आपण सहकार क्षेत्रातील ‘विस्थापित’ राजकारणी! तांबेंच्या वक्तव्याने पुन्हा एकदा भुवयां उंचावल्या; मामांचा राजकीय ‘करिष्मा’ आणि भाच्याची ‘अलिप्त’ भूमिका..

श्याम तिवारी, संगमनेर
सहकाराच्या पटलावर ‘विस्थापित’ असल्याचा साधा-सरळ पवित्रा घेत, आमदार सत्यजीत तांबे यांनी अकोल्यातील एका जाहीर व्यासपीठावर उच्चारलेले उद्गार सध्या संगमनेरसह जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहेत. एका बाजूला त्यांचे मामा, माजीमंत्री बाळासाहेब थोरात आपल्या जावयासह जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या राजकारणाला नवी दिशा देत, आपली पारंपरिक राजकीय कटूता आणि विखेंशी असलेला संघर्ष विसरुन सहमतीच्या नव्या राजकारणाची गुंफण घालत आहेत. तर, त्यांच्याच वलयात राजकीय पोषण झालेले त्यांचे भाचे जिल्हा बँकेचे राजकारण आणि संस्थात्मक प्रवासापासून आपण अलिप्त असल्याचे अत्यंत मिश्किलपणे पण तितक्याच ठामपणे सांगत असल्याने राजकीय विश्लेषकांच्या भुवयां पुन्हा एकदा उंचावल्या आहेत.

दैनिक नायकने आमदार सत्यजीत तांबे यांच्या राजकीय वाटचालीचे यापूर्वीही अनेकवेळा सूक्ष्म विश्लेषण केले आहे. काँग्रेससोबत वैचारिक फारकत घेतल्यानंतर, अपक्ष म्हणून विधान परिषदेत धडक मारणारे तांबे नेहमीच आपल्या वेगळ्या राजकीय आकलनासाठी ओळखले जातात. महाविकास आघाडी असो किंवा महायुतीमधील सत्ताधारी, स्थानिक पातळीवरील विकासकामांसाठी सरकारशी जुळवून घेण्याची त्यांची लवचिक रणनीती जिल्ह्यात नेहमीच चर्चेचा विषय ठरली आहे. गेल्या चार वर्षांचा त्यांचा राजकीय इतिहास पाहता त्यांनी पारंपारिक राजकारणाच्या चौकटीत न अडकता स्वतःचा वेगळा राजकीय पट तयार केल्याचेही वेळोवेळी समोर आले आहे.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने सध्या जिल्ह्यात राजकारणाचे नवीन क्षितीज आकार घेत आहे. अशावेळी थोरात-तांबे घराण्यातील अत्यंत अभ्यासू, आक्रमक आणि दमदार तरुण चेहरा म्हणून ओळखल्या जाणार्या आमदार सत्यजीत तांबे यांचे या निवडणुकीच्या संपूर्ण प्रक्रियेत पूर्णपणे तटस्थ राहणे केवळ योगायोग म्हणावा की नव्या राजकीय समिकरणांची नांदी? हा विषय चर्चेत आला आहे. या संपूर्ण घटनाक्रमावर कटाक्ष टाकल्यास आता मामा-भाच्याच्या राजकीय दिशा खरोखरच भिन्न झाल्या आहेत की, एकाच घरातील दोन वेगवेगळ्या रणनीतींचा हा भाग आहे अशा शंकाही निर्माण होत आहेत. सहकार आणि सत्तेचा दांडगा वारसा असलेल्या घराण्याचा राजकीय वारसा पुढे नेताना खुद्द आमदार असलेल्या सत्यजीत तांबे यांनी स्वतःला जिल्हा बँकेपासून अलिप्त ठेवण्याची भूमिका या शंकांना बळ देणारी आहे.

अकोल्यातील एका आर्थिक संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षाच्या समारंभात पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, मधुकर नवले यांच्यासह भाजपचे प्रदेश सरचिटणीस, जिल्हा बँकेचे उमेदवार माजी आमदार वैभव पिचड, उमेदवार अनुराधा नागवडे यांचे सुपूत्र दिग्वीजय, संजय कळमकर, दशरथ सावंत आदिच्या उपस्थितीत बोलताना आमदार सत्यजीत तांबे यांनी संगमनेर – अकोल्याचा सहकार सभासदांच्या भरवशावर कसा मजबुतीने उभा आहे, यावर भाष्य करीत आपल्या भाषणाला सुरुवात केली. किरकोळ अपवाद वगळता दोन्ही तालुक्यातील अडिचशेहून अधिक पतसंस्था सुरळीतपणे कार्यरत असल्याचा दाखलाही त्यांनी दिला.

यावेळी मंचावर उपस्थित काका कोयटे यांनी ‘सहकारमंत्र्यांना भेटायचंय, चार प्रश्न मांडायचेत’ या त्यांच्या कानात सांगितलेल्या गोष्टीला सार्वजनिक करीत त्यांनी, काका या समस्या तुम्ही माझ्यापेक्षा वैभव पिचड यांना सांगा; राज्यात त्यांच्या पक्षाचे सरकार आहे, ते स्वतः भाजपचे प्रदेश सरचिटणीस आहेत आणि जिल्हा बँकेचे उमेदवारही आहेत असे सांगत काकांनी टाकलेला सहकाराचा चेंडू पिचड यांच्या दिशेला टोलावून त्यांनी सत्ताधारी गटाशी आपला सलोखा असल्याच्या चर्चांनाही मूठमाती देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचवेळी त्यांनी हळूच जिल्हा बँकेच्या राजकारणात प्रवेश करीत पिचडांना उद्देशून, बरं झालं भाऊ तुम्ही मागे राहिलात, त्या निमित्ताने मतदारांच्या भेटीगाठी होतात, प्रश्न समजतात असे सांगत एकप्रकारे बँकेच्या बिनविरोध निवडीचीही ‘टर’ उडवली.

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांचा दाखला देताना त्यांनी दादांचा बिनविरोध निवडणुकीला नेहमीच विरोध होता असे सांगत आपल्याच मामांच्या वाटचालीवर बोटं ठेवले. मंचावर उपस्थित असलेल्या बँकेच्या उमेदवार अनुराधा नागवडे यांचे सुपूत्र दिग्वीजय यांच्याकडे पाहुन बोलताना; नागवडे कधी अकोल्याला आले असते का? असा मिश्किल सवाल करीत ते भंडारदर्याला आले असते, पण अकोल्यात नाही अशी कोपरखळीही त्यांनी दिली. त्यांचे भाषण सुरु असतानाच समोर बसलेल्या एका महिलेने ‘पिचड, नागवडेंची निशाणी काय?’ असा जाहीर सवाल करीत त्यांना खिंडीत अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनीही तितक्याच शानदार राजकीय शैलीत तो टोलावताना आपल्याकडे ना संस्था, ना दूध डेअर्या आहेत, ना बँका-पतसंस्था आणि ना कारखाने. त्यामुळे आपण या भानगडीत नसल्याचे सांगत त्यांनी आपला राजकीय मार्ग स्वतंत्र असल्याकडेही लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. अकोल्यातील जाहीर मंचावरुन त्यांनी केलेले काही मिनिटांचे हे भाषण मात्र त्यांच्या राजकीय प्रवासाचे गुढ आणखी वाढवणारेच ठरले.

नाशिक पदवीधर मतदार संघाच्या अपक्ष उमेदवारीपासून चर्चेत असलेल्या आमदार सत्यजीत तांबे यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी स्नेहाचे संबंध राहिले आहेत. त्याशिवाय राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यापासूनच त्यांचा राजकीय कलही सत्तेच्या दिशेने झुकणाराच दिसून आल्याने भविष्यात ते भाजपच्या गोटात असतील असेही कयास लावले गेले. मात्र आपला निम्मा कार्यकाळ संपल्यानंतरही त्यांनी आजही आपली ओळख ‘अपक्ष’च ठेवली आहे. त्यातच काका कोयटेंच्या प्रश्नांवर आपल्यापेक्षा सत्ताधारीगटाच्या पदाधिकार्याकडे जाण्याचा त्यांचा जाहीर सल्ला आणि आपण संस्थानिक नसून विस्थापित असल्याची जाहीर ‘कबुली’ खूप बोलकी ठरली असून त्यातून त्यांच्या राजकीय प्रवासातील गुढही आणखी वाढले आहे.

