कारवाईच्या भितीने संगमनेरातील ‘गुटखा तस्कर’ झाले भूमिगत! नव्या संधीसाधू तस्करांचा गोरखधंद्यात प्रवेश झाल्याने गुटख्याचे दर भिडले आभाळाला

नायक वृत्तसेवा, संगमनेर
श्रीरामपूर पोलिसांनी जिल्ह्यातील गुटखा तस्करीवरील पडदा उठविल्यानंतर ठिकठिकाणी स्थानिक गुटखा तस्करांविरोधात कारवाईचा धडाका सुरु झाला आहे. याच कडीत शुक्रवारी नगरमध्येही मोठ्या कारवाईतून जवळपास चौदा लाख रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. एकीकडे जिल्हाभर कारवाई सुरु असतांना संगमनेरात मात्र सबकुछ अलबेल असल्याचे चित्र आहे, त्यामुळे नागरिकांमधून आश्चर्य आणि संताप दोन्ही व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे संगमनेरातील नामचीन गुटखा तस्कर सध्या कारवाईच्या भितीने भूमिगत झाले असून या क्षेत्रात उगवलेल्या काही नव्या तस्करांनी अधिक पैशांच्या लालसेने गुटख्याच्या किंमती आभाळाला टेकवल्या आहेत. त्यामुळे गुटखा शौकीन मेटाकूटीला आले असून काय करायची ती एकदाची कारवाई करुन हा गोरख धंदा कायमस्वरुपी बंद तरी करुन टाका अशी आर्त हाकच त्यांनी दिली आहे.

गेल्या आठवड्यात श्रीरामपूर पोलिसांनी एकलहरे येथील एका गुटखा तस्कराच्या गोदामावर छापा घालून बहुधा जिल्ह्यात आजवरचा सगळ्यात मोठा गुटख्याचा साठा जप्त केला होता. या प्रकरणी राहाता तालुक्यातील निमगाव निघोज येथील विजय चोपडा आणि संगमनेर तालुक्यातील निमगाव जाळी येथील संतोष डेंगळे या मुख्य आरोपींसह पाच जणांवर गुन्हा दाखल करुन त्यातील तिघांना अटकही करण्यात आली, तर अटकेच्या भितीने पोलीस पोहोचण्यापूर्वीच दोन्ही मुख्य संशयित मात्र पसार झाले. आश्वी पोलिसांच्या नाकावर टिच्चून संतोष डेंगळे हा महाभाग गेल्या अनेक वर्षांपासून निमगाव जाळीतून जवळपास निम्म्याहून अधिक जिल्ह्यात गुटख्याचा पुरवठादार म्हणून संपूर्ण जिल्ह्याला परिचयाचा असतांना त्याचा सुगावा आश्वी पोलिसांना लागू नये यातच मोठी ‘गोम’ आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही.

संतोष डेंगळेकडूनच संगमनेर तालुक्यातील मोठ्या तस्करांना गुटख्याचा पुरवठा केला जात होता. त्याशिवाय ‘ऊचे लोग, ऊची पसंद’ म्हणून गुटखा शौकीनांमध्ये नाव असलेल्या गुटख्याचे संगमनेरातही मोठ तस्कर आहेत. मात्र श्रीरामपूर पोलिसांच्या कारवाईचा हात थेट निमगावजाळीतील गोदामापर्यंत पोहोचल्याने संगमनेरातील तस्करांचे धाबे दणाणले आणि त्यांनी आपल्याकडील गुटख्याच्या साठ्याची विल्हेवाट लावून फोन ‘स्वीचऑफ’ करीत अज्ञातवास धारण केला आहे.

त्यामुळे संगमनेर तालुक्यात येणारा गुटखा जवळपास बंद झाला असून तालुक्यातील पान टपर्यांवर गुटख्याची अभूतपूर्व टंचाई निर्माण झाली आहे. त्याचा परिणाम सात रुपये मूळ किंमत असलेला आणि बारा रुपयांना विकला जाणारा आरएमडी गुटखा आज 18 ते 20 रुपये तर अवघ्या चार रुपयांना मिळणारा हिरा गुटखा 10 ते 12 रुपयांना मिळत आहे. शहरातील मोठे गुटखा तस्कर भूमिगत झाल्यानंतर निर्माण झालेल्या गुटखा पोकळीत काही नवे बहाद्दर उतरले असून आसपासच्या जिल्ह्यातून चोरटी वाहतूक करीत आणलेला गुटखा चढ्या भावाने विकला जात आहे. त्यामुळे गुटखा शौकीनांची परवड सुरु आहे.

आठवड्याभरापूर्वी श्रीरामपूर पोलिसांनी एकलहरे (ता.श्रीरामपूर) परिसरातील एका शेतात असलेल्या गोदामावर छापा घातला होता. या छाप्यात पोलिसांच्या हाती तब्बल 54 लाखांचा गुटखा लागला. या प्रकरणात पोलिसांनी आत्तापर्यंत राहाता तालुक्यातील निमगाव निघोज परिसरातील साहिल विजय चोपडा व वैभव शांतीलाल चोपडा या काका-पुतण्यांसह फिरोज पठाण, सलमान तांबोळी व करीम शेख यांना अटक केली आहे. त्यांच्या चौकशीतून गुटखा तस्करीचा तपास थेट संगमनेर तालुक्यातील निमगाव जाळीपर्यंत येवून पोहोचल्यानंतर गेल्या शनिवारी श्रीरामपूर पोलिसांनी निमगाव जाळीतही छापा घातला होता. यावेळी पोलिसांना चार लाखाच्या गुटख्यासह तब्बल 20 लाखांचा मुद्देमाल सापडला, तर गुरुवारी (ता.15) एकलहरे परिसरातील अन्य एका बंद गोदामावरील छाप्यातून पुन्हा 11 लाखांचा गुटखा हस्तगत करण्यात आला.

गुरुवारी (ता.15) नगर पोलिसांनी तोफखाना पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणार्या शेरकर गल्ली भागात छापा घालीत 13 लाख 92 हजार 729 रुपयांचा गुटखा जप्त केला. अतिरीक्त पोलीस अधीक्षक डॉ.दत्ताराम राठोड यांच्या पथकाने केलेल्या या कारवाईत नगरमधील मोठा गुटखा तस्कर समजल्या जाणार्या शुभम रमणलाल भळगट (वय 24, रा.शेरकर गल्ली, नगर) याला अटक केली व त्याची जामीनावर सुटकाही झाली. श्रीरामपूरातील कारवाईनंतर जिल्ह्यात ठिकठिकाणी छापासत्र सुरु असतांना संगमनेरात मात्र ‘सबकुछ अलबेल’ असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे शहरात उलटसुलट चर्चेला उधाण आले असून नागरिकांमधून गुटखा तस्करांचे पोलीस खात्यातील काहींशी असलेले अर्थपूर्ण संबंध चर्चीले जात आहेत.

तालुक्यातील निमगाव जाळी येथील गुटखा तस्कर संतोष डेंगळे गेल्या अनेक वर्षांपासून या गोरखधंद्यात सक्रीय आहे. त्याच्याकडे हिरा गुटख्याचे कामकाज असून जवळपास निम्म्याहुन अधिक जिल्ह्याला त्याच्याकडून गुटख्याचा पुरवठा केला जातो. संगमनेरात यापूर्वी झालेल्या काही कारवायांमध्ये संबंधिताला सोडवण्यासाठी त्याने पोलीस ठाण्यात हेलपाटे मारल्याचेही दाखले उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे कर्नाटकातील निपाणी येथून त्याला थेट गुटखा पोहोचवला जातो. त्याच्या गोदामापर्यंत माल पोहोचवण्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित कंपनी घेते व कोणत्याही अडथळ्याशिवाय सुमारे सातशे किलोमीटर अंतर कापून त्याला अगदी सहीसलामत डिलीव्हरीही देते यावरुन या धंद्यात कोणाकोणाचे हात ओले झालेले असतील आणि निमगाव जाळीतील तो तस्कर किती मोठा असेल याचा सहज अंदाज बांधता येवू शकतो.

