संगमनेरात पालिकेची प्लास्टिक जप्तीची कारवाई 55 हजार रुपयांचा दंडही वसूल; यापुढेही कारवाई सुरूच राहणार
नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर नगरपरिषदेच्या प्लास्टिक विरोधी पथकाने शहरातील व्यावसायिकांवर प्लास्टिक जप्तीसह 55 हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी दिली.
महाराष्ट्र शासनाच्यावतीने प्लास्टिक वापरावर बंदी घातलेली असताना व संगमनेर नगरपरिषदेने सुद्धा प्लास्टिक वापर व साठा करण्यावर बंदी घातलेली आहे. तरी देखील शहरातील काही व्यावसायिक प्लास्टिकचा साठा व विक्री करताना निदर्शनास आले असून याची गंभीर दखल घेत प्रांताधिकारी तथा नगरपरिषदेचे प्रशासक डॉ. शशीकांत मंगरुळे व मुख्याधिकारी राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषदेच्या प्लास्टिक विरोधी पथकाने शहरातील बाजारपेठ, मेन रोड, सय्यद बाबा चौक, नवघर गल्ली, पंजाबी कॉलनी आदी ठिकाणी व्यवसाय केंद्राची तपासणी केली असता प्लास्टिकचा साठा व विक्री करताना व्यावसायिक आढळून आले. या व्यवसाय केंद्रांवर कारवाई करत सुमारे दोनशे किलोग्रॅम प्लास्टिकच जप्त करुन 55 हजार रुपयांची दंडात्मक कारवाई केली.
शासन व पालिकेने यापूर्वीच प्लास्टिक वापरावरवर बंदी घातलेली असून नागरिकांनी प्लास्टिकचा वापर करणे टाळावे. पर्यावरणाच्या दृष्टीने प्लास्टिक वापर अत्यंत घातक असून त्याचे विघटन होत नाही. तसेच प्लास्टिक पिशवी कागदाचा वापर केल्यानंतर इतरत्र फेकल्याने गटारीत पडून पर्यायी गटारी तुंबतात, जनावरांच्या पोटात प्लास्टिक गेल्याने त्यांना प्रसंगी आपला प्राणही गमवावा लागतो. यासाठी नागरिकांनी प्लास्टिक पिशवीचा वापर न करता कापडी पिशवीचा वापर करण्याचे आवाहन मुख्याधिकारी वाघ यांनी केले आहे. यापुढील काळात देखील ही कारवाई तीव्र स्वरुपात करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या कारवाईत पालिकेचे नोडल अधिकारी सुनील गोर्डे, आरोग्य विभागाचे अश्विन पुंड, अरविंद गुजर, चंद्रकांत ढोले, जयराम मंडलिक, सागर गायकवाड, नितीन त्रिभुवन आदी कर्मचारी सहभागी होते.