बेलापूर येथील पाण्याची टाकी धोकादायक स्थितीत
नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
तालुक्यातील बेलापूर गावाला पाणी पुरवठा करणार्या पाच लाख लिटर क्षमतेच्या एकमेव टाकीचे सन 1970 मध्ये बांधकाम करण्यात आले होते. जिल्हा परिषदेच्या सूचनेवरून ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयाने केलेल्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये ती धोकादायक झाल्याचा अभिप्राय नोंदविण्यात आला आहे. त्यातून टाकी पाडण्यात यावी असेही सांगण्यात आले. मात्र मागील सत्ताधार्यांनी कोणतीही कार्यवाही केली नाही. पर्यायी दुसरी टाकी देखील उभारली नाही, असे साळवी व खंडागळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
सद्यस्थितीत ही पाण्याची टाकी कोणत्याही क्षणी पडण्याच्या स्थितीत आहे. येथे मोठा अपघात घडण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास गावाला पर्यायी पाणी पुरवठा करणारी यंत्रणा नाही. त्यामुळे 2021-2022 या आर्थिक वर्षात 15 व्या वित्त आयोगातून 10 लाख लिटर क्षमतेची टाकी बांधण्यासाठी तरतूद केली जाणार आहे. गावातील इतर विकास कामांवर त्याचा परिणाम होणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. गावातील रस्ते, गटारी या कामासाठी जिल्हा परिषद, जिल्हा नियोजन समिती यांच्याकडून निधी मिळवण्यासाठी प्रयत्न केले जातील. मागील काळात चार कोटी खर्चाची पाणी पुरवठा योजना प्रस्तावित केल्याचे तत्कालीन सत्ताधारी मंडळींनी सांगितले. मात्र त्यात वाड्या-वस्त्यांचा समावेश नव्हता व नवीन टाकी प्रस्तावित केलेली नाही, असे साळवी व खंडागळे म्हणाले. यावेळी सदस्य चंद्रकांत नवले, मुस्ताक शेख उपस्थित होते.