मालेगांवच्या आरोपीकडून महिलेच्या कुटुंबाची बदनामी! तिघांविरोधात गंभीर गुन्हा; संगमनेरातील मदतकर्त्याला अटक..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
काही महिन्यांपूर्वी नात्यातच असलेल्या आरोपीसोबत तक्रारदार पीडित महिलेच्या पतीचा वाद झाला, त्याचा राग मनात धरुन आरोपीने सोशल माध्यमातील फेसबुक, इन्स्टाग्राम प्लॅटफॉर्मवर पीडितेसह तिची अल्पवयीन मुलगी, मोठी जाव आणि शेजारच्या एका महिलेचे जूने फोटो वापरुन त्याचा व्हिडिओ तयार केला. त्याचा वापर करुन गेल्या तीन महिन्यापासून आरोपीने या सर्वांची नाहक बदनामी करुन त्यांना मानसिक त्रास दिला. वारंवार सुरु असलेल्या या प्रकाराने वैतागलेल्या 30 वर्षीय पीडितेने अखेर शहर पोलीस ठाण्यात मालेगावमध्ये राहणार्या आरोपी फरीद कमल खान याच्या विरोधात तक्रार दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी भारतीय न्यायसंहितेसह माहिती व तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा केला असून या प्रकरणात मुख्य आरोपीला मदत करणार्या संगमनेरातील अन्य दोन आरोपींची नावे निष्पन्न केली आहेत. त्यातील शोएब मोहम्मद हनिफ शेख याला गजाआड करण्यात आले आहे. तर, या प्रकरणातील मुख्य आरोपी पसार झाला असून तिसर्या क्रमांकाचा आरोपी दिव्यांग असल्याने त्याला चौकशीकामी हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली आहे.

याबाबत संगमनेर शहर पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार सदरचा प्रकार गेल्या तीन महिन्यांपासून सुरु होता. शहरातील पूर्वेकडील भागात राहणार्या 30 वर्षीय तक्रारदार महिलेच्या नात्यातील फरीद कमल खान (रा.हुडको, मालेगाव, जि.नाशिक) याचे पीडितेच्या पतीशी वाद झाले होते. त्याचा राग मनात घेवून गेलेल्या आरोपीने तेव्हापासूनच सोशल माध्यमातील फेसबुक, इन्स्टाग्राम या प्लॅटफॉर्मचा वापर करीत वेगवेगळ्या वापरकर्त्या नावांचा (खात्यांचा) वापर करुन पीडित तक्रारदार महिला, त्यांची अल्पवयीन मुलगी, मोठी जाव आणि चक्क त्यांच्या शेजारी राहणार्या एका महिलेला लक्ष्य करीत त्यांची बदनामी सुरु केली.

त्यासाठी आरोपीने वरील सर्व महिलांचे जुने फोटो मिळवून वेगवेगळे व्हिडिओ तयार केले, त्याच्या खाली अतिशय घाणेरड्या आणि अश्लिल भाषेचा वापर करुन मजकूर टाकला व सोशल माध्यमातून मोठ्या प्रमाणात ते व्हायरलही केले. अतिशय खालच्या पातळीवरील भाषेचा वापर करुन नाहक होणार्या सततच्या या बदनामीला वैतागलेल्या पीडितेने अखेर कायद्याचा आधार घेण्याचा निर्णय घेतला आणि थेट शहर पोलीस ठाणे गाठून गेल्या तीन महिन्यांपासून विनाकारण सुरु असलेला त्रास आणि त्यातून बिघडलेल्या मनस्वास्थाची माहिती पोलिसांना देत तक्रार दाखल केली.

त्यावरुन पोलिसांनी सुरुवातीला मालेगावच्या हुडको परिसरात राहणार्या फरीद कमाल खान याच्या विरोधात भारतीय न्यायसंहितेच्या कलम 75, 356 (2) सह माहिती व तंत्रज्ञान अधिनियमाच्या कलम 67 प्रमाणे गुन्ह्याची नोंद करीत प्रकरणाचा तपास सुरु केला. या प्रकरणाचा तांत्रिक तपास सुरु असतानाच आरोपीला गुन्हा दाखल झाल्याची भणक लागल्याने तो पसार झाला. मात्र पोलीस तपासात त्याच्या या गुन्हेगारी कृत्यात त्याला मदत करणार्या संगमनेरातील शोएब मोहम्मद हनिफ शेख (वय 28, रा.आकार कॉलनी, रहेमतनगर) याचे नाव समोर आल्याने त्याला अटक करण्यात आली. तर, अफसर फारुक शेख (वय 37, रा.उन्मतनगर) हा दिव्यांग आरोपीही या कृत्यात सहभागी असल्याचे समोर आल्याने त्याला गुन्हेगारी प्रक्रियेनुसार कलम 135 (3) प्रमाणे नोटीस बजावून चौकशीकामी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. या प्रकरणात एकापेक्षा अधिक आरोपी समोर आल्यानंतर पोलिसांनी दाखल गुन्ह्यात भारतीय न्यायसंहितेचे कलम 3(5) वाढवले आहे.

पतीसोबतच्या वादात त्याच्या पत्नीला आणि घरातील अन्य महिलांना नाहक ओढून त्यांची सोशल माध्यमातून नाहक बदनामी करण्याच्या या प्रकाराने संताप निर्माण झाला असून अशाप्रकारच्या प्रवृत्ती ठेचून काढण्यासाठी आरोपींना कठोर शासन व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी फरीद खान हा पसार झाला असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.

