दावा न केलेल्या ठेवी परत मिळवून देण्यासाठी विशेष जनजागृती मोहीम : नवले 

नायक वृत्तसेवा, संगमनेर 
जिल्ह्यातील विविध बँकांमधील वैयक्तिक, संस्थात्मक आणि सरकारी योजनांच्या खात्यांमध्ये सुमारे १६३ कोटी रुपयांच्या दावा न केलेल्या ठेवी शिल्लक आहेत. या ठेवींचा एकूण ९ लाख ४ हजार २८१  खातेदारांना परतावा मिळवून देण्यासाठी विशेष जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली असल्याची माहिती जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक  आशिष  नवले यांनी दिली.
ही मोहीम १ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत जिल्हा अग्रणी बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांच्या पुढाकाराने आणि सर्व सदस्य बँकांच्या सहकार्याने राबविण्यात येत  असल्याचेही आशिष नवले यांनी सांगितले. देशभरात सुमारे १ लाख ३५ हजार कोटी रुपयांच्या दावा न केलेल्या ठेवी विविध बँकांमध्ये शिल्लक आहेत. त्यापैकी महाराष्ट्र राज्यात ५८६६ कोटी रुपये, ज्यात वैयक्तिक खात्यांच्या ४६१२ कोटी, संस्थांच्या १०८२ कोटी, आणि सरकारी योजनांतील १७२ कोटी रुपयांच्या ठेवी समाविष्ट आहेत.रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमानुसार, १० वर्षांपासून निष्क्रिय असलेल्या खात्यांतील ठेवी ‘ठेवीदार शिक्षण आणि जागरूकता निधी मध्ये हस्तांतरित केल्या जातात. तथापि, खातेदारांना आपले पैसे परत मिळवण्याचा पूर्ण हक्क आहे.ठेवी परत मिळविण्यासाठी संबंधित खातेदारांनी आपल्या बँकेत संपर्क साधून आवश्यक कागदपत्रे व अद्ययावत केवायसी सादर करणे आवश्यक आहे.या मोहिमेद्वारे सर्व बँकांकडून जनजागृती शिबिरे व ग्राहक भेटी आयोजित केल्या जाणार असून, खातेदारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अग्रणी व्यवस्थापक आशिष  नवले  यांनी केले आहे.
जिल्ह्यातील ए.डी. सी. सी. बँक- ७१.५४ कोटी (५.९९ लाख खाती),स्टेट बँक ऑफ इंडिया-३०.२८ कोटी (०.७९ लाख खाती),सेंट्रल बँक ऑफ इंडिया-१३.९५ कोटी (०.६६ लाख खाती),युनियन बँक ऑफ इंडिया-१२.१५  कोटी (०.४८ लाख खाती),बँक ऑफ महाराष्ट्र-९.०८ कोटी (०.२४ लाख खाती) अशा प्रकारे जिल्ह्यातील प्रमुख बँकात  मोठ्या प्रमाणात दावा न केलेल्या ठेवी असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Visits: 44 Today: 5 Total: 1108881

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *