धक्कादायक; राहुरीतील डॉक्टरचा महिलेची प्रसूती करण्यास नकार! शेतकरी पित्यासह गर्भवतीची हेळसांड; कारवाईची सामाजिक संघटनांची मागणी


नायक वृत्तसेवा, राहुरी
मध्यरात्री प्रसुतीसाठी आलेल्या गर्भवतीला कोरोना नसतानाही तिचा अहवाल पॅाझिटिव्ह असल्याचे खोटे सांगून व तिच्या वडिलांकडून पैसे उकळून तिच्यावर उपचार करण्यास राहुरी येथील पाण्याच्या टाकीजवळील एका डॉक्टरने नकार दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे गर्भवती महिलेसह सुमारे 50 किलोमीटरहून दुचाकीवर आलेल्या शेतकरी पित्याची मोठी हेळसांड झाली आहे. या प्रकाराविषयी नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत असून संबंधित डॉक्टरवर कारवाई करण्याची मागणी काही सामाजिक संघटनांनी केली आहे.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, राहुरी तालुक्याच्या पूर्वभागातील एका गावातील सर्वसामान्य शेतकर्‍याची कन्या असलेली एक गरोदर महिला गरोदरपणाच्या पहिल्या महिन्यापासून राहुरी शहरातील पाण्याच्या टाकीजवळ असणार्‍या डॉक्टरकडे नियमित उपचार घेत होती. डॉक्टरांनी या गर्भवती महिलेला 6 मे ही प्रसुतीची तारीख दिली होती. परंतु 4 मे रोजी मध्यरात्री या गर्भवती महिलेच्या पोटात दुखू लागल्याने तिच्या वडिलांनी तिला संबंधित डॉक्टरच्या रुग्णालयामध्ये दुचाकीवरून तत्काळ उपचार व्हावे म्हणून आणले. तेथे डॉक्टर उपस्थित नसल्याचे तेथील परिचारिकेने सांगून या गरोदर महिलेची स्वतःच्या हाताने स्वॅब घेऊन कोरोना चाचणी केली. ही चाचणी देखील निगेटिव्ह आली. मात्र, त्या महिलेला पॉझिटिव्ह चाचणी आल्याचे सांगितले गेले. डॉक्टर येथे दाखल करून घेणार नाही, तुम्ही तिला अहमदनगर येथे घेऊन जाण्याचा सल्ला दिला. गर्भवती महिलेला प्रचंड प्रसुती कळा होत असताना देखील कुठलीही दयामाया दाखविली नाही.

त्यानंतर शेतकरी पित्यो आपल्या गर्भवती मुलीला दुचाकीवर मध्यरात्री उंबरे येथील सरकारी दवाखान्यात नेले. तेथे देखील वीज व मनुष्यबळ नसल्यामुळे काही उपचार होऊ शकले नाही. अशा परिस्थितीत प्रसुतीकळा सोसत रात्रभर ही गर्भवती महिला उंबरे येथील सरकारी दवाखान्यात पडून होती. त्यानंतर सकाळी तिच्या वडिलांनी पुन्हा राहुरी शहरात आणले आणि शहरातील एका प्रसुतीगृहात तिची प्रसुती केली. शेतकरी आणि त्या महिलेची मोठी हेळसांड झाल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला असून, संबंधत डॉक्टरवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *