संगमनेरचे लोकप्रतिनिधी यंदा इतिहास लिहिणार! सलग नवव्यांदा निवडणुकीच्या रिंगणात; देशात नऊवेळा जिंकलेले अवघे दोघे..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
सांगोल्याचे दिवंगत नेते गणपतराव देशमुख यांच्यानंतर महाराष्ट्रात सर्वाधीक वेळा सभागृहात पोहोचलेले संगमनेरचे लोकप्रतिनिधी बाळासाहेब थोरात यंदा सलग नवव्यांदा निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या बरोबरीचा दांडगा अनुभव असलेले देशात आज अवघे दोनच आमदार असून राज्यात देशमुखांनंतर आता बाळासाहेब थोरात नवा इतिहास लिहिण्यासाठी सज्ज झाले आहेत. यावेळी ते मोठ्या मताधिक्क्याने विजयी होतील व या सुवर्ण क्षणांमध्ये संपूर्ण संगमनेर तालुका त्यांच्यासोबत असेल असा विश्वास त्यांच्या समर्थकांना वाटतो. त्यातच राज्यातील महाविकास आघाडीच्या समन्वयाची सूत्रेही त्यांच्या हाती असल्याने आघाडीतील सर्वात मोठा पक्ष या नात्याने त्यांच्याकडे भावी मुख्यमंत्री म्हणूनही बघितले जात आहे. अशावेळी संगमनेरातून त्यांना मिळणारे मताधिक्क्य जमेची बाजू ठरणार आहे.
नंतरचा अपवाद वगळता संविधान अस्तित्त्वात आल्यापासून काँग्रेसच्या विचारधारेशी जोडलेल्या संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे 1985 पासून प्रतिनिधीत्व करणार्या बाळासाहेब थोरातांनी सामान्य माणसाच्या जीवनात बदल घडवण्यासाठी आपली राजकीय कारकीर्द खर्च केली. दिवंगत नेते भाऊसाहेब थोरात यांच्या मूशीतून घडलेल्या बाळासाहेब थोरात यांनी सहकारातून समृद्धीचा मंत्र तालुक्याच्या कानाकोपर्यात पोहोचवून अगदी तळागाळापर्यंत त्याचा लाभ देण्याचा प्रयत्न केला. कायम दुष्काळी म्हणून हिणवल्या जाणार्या तालुक्याला समृद्ध करायचे असेल तर निळवंडे धरणाशिवाय पर्याय नसल्याचे ताडून त्यांनी सुरुवातीपासून या धरणासाठी आग्रह धरला. 1999 साली स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या मंत्रीमंडळात संधी मिळाल्यानंतर त्यांनी पाटबंधारे खाते मागून घेत निळवंडेच्या कामाला गती दिली.
तालुक्याच्या ग्रामीण भागाप्रमाणेच त्यावेळी संगमनेर शहराचा पाणीप्रश्नही खूप बिकट होता. नदीपात्रात आवर्तन सुरु असताना भरपूर पाणी आणि क्लोजरच्या कालावधीत पाण्यासाठी वणवण असे चित्र होते. त्यातून संगमनेरकरांची सुटका व्हावी, महिलांच्या डोक्यावरचे हंडे खाली उतरावे यासाठी त्यांनी मंत्रीपदाचा कस लावून संगमनेर शहरासाठी स्वतंत्र पाईपलाईन मंजूर केली. धरणाच्या भिंतीचे काम वेगात असतानाच पाईपलाईनही मंजूर झाल्याने 2003 साली प्रत्यक्ष धरणाच्या भिंतीत संगमनेरचा पाईप टाकला गेला. तेथून भौगोलिक, राजकीय, व्यक्तिगत असे कितीतरी अडथळे ओलांडीत धरणातून आलेली ही थेट लाईन संगमनेरात पोहोचली आणि संगमनेरच्या कितीतरी पिढ्यांनी भोगलेला बिकट पाणीप्रश्न कायमचा सुटला.
भविष्यात राजकीय स्थिती भिन्न असण्याची शक्यता गृहीत धरुन त्यांनी सलग मिळालेल्या मंत्रीपदाचा पूरेपूर वापर या धरणासाठी केला. मोठ्या प्रमाणात निधी मिळवून धरणाचे काम सुरु असतानाच तालुक्यातून जाणार्या कालव्यांची कामेही सुरु केली गेली. झोळ्याजवळील गणेशवाडी आणि कौठे कमळेश्वर येथे डोंगराला भगदाड पाडून बोगद्यातून कालवे काढले गेले. त्यामुळे धरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर कालव्यांसाठी वर्षोनु वर्ष प्रतिक्षा करण्याची वेळ आली नाही. एखाद्या राजकीय व्यक्तिने आपली कारकीर्द सुरु करताना एखादे स्वप्नं पहावे आणि ते आपल्या हातून पूर्ण होत असल्याचे चित्र वास्तावात दिसावे यापेक्षा दुसरा आनंद नसतो. तो अनुभवण्याची संधी संगमनेरच्या नेतृत्त्वाला मिळाली आहे.
राजकारणात उतरण्यापूर्वीच पाण्याचा प्रश्न घेवून आंदोलन करणार्या बाळासाहेब थोरात यांनी आपलं संपूर्ण राजकारण पारंपरिक दुष्काळी मानल्या गेलेल्या संगमनेर तालुक्यात पाणी आणण्यासाठी खर्च केलं. त्यांच्या या भगीरथ प्रयत्नातूनच जवळपास साडेआठ टीएमसी क्षमतेच्या निळवंडे धरणाचे काम तडीस जावून त्यांच्या डाव्या कालव्याद्वारे तालुक्यातील 43 गावांमधील 15 हजार 393 हेक्टर क्षेत्र व उजव्या कालव्याद्वारे 37 गावांमधील 10 हजार 35 हेक्टर क्षेत्र असे एकूण संगमनेर तालुक्याच्या दुष्काळी भागातील 80 गावांमधील 25 हजार 428 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. पाण्याशिवाय कोणताही तालुका सधन होवू शकत नाही. त्यामुळे पाणी आणण्यासाठी अविरत प्रयत्न झाल्याने त्याचा परिणाम संगमनेरच्या अर्थकारणावरही झाला आहे.
संगमनेरची समृद्ध बाजारपेठ त्याचे सर्वोत्तम उदाहरण आहे. डोंगरी असलेल्या संगमनेर तालुक्यातील संपन्न बाजारपेठेचा लौकीक जिल्ह्यासह आसपास सर्वत्र आहे. यंदाच्या दिवाळीत संगमनेरच्या बाजारपेठेत सुमारे सातशे कोटींची उलाढाल झाल्याचाही अंदाज व्यक्त होतोय. कोणत्याही शहरातील शांतता व सुव्यवस्था, निर्भयी वातावरण या गोष्टी खूप परिणामकारक असतात. संगमनेरात ते अविरत असल्याने येथील बाजारपेठ दुकानांनी आणि त्यातून होणार्या कोट्यवधींच्या उलाढालीने सजली आहे. जिल्ह्यात संगमनेरची ओळख शिक्षण पंढरी म्हणूनही आहे. वेगवेगळ्या शिक्षण संस्था आणि त्यातून मिळणारे दर्जेदार व्यावसायिक शिक्षण ही गोष्टही संगमनेरसाठी खूप सन्मानाची आहे. त्यामुळे गेली चार दशके बाळासाहेब थोरात यांनी चढत्याक्रमाने मताधिक्क्य घेत विधानसभा गाठली आहे.
यावेळी ते सलग नवव्यांदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यावेळी त्यांच्या खांद्यावर राज्याचाही भार टाकण्यात आल्याने आचारसंहिता लागल्यापासूनच त्यांचे राज्यव्यापी दौरे सुरु आहेत. राज्यात येणार्या केंद्रीय नेत्यांच्या सभांचे नियोजनही त्यांना पार पाडावे लागत आहे. अशावेळी त्यांना आपल्या मतदारसंघाबाबत विचारता ते अतिशय आत्मविश्वासने माझा मतदारच माझा प्रचार करतोय असे सहज सांगून जातात. तर, त्यांचे समर्थक, कार्यकर्ते यावेळी साहेब राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी त्यांना विक्रमी मताधिक्क्य मिळवून देण्याचा आत्मविश्वास बाळगून आहेत. संगमनेर मतदारसंघ थोरात यांना मानणारा समजला जातो. त्यामुळे विधानसभा सदस्यत्वाचा नवा इतिहास लिहितांना संगमनेरकर त्यांना किती मताधिक्क्य देतात हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.
राज्य विधानसभेत 11 वेळा निवडून येत तब्बल 54 वर्ष सांगोल्याचे लोकप्रतिनिधीत्व करणार्या गणपतराव देशमुख यांच्या विक्रमाची नोंद गिनिज बुकमध्येही झाली आहे. त्यांच्यानंतर सलग दहावेळा निवडून येण्याचा मान तामीळनाडूचे दिवंगत नेते एम.करुणानिधी यांना आहे. तामीळनाडूचे के.ए.सेंगोट्टायन व आसामचे फनीभूषण चौधरी 2021 मध्ये झालेल्या निवडणुकीत सलग नवव्यांदा विजयी झाले. तर, संगमनेरचे बाळासाहेब थोरात यंदा नवव्यांदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यावेळी त्यांचा विजय त्यांना राज्यात दुसर्या तर, देशात तिसर्यास्थानी नेणारा ठरेल.