स्वखर्चातून कुरकुटवाडीतील आदिवासी वाडीचा पाणी प्रश्न सोडवला! नूतन उपसरपंच बाळासाहेब कुरकुटे यांच्या दायित्वाचे सर्वत्र कौतुक

नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील कुरकुटवाडी येथील नूतन उपसरपंच बाबासाहेब कुरकुटे यांनी स्वखर्चातून वर्षांनुवर्षांपासून पिण्याच्या पाण्यापासून वंचित असलेल्या पानोबावाडीचा (आदिवासी वाडी) प्रश्न मार्गी लावला आहे. यामुळे आदिवासी बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, कुरकुटे यांच्या दायित्वाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

कुरकुटवाडी अंतर्गत पानोबावाडी (आदिवासी वाडी) असून वर्षांनुवर्षांपासून येथील आदिवासी महिला जवळ असलेल्या एअरवॉल्व्हवर पाणी भरत असे. त्यामुळे महिलांना तासन्तास येथे ताटकळत थांबावे लागत. कायमचा पाणी प्रश्न सुटेल या भाबड्या आशेवर महिला रोज दिवस ढकलत होत्या. याची गांभीर्याने दखल घेत कुरकुटवाडीचे नूतन उपसरपंच बाळासाहेब कुरकुटे यांनी स्वखर्चातून या वाडीचा पाणी प्रश्न मार्गी लावण्याचा निश्चय केला. त्यानुसार बोअरवेल घेतला आणि त्याला ईश्वरी कृपेने त्यास भरपूर पाणीही लागले. हे पाणी पाहून आदिवासी महिलांसह सर्वांचेच चेहरे आनंदाने फुलून गेले होते. या कामास सुमारे एक लाख रुपयांच्या आसपास खर्च आला आहे.

दरम्यान, गुरुवारी (ता.18) संध्याकाळी पाणी पुजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी जिल्हा परिषदेतील काँग्रेस गटनेते अजय फटांगरे उपस्थित होते. ते म्हणाले, उपसरपंच बाळासाहेब कुरकुटे यांनी स्वखर्चातून बोअरवेल घेत वाडीतील लोकांची तहान भागवली ही खरोखरच कौतुकास्पद बाब आहे. सगळ्यांनी एकत्र येवून काम केले तर नक्कीच गावचा विकास झाल्या शिवाय राहणार नाही असा आशावाद व्यक्त करत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार डॉ.किरण लहामटे यांच्या माध्यमातून आपण विकास कामे करत असून, जिल्हा परिषदेच्या माध्यमातूनही जेवढा निधी देता येईल तेवढा निधी देवू असा विश्वासही दिला.

नूतन सरपंच संगीता कुरकुटे, माजी सरपंच अरूण कुरकुटे, अंकुश कुरकुटे, जयहिंद युवा मंचचे अध्यक्ष सुहास वाळुंज, पठारभाग युवक काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब कुर्‍हाडे, हॉटेल समाधानाचे मालक नवनाथ आहेर, निखील कुरकुटे, महादू कुरकुटे, सुनील कुरकुटे, पांडुरंग कुरकुटे, शिवाजी कुरकुटे, सयाजी कुरकुटे, सचिन कुरकुटे, साईनाथ कुरकुटे, प्रमोद कुरकुटे, नवनाथ कुरकुटे, नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य नूतन कुरकुटे, ऐश्वर्या कुरकुटे, संगीता कुरकुटे, राजेंद्र मधे, आशुतोष कालेकर, रवींद्र कुरकुटे आदी उपस्थित होते.

Visits: 139 Today: 1 Total: 1098490

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *