नाटेगाव येथील बेवारस शौचालयाचे गांधीगिरी करुन लोकार्पण
नाटेगाव येथील बेवारस शौचालयाचे गांधीगिरी करुन लोकार्पण
नायक वृत्तसेवा, कोपरगाव
गावात राहत नसलेल्या लाभार्थ्यांच्या नावावर बेवारस शौचालयाचे बांधकाम केल्याचा प्रताप कोपरगाव तालुक्यातील नाटेगावचे माजी सरपंच तसेच ग्रामसेवक यांच्या पतीने संगनमत करून केला आहे. असा बेवारस शौचालयाचे लोकार्पण व उद्घाटन गांधीगिरी पद्धतीने नुकतेच तक्रारदार व ग्रामस्थांनी केले आहे. या कार्यक्रमास विद्यमान व माजी सरपंच तसेच ग्रामसेविका यांना निमंत्रित केले होते. मात्र त्यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. तत्पूर्वी शौचालय घोटाळ्याचे सत्य बाहेर आणण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला असल्याचे लोकस्वराज्य आंदोलनाचे अॅड.नितीन पोळ यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घर तिथे शौचालय योजनेतून कोपरगाव तालुक्यातील नाटेगाव येथील ग्रामपंचायतीच्यावतीने सरकारी तिजोरीची स्वच्छता करण्याचे काम सुरू असून गावातील मिळकत धारकांपेक्षा अनेक कुटुंबात एकापेक्षा जास्त शौचालय दिले असून या शौचालय घोटाळ्यांची उच्चस्तरीय चौकशी करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. सदर तक्रार अर्जाची प्रत पंचायत समितीच्या गटविकास अधिकार्यांना माहितीस्तव दिली असता गटविकास अधिकार्यांनी वरिष्ठांचे कोणतेही आदेश नसताना आपल्या अधिकार्यांना वाचविण्याच्या दृष्टीने गटविस्तार अधिकार्यांची चौकशी समिती नेमून ज्यांच्यावर घोटाळ्याचा संशय घेतला त्यांनाच सोबत घेऊन चौकशी सुरू केली आहे. सदर चौकशी दरम्यान माजी सरपंच संगीता मोरे यांचे पती ज्ञानेश्वर मोरे व ग्रामसेवक अवचिते यांचे पती यांनी चौकशीला सहकार्य करण्याऐवजी जे लाभार्थी गेल्या वीस-पंचवीस वर्षांपासून त्यांचे घर मिळकती न राहता गावापासून दोन ते तीन किलोमीटर शेतात राहतात अशा ठिकाणी घर मिळकत अस्तित्वात नसताना रातोरात शौचालय उभारणी केली आहे. अशा दोषी व्यक्तींना सोबत घेऊन होत असलेल्या चौकशीवर शंका घेऊन तक्रारदारांनी सदर चौकशी थांबवावी अशी मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर बेवारस शौचालयाचे लोकार्पण करण्यात आले आहे.
![]()
