आंदोलनाचा दणका; अनधिकृत पोल्ट्री फार्म सील

नायक वृत्तसेवा, देवळाली प्रवरा
देवळाली प्रवरा परिसरातील अनधिकृत पोल्ट्री फार्म बंद करण्याच्या मागणीसाठी बहुजन समाज पार्टीचे जिल्हा सचिव चंद्रकांत संभाजी दोंदे यांनी राहुरी तहसील कार्यालयासमोर केलेल्या आमरण उपोषणानंतर अखेर देवळाली प्रवरा नगरपालिकेने संबंधित पोल्ट्री फार्म सील करण्याची कारवाई केली.

दोंदे यांनी शहरातील बेकायदेशीर पोल्ट्री फार्मविरोधात गेल्या अनेक दिवसांपासून पाठपुरावा केला होता. वारंवार निवेदने देऊनही नगरपरिषद व तहसील प्रशासनाकडून दुर्लक्ष झाल्याने त्यांनी १ ऑक्टोबरपासून आमरण उपोषण सुरू केले होते. प्रशासनाकडून आश्वासन मिळाल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले. नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे अभियंता निखिल नवले यांच्या मार्गदर्शनाखाली विद्युत अभियंता भुषण झरकर, नगररचना विभाग प्रमुख अमोल जाधव, बांधकाम अभियंता दिनकर पवार, अभिषेक सुतावणे, वैभव ठोंबरे, संभाजी वाळके, आरोग्य विभाग प्रमुख कृष्णा महांकाळ, भारत साळुंखे, अरुण कदम, सोमनाथ सुर्यवंशी, अकील शेख, दानिश पठाण, प्रसन्न पंडीत, बाळासाहेब चव्हाण, विशाल खरात आदी अधिकाऱ्यांनी जागेवर पाहणी करून पोल्ट्री फार्म सील केले.या कारवाईमुळे परिसरातील सुवर्णा दोंदे, चंद्रकांत दोंदे यांनी समाधान व्यक्त करीत प्रशासनाचे आभार मानले.

Visits: 115 Today: 1 Total: 1802069
