निरोगी मन व तंदुरुस्त शरीरासाठी खेळ आवश्यक : माजी आ. डॉ. तांबे

नायक वृत्तसेवा, संगमनेर 
माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली अद्यावत सुविधा देणाऱ्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालयात आंतरविभागीय टेबल टेनिस व बॅडमिंटन स्पर्धेत ९ जिल्ह्यातील ५५० खेळाडूंनी सहभाग नोंदवला असून निरोगी मन व तंदुरुस्त शरीरासाठी खेळ आवश्यक असल्याचे प्रतिपादन माजी आ. डॉ. सुधीर तांबे यांनी केले.
कृषी क्रांतीचे जनक डॉ. स्वामीनाथन यांच्या जयंतीनिमित्त महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी व सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने अंतर महाविद्यालयीन टेबल टेनिस व बॅडमिंटन स्पर्धेचा शुभारंभ  द्रोणागिरी हॉलमध्ये झाला, त्यावेळी आयोजित कार्यक्रमात डॉ. तांबे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर विद्यापीठाचे डीन डॉ. एस. बी. खरबडे, विद्यार्थी कल्याण मंडळाचे डॉ. एस. बी. भनगे, क्रीडा अधिकारी डॉ. व्हि.आर. आवारी, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, व्यवस्थापक प्रा.  व्हि.बी.धुमाळ,  प्राचार्य डॉ. राजेंद्र वाघ, प्रशासकीय अधिकारी प्रा. जी.बी. बाचकर, डॉ. व्हि.डी. वाळे आदींसह विविध महाविद्यालयांचे प्राचार्य व शिक्षक उपस्थित होते. या स्पर्धेमध्ये कोल्हापूर ते नंदुरबार या नऊ जिल्ह्यातील ५५० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.

यावेळी बोलतांना  डॉ. तांबे म्हणाले की, भारत हा कृषिप्रधान देश आहे. कृषी क्षेत्र अनन्यसाधारण महत्त्वाचे असून या क्षेत्रामध्ये डॉ. स्वामीनाथन यांनी मोठी क्रांती घडवली. देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण केला. इंदिरा गांधी यांनी कणखर भूमिका घेत अमेरिकेला खडसावले. देशाला अन्नधान्याच्या बाबत स्वयंपूर्ण करण्यासाठी डॉ. स्वामीनाथन, डॉ. अण्णासाहेब शिंदे यांच्या माध्यमातून मोठे काम झाले. हरितक्रांतीनंतर डॉ.अण्णासाहेब शिंदे यांनी धवल क्रांती घडवून आणली.

डॉ.खरबडे म्हणाले की, थोरात कृषी महाविद्यालयाने कमी काळामध्ये अत्यंत चांगले काम केले असून कृषी विद्यापीठ कायम या महाविद्यालयाच्या पाठीशी आहे. प्रत्येकासाठी व्यायाम आणि खेळ महत्त्वाचा आहे विद्यार्थ्यांनी मोबाईल मध्ये न अडकता खेळ खेळलेच पाहिजे याकरता प्रत्येक महाविद्यालयात विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याचे ते म्हणाले. यावेळी डॉ.भणगे, डॉ. आर.बी.उंबरकर, डॉ. ए. एल. हारदे, प्रा. डी. आर. मगदूम, प्रा. एस. जी. वरखड, प्रा.एस. ए. खर्डे ,प्रा. ए. एस. ससे आदींसह टीम मॅनेजर व शिक्षक उपस्थित होते. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. राजेंद्र वाघ यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी  तर प्रा.जी.बी. बाचकर यांनी आभार मानले. यावेळी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Visits: 284 Today: 6 Total: 1108875

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *