चासनळीमध्ये ऑर्केस्ट्रा संपल्यानंतर यात्रा कमिटी सदस्यावर हल्ला हल्लेखोर साथीदारांसह पसार; तालुका पोलिसांत तिघांवर गुन्हा दाखल
नायक वृत्तसेवा, कोपरगाव
तालुक्यातील चासनळी येथील जगदंबा यात्रेनिमित्त आयोजित ऑर्केस्ट्रा संपल्यानंतर यात्रा कमिटीचे सदस्य नकुल चांदगुडे व आणखी एका तरुणावर चॉपरने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. गावातीलच तरुण अभिषेक ससाणे याने हल्ला केल्यानंतर साथीदारांसह तो पसार झाला आहे. या घटनेने गावात एकच खळबळ उडाली आहे.
यात्रेनिमित्त आयोजित ऑर्केस्ट्रामध्ये मारामारी होणार याची कल्पना अगोदरच यात्रा कमिटीस आली होती. त्यामुळे पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ऑर्केस्ट्रा संपल्यानंतर पोलीस निघून गेले. त्यानंतर यात्रा कमिटीच्या सदस्यांबरोबर या टोळीने हुज्जत घालण्यास सुरूवात केली. मागील भांडणाचे उट्टे काढत अचानक चॉपरने वार केल्यामुळे धावपळ उडाली. अंधाराचा फायदा घेऊन चार ते पाच जणांची ही टोळी पसार होण्यात यशस्वी झाली. मागील वर्षी देखील याच टोळीतील काही सदस्यांनी ऑर्केस्ट्रामध्ये गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला होता.
यात्रा कमिटीच्या सदस्यावर हल्ला झाल्यामुळे आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत चासनळी गाव बंद ठेवण्याचा निर्णय गावकर्यांनी घेतला. पोलीस आल्यामुळे वातावरण शांत झाले. मात्र ग्रामस्थांच्या मध्यस्तीने आठवडे बाजार असल्यामुळे दुकाने खुली करण्यात आली. स्थानिक पुढार्यांचा गावावर वचक राहिला नाही. त्यामुळे राजकारणासाठी काहींना हाताशी धरून एकमेकाचे उट्टे काढण्याचा प्रयत्न चालू असतो.
चासनळीत दोन महाविद्यालये असून ते सुटल्यानंतर मोटरसायकल घेऊन फिरणार्यांची संख्या देखील भरपूर झाली आहे. त्यांना जाब विचारण्याची कोणी हिंमत करत नाही त्यामुळे या गुंडांची हिंमत वाढली आहे. आरोपी व त्यांच्या साथीदारांना तत्काळ अटक करावी यासाठी गावातील ज्येष्ठ व तरुणांनी मागणी केली आहे. याप्रकरणी नकुल चांदगुडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोपरगाव तालुका पोलिसांत आरोपी अभिषेक राजेंद्र ससाणे, शुभम संतोष धुमाळ, दर्शन राजेंद्र कटारे यांच्याविरूध्द गुरनं.82/2023, भादंवि कलम 324, 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोकॉ. संदीप बोठे हे करत आहे.