महिलांच्या सुरक्षेसाठी वाघचौरेंचा ‘संवाद पॅटर्न’! महिला व बालकल्याण मंत्र्यांकडून कौतुक; नऊशे तक्रारदार महिलांशी संपर्क..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
गुन्हा घडल्यानंतर आरोपीवर कारवाई करणे ही पोलिसांची जबाबदारी असते. मात्र त्या कारवाईनंतरही पीडित महिला सुरक्षित आहे का, याची खातरजमा करणे ही संवेदनशील आणि जबाबदार पोलीसिंगची खरी कसोटी ठरते. हाच दृष्टीकोन केंद्रस्थानी ठेवून श्रीरामपूर उपविभागाचे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर राबवलेला अनोखा उपक्रम महिला सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरला आहे. गेल्या दोन वर्षांतील महिलांविरोधातील गंभीर गुन्ह्यांमधील तब्बल 917 महिलांशी थेट संवाद साधून त्यांच्या सुरक्षिततेची वस्तुस्थिती जाणून घेण्यात आली. कारवाईनंतरही त्रास देणार्‍या आरोपींविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. या उपक्रमाची राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनीही इन्स्टाग्राम या सोशल साईटवरुन दखल घेत अहिल्यानगर पोलिसांचे कौतुक केले आहे.


नवरात्रौत्सवात देवीदर्शन, दांडिया, गरबा आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी महिला मोठ्या संख्येने घराबाहेर पडतात. अशावेळी छेडछाड, विनयभंगासारख्या घटनांची भीती त्यांच्या मनात राहू नये, यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक सुदर्शन मुम्मका यांच्या मार्गदर्शनाखाली अपर अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी विशेष नियोजन केले होते. त्यानुसार श्रीरामपूर उपविभागांतर्गत येणार्‍या 17 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गेल्या दोन वर्षांत महिलांविरोधात घडलेल्या गंभीर गुन्ह्यांचा आढावा घेण्यात आला. त्यातील बलात्काराच्या 251, आणि छेडछाड, विनयभंगासारख्या गुन्ह्यांतील 666 अशा एकूण 917 महिलांशी संपर्क साधून त्यांच्याकडून पोलीस कारवाईनंतरच्या परिस्थितीची माहिती घेण्यात आली.


या संवादादरम्यान 846 महिलांनी आरोपींकडून आता कोणताही त्रास होत नसल्याचे सांगितले. मात्र, 71 महिलांनी कारवाईनंतरही आरोपींकडून छेडछाड अथवा त्रास दिला जात असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. तक्रार देण्यास इच्छुक महिलांच्या तक्रारी नोंदवून आरोपींना तुरुंगात घालण्यात आले. तर उर्वरित प्रकरणांमध्ये संबंधित आरोपींविरोधात मुंबई पोलीस अधिनियमांचा वापर करुन प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. या उपक्रमाचे महत्त्व केवळ मोठ्या संख्येने महिलांशी संपर्क साधण्यात नाही, तर त्यांच्या तक्रारींमधून समोर आलेल्या प्रत्यक्ष स्थितीवर कार्यवाही करण्यात आहे. गुन्ह्याचा तपास पूर्ण झाल्यानंतरही पीडितेच्या सुरक्षिततेचा प्रश्न शिल्लक राहू शकतो, हे वास्तव लक्षात घेऊन पोलिसांनी उचललेले हे पाऊल प्रतिबंधात्मक पोलीसिंगचा महत्त्वपूर्ण नमुना ठरला आहे.


नवरात्रौत्सवाच्या काळात महिलांना तातडीने मदत मिळावी, यासाठीही एका महिला पोलीस उपनिरीक्षकासह सात महिला कर्मचार्‍यांचे विशेष पथक तयार करण्यात आले होते. या पथकाचे संपर्क क्रमांक सार्वजनिक करुन महिलांना थेट पोलिसांशी संपर्क साधण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली होती. प्राप्त तक्रारींचे तत्काळ निराकरण करण्याबरोबरच झालेल्या कारवाईचा आढावा जिल्हा पोलीस अधीक्षक सुदर्शन मुम्मका आणि अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्याकडून वेळोवेळी घेण्यात आला. प्रकरणांच्या निपटार्‍यात कर्मचार्‍यांकडून दिरंगाई झाल्यास त्याचीही गांभीर्याने दखल घेतली गेली. या उपक्रमात थेट संवाद, तक्रारींवरील कारवाई आणि वरिष्ठ अधिकार्‍यांचे नियंत्रण यांचा समन्वय साधण्यात आला. त्यामुळे महिलांच्या सुरक्षेसाठी केवळ उत्सवकाळातील बंदोबस्तावर अवलंबून न राहता, शक्यता ओळखून त्याला प्रतिबंध घालण्यावर भर दिला गेला.


अपर अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांची कडक शिस्त आणि गुन्ह्यांच्या तपासातील आक्रमक कार्यपद्धती यापूर्वीही चर्चेत राहिली आहे. संगमनेरचे पोलीस उपअधीक्षक असताना त्यांनी खून, दरोडे यांसारख्या गंभीर आणि प्रलंबित गुन्ह्यांचा छडा लावण्याबरोबरच शाळा-महाविद्यालयांच्या परिसरात ‘कॅफे हाऊस’च्या गोंडस नावाखाली चालणार्‍या अश्‍लिल केंद्रांविरोधात कठोर भूमिका घेतली होती. अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या प्रकरणांत संबंधित कॅफेच्या जागामालकांनाही सहआरोपी करण्याच्या कार्यपद्धतीमुळे त्याला नंतर राज्यात ‘संगमनेर पॅटर्न’ म्हणून ओळख मिळाली.


राज्य राखीव पोलीस दलात निदेशक म्हणून काम केल्यानंतर श्रीरामपूर उपविभागाची जबाबदारी स्वीकारलेल्या वाघचौरे यांनी अवैध व्यवसायांविरोधातही धडक कारवाया केल्या. राहाता तालुक्यातील पिंप्री निर्मळ परिसरातील बेकायदा गर्भलिंग निदान केंद्राचा तपास आणि त्याची तीन जिल्ह्यांपर्यंत पोहोचलेली व्याप्ती उघड करण्याच्या कारवाईतून राज्याने त्याचा अनुभव घेतला. संपूर्ण राज्यात खळबळ उडवणार्‍या अशोक खरात प्रकरणाला सर्वप्रथम वाचा फोडण्यातही त्यांचाच हात होता. त्यांच्या कारवाईतूनच भोंदू खरातचा ‘तो’ पेनड्राईव्ह पोलिसांच्या हाती लागल्याने अंकशास्त्रातून भविष्याचा वेध घेणार्‍या खरातचे कारनामे उघड झाले होते. संघटित गुन्हेगारीविरोधात भारतीय न्याय संहितेतील कलम 111 च्या तरतुदींच्या वापरातून कारवाई करण्यावरही त्यांनी भर दिला. गंभीर गुन्ह्यांच्या मुळाशी जाणे आणि कायद्याच्या चौकटीत संबंधितांची जबाबदारी निश्चित करणे, हा त्यांच्या कार्यपद्धतीचा समान धागा राहिला आहे.


अहिल्यानगर जिल्ह्याच्या उत्तरेकडील अकोले, संगमनेर, कोपरगाव, राहाता, श्रीरामपूर, नेवासा आणि राहुरी या तालुक्यांतील 17 पोलीस ठाण्यांच्या माध्यमातून त्यांनी राबवलेला हा उपक्रम राज्यातील अन्य पोलीस ठाण्यांसाठीही अनुकरणीय ठरु शकतो. महिलांविरोधातील गंभीर गुन्ह्यांचा नियमित आढावा, कारवाईनंतर पीडितेशी संपर्क, नव्याने त्रास होत असल्यास तातडीची कारवाई आणि वरिष्ठ अधिकार्‍यांकडून देखरेख, अशा उपाययोजना स्थानिक पातळीवर किती प्रभावीपणे राबवल्या जावू शकतात याचा वस्तूपाठच अपर अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी आपल्या कृतीतून निर्माण केला आहे. राज्याच्या महिला व बालकल्याणमंत्री मंत्री अदिती तटकरे यांनी सोशल माध्यमातून या उपक्रमाची दखल घेतल्याने महिलांच्या सुरक्षेसाठी अहिल्यानगर पोलिसांनी दाखवलेला संवेदनशील दृष्टिकोन राज्यस्तरावर पोहोचला आहे.


गुन्हा दाखल करणे आणि आरोपीवर कारवाई करणे एवढ्यापुरती पोलिसांची जबाबदारी मर्यादित नसते. त्या कारवाईनंतरही पीडितेच्या मनात सुरक्षिततेचा विश्वास निर्माण झाला आहे का, याची खातरजमा करणेही तितकेच आवश्यक असते. श्रीरामपूर उपविभागाचे अपर अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या प्रयत्नातून उपविभागात राबवलेला हा उपक्रम जबाबदार पोलीसिंगचा वस्तुपाठ ठरला असून, त्याची व्याप्ती राज्यातील अन्य पोलीस ठाण्यांपर्यंत वाढल्यास महिलांच्या सुरक्षेसाठीचे प्रयत्न अधिक परिणामकारक ठरतील.

Visits: 7 Today: 7 Total: 2249935

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *