‘त्या’ कॅफे हाऊसवर कारवाई मग बाकीच्या ठिकाणांचे काय? अवघ्या साडेतीनशे रुपयांत अत्याचार; बेकायदा कंपार्टमेंट उध्वस्त करण्याची मागणी..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या आठवड्यात संगमनेर शहरातील अकोले बाह्यवळण रस्त्यावर असलेल्या एँजल कॅफे हाऊस याठिकाणी पठारावरील एका साडेचौदा वर्ष वयाच्या मुलीवर अत्याचार झाला होता. यप्रकरणी पोलिसांनी अत्याचार करणार्‍यासह त्याला साथ देणार्‍या व सदरील कॅफे हाऊसचा मालक आणि चालक अशा एकूण सहा जणांवर गुन्हे दाखल करीत त्यांना अटक केली. पोलिसांनी पहिल्यांदाच अशा कृत्यांना जबाबदार धरुन कॅफे हाऊसच्या चालक-मालकावर कारवाई केल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त झाले. मात्र त्यातून फारकाही साधलं गेल्याचं दिसत नसून कॉफीच्या गोंडस नावाने अश्लील कृत्य करणार्‍या शहरातील अशा काही अन्य ठिकाणी अश्लिलतेचा नंगानाच आजही सुरुच आहे. पोलिसांनी सामाजिक बांधिलकी म्हणून अशा ठिकाणांची कडक तपासणी करुन बेकायदा उभारण्यात आलेले कंपार्टमेंट (कप्पे) उध्वस्त करावेत व प्रत्येक कॅफे हाऊसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे बंधन घालावे अशी मागणी आता पालकवर्गातून समोर येत आहे.

पठारभागातील एका अल्पवयीन मुलीला देवदर्शनाचे आमिष दाखवून थेट संगमनेरातील एँजल कॅफे हाऊस या वरकरणी चहा, कॉफी व स्नॅस मिळणार्‍या ठिकाणी गणेश सुखदेव भडांगे (वय २१, रा.शेंडेवाडी) याने अत्याचार केला होता. सदरील प्रकाराची तक्रार दाखल झाल्यानंतर दबंग पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी केवळ अत्याचार करणार्‍यावर कारवाईचे सोपस्कार उरकण्याऐवजी असा प्रकार करण्यास आरोपीला मदत करणारे त्याचे दोन मित्र विशाल खेमनर व अक्षय जाधव यांच्यासह एँजल कॅफे हाऊसचा जागामालक मिलिंद भारत ताजणे (वय ३४, रा.विठ्ठलनगर), कॅफेचे चालक स्वयंम हेमंत पंधारे (वय २३, रा.मालदाड रोड) व प्रवीण काशिनाथ कोठवळ (वय २७, रा.महालवाडी) अशा एकूण सहा जणांवर गुन्हे दाखल करीत त्यांना अटक केली.

अलिकडच्या काळात अशाप्रकारचे अश्लील कृत्य करण्यासाठी संगमनेर शहरातील प्रमुख महाविद्यालयांचे परिसर व आडवळणाला काहींनी ‘कॅफे हाऊस’ अशा गोंडस नावाने अड्डे तयार केले आहेत. शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींची येथे नेहमीच वर्दळही बघायला मिळते. अशा ठिकाणी विद्यार्थिनींना नासवण्याचे प्रकार चालविले जातात. याबाबत यापूर्वीही माध्यमांनी आवाज उठवला आहे. मात्र पोलिसांनी थातूरमातूर कारवाई करीत प्रत्येकवेळी वेळ मारुन नेण्याचाच कार्यक्रम केल्याचेही वास्तव आहे. त्यातच मध्यंतरी पोलिसांकडे दाखल एका प्रकरणात संबंधित मुलीवर घुलेवाडीतील एका अशाच ‘कॅफे हाऊस‘मध्ये अत्याचार झाल्याचे तिच्या जवाबातून समोर येवूनही पोलिसांनी त्या प्रकरणात कॅफे चालक व मालकाला आरोपी केले नव्हते. त्यावरुन अशा ठिकाणांना पोलिसांचेच बळ असल्याचे दिसत असताना गेल्या आठवड्यात एँजल कॅफे हाऊसचा विषय समोर आला.

यावेळी मात्र पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी कठोर भूमिका घेताना केवळ अत्याचार करणारा आरोपीच नव्हेतर त्याला साथ देणारे आणि अत्याचार करण्यासाठी जागा उपलब्ध करुन देणारेही कायद्याच्या कक्षेत घेतले आणि त्यांना कारागृहाची सफर घडवली. या कारवाईने काही दिवस शहरातील अशी अश्लील ठिकाणं कडकडीत बंदही राहिली. मात्र आता हळूहळू त्यांचे शटर पुन्हा वर होवू लागले असून यातील बहुतेक ठिकाणी विद्यार्थिनी व विद्यार्थ्यांची वर्दळ पुन्हा वाढू लागली आहे. या प्रकरणाची उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी गांभीर्याने दखल घेण्याची अपेक्षा पालकांना असून अशा अश्लील कृत्य करण्यास प्रेरीत करणार्‍या ठिकाणी असलेली कंपार्टमेंट (कप्पे) काढून टाकण्याची व आत आणि बाहेर अशा दोन्ही ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे बंधन घालण्याची मागणी होत आहे.

वास्तविक चहा, कॉफी आणि स्नॅसच्या नावाने सुरु झालेल्या अशा ठिकाणी मुला-मुलींच्या जोड्यांना ‘एकांत’ उपलब्ध करण्यासाठी कंपार्टमेंट बांधले गेले आहेत. त्यात प्रवेश करणार्‍या जोडप्याकडून संबंधित कॅफेचालक तासानुसार पैशांची आकारणी करतो. एँजल कॅफेमधील अत्याचाराच्या प्रकरणातही आरोपीने अत्याचारासाठी घेतलेल्या कंपार्टमेंटच्या बदल्यात कॅफे चालकाला ३५० रुपये अदा केल्याचे पोलीस तपासातून समोर आले आहे. त्यावरुन या गोष्टी अधोरेखीत होत असून पोलिसांनी शहराच्या विविध भागात डझनावर निर्माण झालेल्या अशा ठिकाणांवर अचानक छापे घालून कारवाई करण्यासह कॅफे हाऊसमधील कंपार्टमेंट (कप्पे) काढून टाकावेत व सीसीटीव्ही बसविल्याशिवाय ते सुरु करण्यास अटकाव करावा अशी मागणी होत आहे.


अकोले बाह्यवळण रस्त्यावरील एँजल कॅफे हाऊसमध्ये झालेल्या अत्याचाराच्या प्रकरणात आरोपी गणेश सुखदेव भडांगे याने कॅफेचा चालक स्वयंम पंधारे याला ‘ऑनलाईन’ पद्धतीने अवघे ३५० रुपये दिल्याचे तपासात समोर आले आहे. याचाच अर्थ संगमनेर शहरात अशा जवळपास डझनभर ठिकाणी अवघ्या साडेतीनशे रुपयांमध्ये अत्याचार करण्यासाठी जागा आणि सुविधा उपलब्ध करुन देणारे केंद्र निर्माण झाल्याचे दिसत असून पोलिसांनी विद्यार्थिनींचे आयुष्य खराब करणारी ही ठिकाणं कायद्याच्या कक्षेत घेण्याची गरज निर्माण झाली आहे. यावर संगमनेरचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे काय कारवाई करतात याकडे अवघ्या तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Visits: 61 Today: 1 Total: 118428

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *