उक्कलगावमध्ये तमाशात राडा घातल्याप्रकरणी सरपंचाविरुद्ध गुन्हा पोलिसांबरोबर वाद घालणे आले अंगलट; ग्रामस्थांत उडाली खळबळ
![]()
नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
तालुक्यातील उक्कलगाव येथे हरिहर केशव गोविंद महाराज यात्रेनिमित्त आयोजित तमाशा कार्यक्रमात धुडगूस घालत कार्यक्रम बंद केला. पोलिसांना शिवीगाळ करून सरकारी कामात अडथळा आणला. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात उक्कलगावच्या सरपंचाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

सोमवारी (ता.4) सायंकाळी यात्रेनिमित्त सविता राणी पुणेकर यांचा लोकनाट्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या बंदोबस्तासाठी पोलीस नाईक रामेश्वर ढोकणे, पोलीस कर्मचारी निखील तमनर, हरीश पानसंबळ, गृहरक्षक दल जवान सद्दामशेख, रमेश गुंजाळ, शाहरुख नूम, सचिन नागडे, कमलेश गायकवाड हे बंदोबस्तावर होते. यावेळी कार्यक्रमास मोठ्या संख्येने ग्रामस्थ जमा झालेले होते. रात्री 9 वाजता कार्यक्रम सुरू झाला तो रात्री 10.15 वाजण्याच्या सुमारास बंद केला. त्यावेळी उक्कलगावचे सरपंच नितीन थोरात हे रंगमंचावर आले आणि उभे राहून हातात माईक घेत कार्यक्रम कोणी बंद पाडला आम्हाला माहीत आहे असे म्हणून शिवीगाळ केली. तेव्हा पोलीस नाईक रामेश्वर ढोकणे असे मंचावर जावून त्यांना समजावून सांगत खाली आणले.

कार्यक्रम पोलिसांनी का बंद केला? त्यांना कोणी सांगितले? गाव आपले आहे, असे म्हणून ते चिथावणी देत होते. तेव्हा त्यांना समजावून सांगत जमलेल्या लोकांना घरी जाण्यास सांगून गर्दी कमी केली होती. शिवाय सरपंच नितीन थोरात यांनाही समजावून सांगत काढून दिले. त्यानंतर मंगळवारी (ता.5) मध्यरात्री सरपंच नितीन थोरात हे लोकांना घेवून थांबलेले असताना मोठमोठ्याने पोलीस प्रशासनाविषयी वाईट भावनेने बोलत होते. म्हणून तेथे येवून त्यांना समजावून सांगत घरी जाण्यास सांगितले; परंतु त्यांनी काहीही ऐकले नाही. पोलीस कुत्रे आहेत, यांचा बेत पाहा रे… आता यांच्याकडे पाहावंच लागेल, असे म्हणून पोलिसांना शिवीगाळ करुन सरकारी कामात अडथळा निर्माण केला. याप्रकरणी पोलीस नाईक रामेश्वर ढोकणे यांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात नितीन आबासाहेब थोरात यांच्याविरुद्ध भादंवि कलम 353, 232, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
