बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतविरोधात एफआयआर दाखल करा!

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतविरोधात एफआयआर दाखल करा!
वांद्रे न्यायालयाचा मुंबई पोलिसांना आदेश; धार्मिक तेढ निर्माण करत असल्याचा आरोप
मुंबई, वृत्तसंस्था
सतत आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असणारी बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतविरोधात एफआयआर दाखल करण्याचा आदेश देण्यात आला आहे. वांद्रे न्यायालयाने मुंबई पोलिसांना हा आदेश दिला असून यामुळे कंगनाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कंगनासोबत तिची बहीण रंगोली विरोधातही एफआयआर दाखल करण्यास सांगण्यात आलं आहे. कंगना आणि रंगोली ट्विट आणि मुलाखतींच्या माध्यमातून धार्मिक तेढ निर्माण करत असल्याचा आरोप आहे. ‘आज तक’ वृत्तवाहिनीने यासंबंधी वृत्त दिलं आहे.


वांद्रे न्यायालयात कंगनाविरोधात दोन व्यक्तींनी याचिका दाखल केली होती. याचिकेत आरोप करण्यात आला आहे की, कंगना बॉलिवूडमधील हिंदू आणि मुस्लीम कलाकारांमध्ये दरी निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. याशिवाय ती हिंदू-मुस्लीम समुदायात धार्मिक तेढही निर्माण करत आहे. कंगना वारंवार आक्षेपार्ह ट्विट करत असून यामुळे केवळ धार्मिक भावनाच नाही तर बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटींनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याचिकाकर्त्यांनी न्यायालयासमोर पुरावे म्हणून कंगनाचे ट्विट्स आणि व्हिडीओ सादर केले आहेत. त्यानंतर न्यायालयाने कलम 156 (3) अंतर्गत एफआयआर दाखल करण्याचे आदेश मुंबई पोलिसांना दिले आहेत.


याचिकाकर्त्यांनी आधी वांद्रे पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. पण पोलिसांनी तक्रार दाखल करुन घेण्यास नकार दिल्यानंतर त्यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. यावेळी न्यायालयाने कंगनाविरोधात एफआयआर दाखल करण्याचा आदेश दिला. कंगना बॉलिवूडला बदनाम करण्याचा प्रयत्न करत असून सोशल मीडियापासून ते टीव्हीपर्यंत सगळीकडे विरोधात बोलत असल्याचाही उल्लेख यावेळी न्यायालयात करण्यात आला.

Visits: 128 Today: 1 Total: 1598220

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *