डिझेल चोरणारी टोळी अवघ्या चोवीस तासांत गजाआड कोपरगाव शहर पोलिसांची कामगिरी; अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त

नायक वृत्तसेवा, कोपरगाव
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाचे काम करणार्‍या कंपनीच्या वाहनांमधील डिझेल चोरणार्‍या टोळीचा पर्दाफाश करत अवघ्या चोवीस तासांत गजाआड करण्यात शहर पोलिसांनी यश मिळवले आहे. या धडाकेबाज कामगिरीचे नागरिकांतून कौतुक होत आहे.

अमोल मच्छिंद्र आहेर (रा.वाकडी, ता.राहाता), चेतन अरविंद गिरमे (रा.धारणगाव, ता.कोपरगाव), राजीवसिंह रामअसरेसिंह (रा.उत्तर प्रदेश), अंगदकुमार रामपाल बिंद (रा.उत्तर प्रदेश) अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून 2 लाख 36 हजार 150 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यात पिकअप, बॅरेलमध्ये चोरलेले डिझेल व अन्य साहित्याचा समावेश आहे.

शहर पोलिसांच्या माहितीनुसार, कोकमठाण शिवारातील रक्ताटे वस्ती परिसरात समृद्धी महामार्गाच्या कामासाठी आलेली वाहने उभी केली जातात. मंगळवारी (ता.16) पहाटे चोरांनी या वाहनांतून 1 लाख 13 हजार 200 रुपये किंमतीचे 1140 लिटर डिझेल, तसेच वाहनांच्या बॅटर्‍या, सेल्फ स्टार्टर, बॅटर्‍यांच्या केबल असा मुद्देमाल लांबविला. याबाबत विक्रांत राजेंद्र सोनवणे यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत अप्पर पोलीस अधीक्षिका डॉ.दीपाली काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांच्या सूचनेप्रमाणे पोलिसांची दोन पथके नेमण्यात आली. या पथकाने अवघ्या 24 तासांत वरील चौघांना मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे. या धडाकेबाज कामगिरीचे सर्वसामान्य नागरिकांतून कौतुक होत आहे.

Visits: 155 Today: 1 Total: 2061900

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *