गुरुवारची साईपालखी सुरू करण्याची संस्थानकडे मागणी

गुरुवारची साईपालखी सुरू करण्याची संस्थानकडे मागणी
नायक वृत्तसेवा, शिर्डी
शिर्डीचे साईबाबा मंदीर हे भक्तांसाठी अमृततुल्य गोष्ट आहे. साईबाबांचे अवघ्या जगभर भक्तगण आहेत. त्यांच्या दर्शनासाठी येणार्‍या भक्तांची संख्या देखील अगणित आहे. परंतु कोरोना संकटामुळे मंदीर दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे. तसेच श्री साईबाबांच्या हयातीपासून आजतगायत चालू असलेली गुरुवारची पालखी मार्च महिन्यात टाळेबंदीपासून बंद आहे. परंतु, ही पालखी सुरू करावी अशी मागणी शिर्डीच्या नगराध्यक्षा अर्चना कोते यांनी साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी के. एच. बगाटे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.


यावेळी माजी नगराध्यक्ष कैलास कोते, साई निर्माणचे संस्थापक अध्यक्ष विजय कोते, उपनगराध्यक्ष मंगेश त्रिभुवन, गटनेते अशोक गोंदकर, सामाजिक कार्यकर्ते नितीन कोते आदी मान्यवर उपस्थित होते. निवेदन पत्रात म्हंटले आहे की, साईबाबांच्या हयातीपासून दर गुरुवारी द्वारकामाईतून पालखी काढण्यात येत आहे. मात्र मार्च महिन्यापासून सदरचा पालखी सोहळा बंद करण्यात आला आहे. राज्यातील कोल्हापूर, तुळजापूर शेगाव आदी ठिकाणच्या देवस्थानांप्रमाणे शिर्डीतील साईबाबांची दर गुरूवारची पालखी संस्थानमार्फत कमीत कमी पुजारी तसेच पालखीसाठी लागणारे कर्मचारी यांच्यासह भक्तांसाठी लाईव्ह दर्शन व्यवस्था सुरू करावी यासाठी आम्ही शिर्डी ग्रामस्थ आपल्याला सहकार्य करू, असे पत्रात म्हटले आहे. दरम्यान, मंदीर दर्शनासाठी खुले करावे अशी मागणी सातत्याने होत आहे. याच पार्श्वभूमीवर शिर्डी येथील साईबाबा मंदीर आगामी काळात भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यासाठीच्या अभ्यासासाठी प्रशासकीय अधिकारी तिरुपती येथे रवाना झाले होते. तेथे तिरुपती संस्थानच्या प्रशासकीय अधिकार्‍यांबरोबर बैठक झाली. या बैठकीत देशपातळीवर प्रमुख देवस्थानांचे फेडरेशन करण्याचा प्रस्ताव देण्यात आला असल्याची माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी बगाटे यांनी दिली.

Visits: 112 Today: 2 Total: 1099038

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *