‘कॉटेज’ बंद पाडणार्यांना मंत्र्यांचे राजीनामे मागण्याचा अधिकार नाही! जावेद जहागिरदार यांचा घणाघात; सुसंस्कृतपणाच्या केवळ गप्पा असल्याचाही टोला..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
राज्यातील आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर असल्याचा घणाघात करीत ही राज्य मंत्रीमंडळाची सामूहिक जबाबदारी असल्याने संपूर्ण मंत्रीमंडळाने राजीनामा द्यावा अशी मागणी माजी मंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रातून केली होती. त्याच्या ‘त्या’ मागणीला संगमनेर शहर भाजपाचे सरचिटणीस जावेद जहागिरदार यांनी प्रसिद्धी पत्रकातून प्रत्त्युत्तर दिले असून ज्यांनी सर्वसामान्य नागरिकांच्या सुविधेसाठी उपलब्ध असलेले कॉटेज रुग्णालय बंद पाडले, अडीच वर्षांच्या मंत्रीपदात ज्यांना तालुक्यात उपजिल्हा रुग्णालय सुरु करता आले नाही, त्यांनी आधी आपले अपयश मान्य करुन आमदारकीचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे.
नांदेडच्या शासकीय रुग्णालयात घडलेल्या मृत्यूतांडवानंतर राज्य सरकार विरुद्ध विरोधी पक्ष असा आरोप प्रत्यारोपांचा सामना रंगलेला असताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे. या पत्रातून त्यांनी राज्यातील आरोग्य यंत्रणा सलाईनवर गेल्याचा आरोप करीत आरोग्य मंत्र्यांच्या ‘याला मी एकटा जबाबदार नाही, ही संपूर्ण मत्रीमंडळाची जबादारी आहे.’ या वक्तव्याचाही त्यांनी खरपूस समाचार घेतला आहे. हाच धागा पकडून सदरच्या मृत्यूतांडवाची जबाबदारी सामूहिकपणे राज्य मंत्रीमंडळाची असल्याने संपूर्ण मंत्रीमंडळानेच राजीनामा द्यायला हवा अशी अपेक्षाही त्यांनी आपल्या पत्रातून व्यक्त केली होती.
त्यांच्या या पत्रावर राज्यपातळीवरुन अद्याप कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नसताना स्थानिक भाजपा पदाधिकार्यांनी मात्र त्यावर जोरदार घणाघात केला आहे. याबाबत भाजपाचे शहर सरचिटणीस जावेद जहागिरदार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे थोरात यांच्या आरोपांना उत्तर दिले आहे. संगमनेर नगरपालिकेच्या आवारात सुरु असलेल्या कॉटेज रुग्णालयाचा लाभ सामान्य माणसांना मिळत होता. मात्र माजी मंत्री थोरात यांनी ते रुग्णालय बंद पाडले. आपल्या अडीच वर्षांच्या मंत्रीपदाच्या काळात त्यांना तालुक्यात उपजिल्हा रुग्णालय सुरु करता आले नाही. अशांना महायुती सरकारमधील मंत्र्यांचे राजीनामे मागण्याचा अधिकार कोणी दिला असा सवालही त्यांनी विचारला आहे.
पत्रकात जहागिरदार पुढे म्हणतात; अनेक वर्ष एकहाती सत्ता असतांनाही तालुक्याच्या आरोग्य यंत्रणेचा बोजवारा ज्यांच्या हलगर्जीपणामुळे उडाला त्यांनी जनहिताची कामे करणार्या सरकारचा राजीनामा मागावा हे आश्चर्य आहे. नगरपालिकेच्या अंतर्गत सुरु असलेले कॉटेज रुग्णालय शहर आणि तालुक्यातील जनतेसाठी मोठा आधार होते. मात्र स्वतःच्या बगलबच्च्यांची रुग्णालये व्यवस्थित चालावित यासाठी त्यांनी सामान्यांचा आधार बंद करण्याचे काम केले. त्यांना स्वतःला विकासपुरुष म्हणवून घेण्याचा तसेच, सुसंस्कृतपणाच्या आणि विकासाच्या गप्पा मारण्याचा कोणताही अधिकार नसल्याची घणाघाती टीकाही जहागिरदार यांनी केली आहे.
कोविड संक्रमणाच्या कालावधीत तालुक्यातील शासकीय आरोग्य यंत्रणेला सक्षम करण्याऐवजी सर्वाधिक खासगी रुग्णालयांना कोविड उपचारांची मान्यता कोणी दिली? राज्यात त्यावेळी कोणाचे सरकार होते? हे देखील संपूर्ण जिल्ह्याने पाहिल्याचा आरोप त्यांनी केला आहे. याकाळात शासकीय रुग्णालयांमध्ये कोणतीही सुविधा नसल्याने सर्वसामान्यांचे झालेले हाल आणि त्यांची आर्थिक लुट सर्वश्रृत आहे. या सर्व गोष्टीत मंत्री म्हणून आमदार बाळासाहेब थोरात यांनी केवळ बैठका घेण्यातच धन्यता मानली. सामान्यांची लुट करणार्या एकाही रुग्णालयावर त्यावेळी कारवाई झाली नाही. अशावेळी त्यांनी महायुती सरकारकडे श्वेतपत्रिका काढण्याची मागणी करणं हास्यास्पद असल्याचा घणाघातही जहागिरदार यांनी केला आहे. गेल्या चाळीस वर्षांपासून आमदार बाळासाहेब थोरात यांच्याकडे तालुक्यातील सर्व सत्तास्थाने आणि नगरपालिकेची सत्ता आहे. परंतु त्यांनी तालुक्यात सर्व सुविधांनी युक्त असलेले एकही सरकारी रुग्णालय उभारले नाही. त्यांनी आजवर कधीही सर्वसामान्य माणसांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्याचे काम केले नाही, त्यांना जनहिताची कामे करणार्या राज्य सरकारवर विनाकारण टीका करण्याचा कोणताही अधिकार नसल्याचेही जावेद जहागिरदार यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. त्यांच्या या टीकेला स्थानिक काँग्रेसकडून कशाप्रकारे उत्तर दिले जाते हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.