डबा घेवून गेला आणि आरोपी म्हणून तुरुंगात डांबला! कुरणमधील कुख्यात गोतस्कर गजाआड; पोलीस निरीक्षकांवरील हल्ल्यातही सहभाग..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
आठवड्याभरापूर्वी संगमनेरातील जमजम कॉलनीत झालेल्या कारवाईच्या धुळीचे लोट अजूनही हवेत उसळत असतांना सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास शहर पोलीस ठाण्यातून गंमतीशीर गोष्ट समोर आली आहे. संगमनेरातील बहुतेक गोवंश कत्तलखान्यांना जनावरांचा पुरवठा करणारा ‘मोन्या’ आपल्या ग्राहक असलेल्या आरोपींना बिर्याणीचा डबा घेवून पोलीस ठाण्यात पोहोचला, मात्र ज्यांच्यासाठी त्याने डबा नेला त्यांनीच त्याच्या नावाचा आणि सहभागाचा शिमगा केल्याने पोलिसांनी त्यालाही जमजम कॉलनी प्रकरणात गजाआड केले. अर्थात पोलिसंानी या घटनाक्रमाचा विरोध केला असून सदरचा आरोपी ‘वॉटेंड’ असल्याने पोलीस ठाण्याच्या आवारात दिसताच त्याच्या मूसक्या आवळल्याचे सांगितले.


याबाबत विश्‍वसनीय सूत्रांच्या हवाल्याने प्राप्त झालेल्या वृत्तानुसार गेल्या शनिवारी (ता.2) संगमनेरातील जमजम कॉलनीत अहमदनगरच्या पोलीस पथकाने छापा घालीत मोठ्या प्रमाणात गोवंशाचे मांस व मुद्देमाल हस्तगत केला होता. या प्रकरणात एकूण पाच कत्तलखान्यांवर कारवाई करतांना पोलिसांनी सात आरोपींवर गुन्हा दाखल केला होता. ही कारवाई कमी होती की काय म्हणून सरलेल्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशीही (ता.9) पोलिसांनी मोगलपूर्‍यात मारलेल्या छाप्यात साडेपाचशे किलो गोवंशाचे मांस हस्तगत करण्यासह पाच कत्तलखान्यांवर कारवाई करीत त्यातील चौघांना अटक केली, तर एकजण घटनास्थळावरुन पसार झाला. आठ दिवसांत झालेल्या या दोन्ही कारवायांमध्ये अटक केलेल आरोपी सध्या कारागृहात आहेत.


या पार्श्‍वभूमीवर सोमवारी (ता.11) मध्यरात्री साडेअकराच्या सुमारास शहर पोलीस ठाण्याच्या कारागृहात एक गंमतीशीर गोष्ट घडली. कत्तलखान्यांवरील कारवाईत सापडलेले आरोपी कारागृहात बसून गप्पा ठोकीत असतांनाच कुरण येथील रहिवासी असलेला शाकीब मोहंमद शेख उर्फ मान्या (वय 28) हा आपले ग्राहक व काही आरोपी नातेवाईक असलेल्यांना डब्यात बिर्याणी घेवून गेला. पोलीस ठाण्याच्या कार्यप्रणालीनुसार कारागृहाच्या सुरक्षेची जबाबदारी असलेले पोलीस कर्मचारी सर्वसाधारणपणे सद्यस्थितीतले गुन्हे अथवा त्यातील हवे असलेले आरोपी याबाबत अनभिज्ञ असतात. त्यानुसार सोमवारी भला मोठा डबा घेवून आलेल्या मोन्याबाबतही तसेच होते.


आरोपींसाठी डबा आणल्याने रात्रपाळीच्या सुरक्षा रक्षकांनी कारागृहाच्या बाह्य बाजूचे दार उघडले. यावेळी शाकीब उर्फ मोन्या शेख याच्या हातात मोठा डबा पाहून कारागृहातील आरोपी आनंदीत होण्याऐवजी मोठमोठ्याने आरडाओरड करु लागले. त्यामुळे पोलीस ठाण्यात असलेले अधिकारी व कर्मचारीही बाहेर आले. यावेळी कारागृहातील कत्तलखान्यांच्या बंदीवानांनी ‘हा संगमनेरातील मोठा गोतस्कर आहे, हाच आम्हाला गोवंशाचा पुरवठा करीत होता’ असे मोठमोठ्याने सांगायला सुरुवात केली. त्यावरुन पोलिसांनी तत्काळ डबा घेवून कारागृहाच्या दारात उभ्या असलेल्या मोन्याच्या मूसक्या आवळल्या आणि त्याजा जमजम कॉलनी प्रकरणात सहआरोपी करीत त्याला गजाआड केले.


याबाबत नेमकी वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी पोलिसांशी संपर्क केला असता वरीलप्रमाणे घटनाक्रम घडलाच नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले. सदरचा आरोपी वरील कारवाईमध्ये ‘वॉटेंड’ होता. पोलिसांकडून त्याचा शोधही सुरु होता, त्यासाठी काही ठिकाणी छापेमारीही करण्यात आल्याचे सांगण्यात आले. सोमवारी रात्री तो पोलीस ठाण्याच्या आवारात दृष्टीत पडताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले व तुरुंगात टाकले असा खुलासा पोलिसांकडून करण्यात आला आहे. मात्र ज्या आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांच्या म्हणण्यानुसार छापे टाकण्यात आले, मग तोच आरोपी स्वतःहून चक्क डबा घेवून पोलीस ठाण्यात कसा आला या प्रश्‍नाचे उत्तर मात्र अनुत्तरीतच राहीले.


शाकीब मोहंमद शेख उर्फ मोन्या हा इसम कुरण येथील रहिवासी असून भारतनगर परिसरातील सगळ्याच कत्तलखान्यांना गोवंश जनावरांचा मोठा पुरवठादार समजला जातो. यापूर्वी 2017-18 साली तत्कालीन पोलीस निरीक्षक गोविंद ओमासे यांच्या पथकावर कुरणमध्ये जीवघेणा हल्ला झाला होता. त्या हल्ल्यातही या आरोपीचा समावेश होता. याशिवाय गोतस्करी व गोवंश कत्तलीच्या अनुषंगानेही त्याच्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. असे असतांनाही तो चक्क आरोपींना डबा घेवून पोलीस ठाण्यात येतोच कसा? असा प्रश्‍न या निमित्ताने उभा राहीला आहे.

Visits: 11 Today: 1 Total: 117781

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *