थकीत ग्राहकाकडून वीज कर्मचार्‍याला जीवे मारण्याचा प्रयत्न! संगमनेर खुर्द मधील संतापजनक घटना; मारहाणीसह कारखाली चिरडण्याचाही प्रयत्न..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
थकीत असलेल्या वीज ग्राहकांकडून सक्तीने वसुलीसाठी महावितरणकडून सुरु असलेल्या ‘वीज तोड’ मोहीमेला दोघांनी बुधवारी हिंसक वळण लावले. संगमनेर खुर्दमध्ये घडलेल्या या संतापजनक घटनेत पिंपरणे कक्षातंर्गत कार्यरत असलेल्या ओंकार सातपुते या तरुण वीज तंत्रज्ञाला वीज पुरवठा खंडीत केल्याच्या कारणावरुन दोघांनी लाथाबुक्क्यांसह बेदम मारहाण केली. त्या उपरांतही जिवाच्या आकांताने सैरभैर पळणार्‍या या शासकीय कर्मचार्‍याचा चारचाकी वाहनातून पाठलाग करीत त्याला चिरडून ठार मारण्याचाही प्रयत्न झाला, मात्र सुदैवाने रस्त्याने जाणार्‍या एका वाहनचालकाने वेळीच मदतीचा हात दिल्याने त्या कर्मचार्‍याचा जीव वाचला. या प्रकरणी रात्री उशिराने दाखल झालेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नासह सरकारी कामात अडथळा आणून दहशत निर्माण करणार्‍या दोघांना बेड्या ठोकल्या असून आज त्यांना न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. या घटनेने संपूर्ण तालुक्यात संताप निर्माण झाला असून फूकटात वीज वापरण्याच्या वृत्तीतून थेट जीवे ठार मारु पाहणार्‍या आरोपींवर कायद्याची जरब बसवण्याची मागणी होत आहे.


याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदरची धक्कादायक घटना बुधवारी (ता.28) दुपारी साडेतीनच्या सुमारास संगमनेर खुर्द शिवारात घडली. या प्रकरणी संगमनेर वीज कंपनीच्या पिंपरणे कक्षातंर्गत संगमनेर खुर्द विभागात कार्यरत असलेल्या ओंकार भानुदास सातपुते या 24 वर्षीय तरुण तंत्रज्ञाने (वायरमन) तक्रार दाखल केली आहे. या परिसरात राहणार्‍या शकीला इसाक शेख या महिलेच्या नावावर असलेल्या वीजजोडाच्या पोटी थकबाकी झाल्याने वरीष्ठांच्या सूचनेप्रमाणे तंत्रज्ञ सातपुते बुधवारी दुपारी त्यांचा जोड तोडण्याच्या कारवाईसाठी गेले होते.


दुपारी साडेतीनच्या सुमारास संगमनेर खुर्दच्या रोहित्रावरुन गावठाणचा वीज पुरवठा खंडीत करुन आपल्या दुचाकीवरुन थकीत ग्राहकाच्या घराकडे निघण्याच्या तयारीत असतानाच दोघेजण तेथे अवतरले. त्यातील अजीज उर्फ बाबू छोटू कुरेशी याने त्या तंत्रज्ञाच्या दुचाकीची चावी काढून घेतली तर, मोबीन शाकीब कुरेशी (दोघेही रा.संगमनेर खुर्द) याने ‘****, तु डी.पी.का बंद केली?’ या सवालासह शिवीगाळ करत थेट सातपुते यांच्या कानशिलात मारली. अचानक घडलेल्या या प्रकाराने भांबावलेल्या त्या वायरमनने ‘तुम्ही मला का मारत आहात?’ असा प्रतिप्रश्‍न करताच अजिज उर्फ बाबू कुरेशीने त्यांची कॉलर पकडून त्यांना खाली पाडले आणि नंतर दोघांनीही लाथाबुक्क्यांनी यथेच्छ मारहाण करण्यास सुरुवात केली.


याच दरम्यान परिसरातील एकाने मध्यस्थी करीत त्यांच्या तावडीतून अर्धमेल्या झालेल्या सातपुते यांची सुटका केली. या धक्कादायक प्रकाराने प्रचंड हादरलेल्या या तरुण तंत्रज्ञाने क्षणाचा दिलासा मिळताच जिवाच्या आकांताने तेथून शेताशेताने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र चारचाकी वाहनातून आलेल्या ‘त्या’ दोघाही आरोपींनी जणू त्यांना जीवे ठार मारण्याचाच इरादा केल्याप्रमाणे त्यांचा वाहनातून पाठलाग करीत दोनवेळा त्यांना कारखाली चिरडण्याचा प्रयत्न केला. मात्र सुदैवाने दोन्हीवेळा त्यांनी ऐनवेळी बाजूला उडी घेत पळ काढला.


दोन्ही आरोपींकडून कारखाली चिरडण्याचा प्रयत्न सुरु असताना रस्त्याने मोठमोठ्याने ओरडत धावणारे ओंकार सातपुते रस्त्याने जाणार्‍या-येणार्‍या वाहनांना हात दाखवून मदतीची याचना करीत होते. त्यातीलच संगमनेरच्या दिशेने येणार्‍या एका वाहनचालकाने प्रसंगावधान ओळखून जिवाच्या भीतीने सैरभैर धावणार्‍या त्या शासकीय कर्मचार्‍याला मदतीचा हात देत आपल्या वाहनातून थेट शहरातील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात आणून सोडले. घडला प्रकार वरीष्ठांना सांगितल्यानंतर प्राथमिक उपचारानंतर बुधवारी रात्री उशिराने त्यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात वरील घटनाक्रमाच्या अनुषंगाने आरोपी अजीज उर्फ बाबू छोटू कुरेशी (वय 28) व मोबीन शाकीब कुरेशी (वय 26, दोघेही रा.संगमनेर खुर्द) यांच्या विरोधात खुनाचा प्रयत्न, लोकसेवकाला धाकाने कर्तव्यापासून रोखण्यासह भारतीय न्यायसंहितेच्या विविध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करुन दोन्ही आरोपींना रात्रीच बेड्या ठोकल्या आहेत. त्यांना आज न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.


नियमानुसार असलेल्या वीजजोडाच्या वापरापोटी वेळेवर देयकं भरण्याची जबाबदारी संबंधीत ग्राहकाची असते. मात्र शहराच्या काही ठराविक भागात कोणतेही देयकं न देता फूकटात सरकारी स्रोतांचा वापर करण्याची मानसिकता निर्माण झाली आहे. थकीत देयकाच्या वसुलीसाठी गेलेल्या वीज कर्मचार्‍यांवर हल्ले होण्याचे, त्यांना मारहाण होण्याचे प्रकार संगमनेरकरांना नवीन नाहीत. मात्र या प्रकरणात आरोपींनी केवळ मारहाण न करता नियमानुसार कर्तव्य बजावणार्‍या सरकारी कर्मचार्‍याला थेट वाहनाखाली चिरडून ठार मारण्याचा संतापजनक प्रयत्न केला आहे. अशाप्रकारची प्रवृत्ती समाजासाठी घातक असून कायदा आपलं काही करीत नाही अशा भ्रमात राहणार्‍यांवर त्याची जरब निर्माण होण्याची गरज आहे. अन्यथा काळ सोकावण्यास वेळ लागणार नाही असेच ही घटना सांगत आहे.


गेल्याकाही वर्षात थकीत वीजबिलाची वसुली करण्यासाठी गेलेल्या पथकांवर हल्ला होण्याच्या, कर्मचार्‍यांना दमदाटी, मारहाण होण्याच्या सातत्यपूर्ण घटना घडत आहेत. मात्र संगमनेर खुर्दमध्ये घडलेल्या या घटनेने सर्व मर्यादा ओलांडल्या असून नियमानुसार कर्तव्य बजावणार्‍या सरकारी कर्मचार्‍याला थेट मारुन टाकण्याचा राक्षसी प्रयत्न झाला आहे. हा प्रकार अतिशय गंभीर असून पोलिसांनी दोन्ही आरोपींवर कायद्याचा धाक निर्माण होईस्तोवर त्यांची कारागृहातून सुटका होणार नाही यासाठी प्रयत्न करुन समाजातील अशा विकृत प्रवृत्तींना कठोर संदेश देण्याची गरज आहे, अन्यथा काळ सोकावण्यास वेळ लागणार नाही.

Visits: 4 Today: 4 Total: 2257440

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *