पूर्ववैमनस्यातून दोन गटांचा एकमेकांवर सशस्त्र हल्ला! संगमनेर खुर्दमधील रक्तरंजीत घटना; दोन्ही बाजूच्या बाराजणांवर गुन्हा..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
गुरुवारी सायंकाळी झालेल्या किरकोळ बाचाबाचीवरुन दोघांनी एकाला लाथाबुक्क्यांसह लाकडी दांडके, चॉपर आणि फायटरने बेदम मारहाण केली. त्यात गंभीर जखमी झाल्याने त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर, याच प्रकरणात दुसर्‍या बाजूनेही विरोधी तक्रार दाखल करण्यात आली असून टपरीवर उभे असताना जाण्यास सांगितल्याच्या रागातून आठ ते दहाजणांनी सशस्त्र हल्ला केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. सतत चर्चेत येणार्‍या संगमनेर खुर्दमधील गजबजलेल्या भागात घडलेल्या एकाच प्रकरणाच्या या दोन तक्रारींनी तणाव वाढवला असून पूर्ववैमनस्यातून सदरचा प्रकार घडल्याचे बोलले जात आहे. दोन्ही बाजूंच्या तक्रारीवरुन पोलिसांनी 12 जणांवर विविध गंभीर कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत.


याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदरचा प्रकार गुरुवारी (ता.22) सायंकाळी व त्यानंतर रात्री घडला. या प्रकरणी कासीम इक्बाल सय्यद (वय 35, रा.डाकेमळा) यांनी दिलेल्या तक्रारीत सांगितलेल्या घटनाक्रमानुसार फिर्यादी सायंकाळी सहाच्या सुमारास संगमनेर खुर्दमधील चौकात उभा असताना काही कारण नसताना मोसीन गुलाब शेख (रा.डाकेमळा) व तवीश उर्फ गुड्डू शेख (रा.रहेमतनगर) या दोघांनी त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली होती. याप्रकरणात त्यांच्या तक्रारीवरुन शहर पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा नोंदवला. त्याचा राग मनात धरुन रात्री साडेआठच्या सुमारास दोघांनीही मजुरी करणार्‍या फिर्यादी कासीम सय्यद यांना लाकडी दांडके, चॉपर व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या प्रकरणी दोघांवर भारतीय न्यायसंहितेच्या कलम 118 (1), 115 (2), 351 (2), 352, 3 (5) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. यातील फिर्यादीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.


यातील दुसर्‍या बाजूने मोसीन गुलाब शेख (वय 38, रा.नायकवाडपूरा) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सायंकाळी सहाच्या सुमारास संगमनेर खुर्दमधील एका पानटपरीवर उभे असताना आरोपी कासीमसय्यद तेथे आला. त्यावेळी मोसीन शेखने ‘निघून जा, इथे थांबू नकोस!’ असे त्याला म्हणाल्याचा राग मनात धरुन रात्री दहाच्या सुमारास आरोपी कासिमसह शोएब उर्फ भोल्या कय्यूम पठाण (रा.नायकवाडपूरा), मुदस्सर सय्यद, इक्बाल सय्यद, मुस्तकीन सय्यद (तिघे रा.आर.के.प्लॉट), अज्जू इक्बाल सय्यद (रा.उम्मतनगर), अकिल सय्यद (रा.रहेमतनगर), बालम सय्यद व त्याची दोन मुलं (नावे नमूद नाहीत) अशा दहाजणांनी धारदार शस्त्र, चॉपर, लोखंडी व लाकडी दांडके आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.


या तक्रारीवरुन वरील दहाजणांविरोधात भारतीय न्यायसंहितेच्या कलम 118 (1), 351 (2), 189 (2), 191 (2), (3), 352, 115 (2) प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. यातील तक्रारदारही जखमी असून खासगी रुग्णालयातून दिलेल्या जवाबावरुन वरीलप्रमाणे गुन्ह्याची नोंद झाली असून दोन्ही बाजूच्या कोणालाही अद्याप अटक झालेली नाही. कोणत्या न् कोणत्या कारणाने सतत चर्चेत येणार्‍या संगमनेर खुर्दमधील या घटनेने परिसरातील अवैध व्यवसाय, गुन्हेगारांचा वावर आणि सतत घडणार्‍या गुन्हेगारी घटना चर्चेत आल्या असून त्याची परिणीती दोन गटातील रक्तरंजीत संघर्षात झाल्याचे पाहायला मिळत आहे. या घटनेला दोन्ही गटातील परस्पर वैमनस्याची किनार असल्याचेही बोलले जात आहे.


गेल्याकाही वर्षात मोठ्या प्रमाणात लोकवस्ती वाढलेल्या प्रवराकाठावरील संगमनेर खुर्दच्या या भागातून मोठ्या प्रमाणात वाळू तस्करी होत असते. त्या शिवाय संगमनेरच्या ‘लेडी डॉन’ने याच परिसरात गांजाचे गोदाम उभारल्याचेही मध्यंतरी झालेल्या पोलीस कारवाईतून उघड झाले आहे. त्यावरुन या परिसरातील गुन्हेगारांचा वावर वाढल्याचे आता बोलले जात असून श्रीरामपूरातील वॉर्ड नंबर दोनप्रमाणे संगमनेर खुर्दच्या या भागाची स्थिती निर्माण होवू पहात असून वेळीच त्याला आवर घालण्याची गरज व्यक्त होत आहे.

Visits: 13 Today: 13 Total: 2234085

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *