नायक वृत्तसेवा, संगमनेर 
राज्यातील इतर बसस्थानकापेंक्षा संगमनेरचे बसस्थानक अतिशय सुंदर आणि देखणे झाले आहे. पुणे- नाशिक या दोन महानगरांच्या रस्त्यावर संगमनेर येत असल्याने येथील बस स्थानकात नेहमीच प्रवाशांची वर्दळ असते. यामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा भरणा ही मोठ्या प्रमाणात असतो. गर्दीचा फायदा घेऊन अनेक चोरटेही आपला कार्यभाग येथे उरकतात. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे तर येथे अश्लील चाळे दररोजच पाहायला मिळतात. त्यातून या प्रेमी युगलांनी बस स्थानकाच्या जिन्यांचा ‘किस’ घेण्यासाठी व ‘विकृत चाळे’ करण्यासाठी उपयोग सुरू केला आहे. यातून अनेकदा वादावादी आणि मारामाऱ्या झाल्याच्या घटनाही वारंवार घडत असल्याने हा परिसर सतत चर्चेत असतो. बस स्थानकात शहर पोलिसांची चौकी आहे मात्र या चौकीत पोलिस दादांना बसण्यासाठी वेळ नसल्याने बस स्थानक परिसरातील गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
जुन्या पुणे- नाशिक राष्ट्रीय महामार्गावर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी संगमनेर बस स्थानकाची दोन मजली नजर लागेल अशी सुंदर इमारत आहे. या इमारतीत पूर्व बाजूला आणि उत्तर बाजूला खालच्या मजल्यांवर व्यापारी गाळे असून या गाळ्यांमध्ये विविध व्यावसायिकांनी दुकाने, मेडिकल, जनरल स्टोअर्स, स्टेशनरी, हॉटेल थाटली आहेत. तर दुसऱ्या मजल्यावर दवाखाने, विविध ऑफिसेस आणि वृत्तपत्राचे कार्यालय देखील आहे. तर इमारतीच्या पश्चिम बाजूस एसटी बसस्थानक आहे. तेथे दिवसभर आणि रात्री सुद्धा  शेकडो एसटी बस जा, ये करत असतात. तालुक्याच्या आणि तालुक्या शेजारच्या अनेक गावातून अनेक  तरुण-तरुणी ही महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी शिक्षणाचे ‘हब’ समजल्या जाणाऱ्या संगमनेरात येत  असतात. त्यातच गर्दुल्ले,दारूडे, भिकारी, हातात देवीचे फोटो घेऊन पैसे मागणाऱ्या महिला या गर्दीत भर घालतात.
अनेक भिकाऱ्यांनी हे बस स्थानक, स्वतःचे निवासस्थान समजून येथेच तळ ठोकला आहे. येथील गर्दीचा फायदा घेऊन अनेक चोरटे, प्रवासी महिला आणि पुरुषांचे दागिने चोरून आपला कार्यभाग उरकत असतात. एवढ्या सर्व कटकटी अगोदरच असताना आता महाविद्यालयीन तरुणांचा गोंधळही येथे कायमच पाहायला मिळतो. हे पिल्लू आपलं आहे, तू मेसेज का पाठवला? तू का बोलतो? अशा विविध विकृत कारणांवरून ओठावर मिसरूड न फुटलेल्या  महाविद्यालयीन तरुणात येथे अनेकदा जोरदार मारामाऱ्या झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. यात महाविद्यालयीन तरुणीही मागे नाहीत. एखाद्या फालतू पोराच्या नादी लागून त्याही बस स्थानकाच्या परिसरात अगदी कोणालाही न घाबरता अश्लील चाळे करत असतात.
प्रसंगी बसस्थानकाच्या जिन्यांचा वापर हे प्रेमी युगल एकमेकाला चिकटून ‘किस’ घेण्याचीही हौस भागवण्यासाठी करतात.हा किळसवाणा प्रकार पाहून येथे येणाऱ्या एखाद्या सज्जन पुरुषाने किंवा महिलांनी त्यांना दटावले तर हे प्रेमात आंधळे झालेले पोरं त्यांचाही वाकडे तिकडे बोलून अपमान करत असतात. त्यामुळे त्यांच्या भानगडीत सहसा कोणी पडत नाही. याचा फायदा घेत संगमनेरचे बसस्थानक मुंबईचे जुहु चौपाटी बनले आहे. अनेक महाविद्यालयीन तरुण-तरुणी शिक्षणाच्या नावाखाली घरून येथे येतात मात्र महाविद्यालयात न जाता बसस्थानक परिसरातच प्रेमाचे रंग उधळतांना दिसतात.
त्याचबरोबर बस स्थानक परिसरात अनेक भिकाऱ्यांनी डेरा दिला आहे. काहीजण तर अक्षरशः अर्ध नग्न अवस्थेत येथे पडलेले दिसतात. परिसरात मोकाट जनावरे रात्रीचे येऊन घाण करून जातात. त्या घाणीची दुर्गंधी येथे येणाऱ्या प्रवाशांना सहन करावी लागत आहे. जागोजागी घाणही मोठ्या प्रमाणात दिसून येते. त्यामुळे संगमनेर बस स्थानकाला तथाकथित प्रेमी युगलांचे, भिकाऱ्यांचे, चोरट्यांचे आणि घाणीचे ग्रहण लागले असून ते सोडवण्याची जबाबदारी बसस्थानक व्यवस्थापक आणि शहर पोलिसांची आहे. मात्र त्यांचेही याकडे दुर्लक्ष होत असल्याने येथील गुन्हेगारीत मोठी वाढ झाली आहे.
संगमनेर बस स्थानकात प्रवासी चौकशी केबिन जवळ पोलिसांना बसण्यासाठी व्यवस्था केलेली आहे. मात्र कधीही पोलीस दादा येथे बसत नाहीत. परिणामी दररोजच काही ना काही घटना येथे ऐकायला मिळतात. महिलांच्या गळ्यातील दागिने, त्यांच्या हातातील पर्स,पुरुष प्रवाशांच्या खिशातील पाकिटे चोरण्याचे प्रमाण तर या परिसरात अधिक आहे. त्यामुळे संगमनेर बस स्थानक परिसर सज्जन लोकांसाठी असुरक्षित बनले आहे.