अद्याप पोलीस दप्तरी नोंद झालेली नाही, परंतु या घटनेने मात्र संपूर्ण शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


संगमनेरमधील ही घटना केवळ एकाच समाजील दोन गटांतील वाद नसून, गुन्हेगारांच्या वाढलेल्या हिंमतीचे दर्शन घडवणारी आहे. एखाद्याला चर्चेच्या बहाण्याने बोलावून त्याच्यावर 20 ते 25 जणांनी तुटून पडणे, हे पूर्वयोजनेशिवाय शक्य नाही. मोबाईलवरुन होणार्‍या त्रासामुळे उद्भवलेले हे प्रकरण आता एका तरुणाच्या जीवावर बेतले आहे. जेव्हा कोणी समाजकंटक कायदे हातात घेतात आणि भररस्त्यात धारदार शस्त्रे घेऊन फिरतात, तेव्हा सर्वसामान्य नागरिकांची सुरक्षितता वार्‍यावर असल्याचे स्पष्ट होते. पोलीस प्रशासनाने या प्रकरणातील मुख्य सूत्रधारासह त्या 20-25 जणांच्या टोळक्याचा तातडीने छडा लावणे गरजेचे आहे. गुन्हेगारांना राजकीय किंवा सामाजिक आश्रय मिळत असल्यास, अशा प्रवृत्ती अधिक बळावतात. त्यामुळेच, पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी आणि शहरात शांतता प्रस्थापित करण्यासाठी कठोर कारवाईची गरज आहे.


एखाद्या विवाहित महिलेला नाहक वारंवार मोबाईलवर फोन करुन तिच्याशी संवाद साधण्याचा अश्‍लाघ्य प्रयत्न करणार्‍याला त्याचा जाब विचारणार्‍यांनाच मारहाण करण्याचा हा प्रकार अतिशय गंभीर असून त्यातून कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत. अतिशय वर्दळीच्या रस्त्यावर तक्रारदाराला बोलावून अशाप्रकारे 20 ते 25 जणांनी सशस्त्र दहशत निर्माण करण्याचा हा प्रकार संगमनेरसारख्या शांततापिय शहराच्या ससामाजिक स्वास्थासाठी घातक असून पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेवून आरोपींना कठोर शासन करण्याची आवश्यकता आहे. या घटनेत जखमी झालेल्या मुजम्मील शेखची प्रकृती गंभीर असल्याने पोलिसांनी अद्याप त्याचा जवाब नोंदवलेला नाही, त्यामुळे या प्रकरणी अद्याप पोलीस दप्तरी कोणतीही नोंदही झालेली नाही.

Visits: 36 Today: 36 Total: 1761744

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *