विसर्जनानंतरही मूळस्थानी परतलेली साळीवाड्यातील ‘रेणुका माता’! जागा मालकाने चारवेळा तांदळा हलवला; मात्र देवीने आपले स्थान सोडले नाही..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
2200 वर्षांची संस्कृती सांगणार्या संगमनेरात अबाधित असलेली अनेकस्थाने आजही आपलं प्राचिनत्त्व सिद्ध करीत आहेत. कालौघात यातील काही स्थानं नामशेष झाली, मात्र साळीवाड्यातील रेणुका मातेचा तांदळा मात्र याला अपवाद ठरला आहे. येथील काकडेंच्या वाड्यात असलेला हा तांदळा किती वर्षांपासून असेल याबाबत निश्चित माहिती उपलब्ध होत नाही. मात्र 1970 सालानंतर वारंवार येथील रेणुकामातेचे स्थान बदलण्याचा आणि अखेर हा तांदळाच नदीपात्रात विसर्जित करण्याचा चारवेळा प्रयत्न झाला, मात्र प्रत्येकवेळी रेणुकामाता पुन्हा आपल्या मूळस्थानी परतल्याचे दाखले आज हयात असलेल्यांच्या मुखातून श्रवतांना साक्षात देवीस्वरुप मातेचे प्रकाशमय दर्शनच घडते.

विविध धर्म, पंथ, समुदाय आणि नागरिकांचा रहिवास असलेल्या संगमनेरात अनेक प्राचिन श्रद्धास्थाने आहेत. त्यातील एक साळीवाड्यातील रेणुका मातेचे छोटेखानी मंदिर. या मंदिराच्या प्राचिनत्त्वाबाबत कोणतीही माहिती उपलब्ध होत नाही. मात्र आसपास राहणारे नागरिक व हे श्रद्धास्थान ज्यांच्या मालकीच्या जागेत आहे त्या जागामालकाकडून मात्र या स्थळाची अतिशय रोमांचकारी कथा ऐकण्यास मिळते. त्यावरुन आदिशक्तीच्या 108 शक्तीपीठांशी या ठिकाणाचा कोठेतरी संबंध असावा अशी प्रचिती या कथेतून अनुभवयास मिळते.

सन 1970 सालापूर्वी साळीवाड्यातील या ठिकाणी सोनाबाई पाथरकर ही वृद्ध महिला एकटीच त्या वाड्यात रहात असत. त्यांच्या वाड्यातील दर्शनीभागातच रेणुका देवीचा तांदळा होता. सोनाबाई जोपर्यंत हयात होत्या तोपर्यंत त्यांनी देवीची पूजा-अर्चा व भजन-कीर्तनाचे कार्यक्रम सुरु ठेवले. त्यांच्या निधनानंतर चव्हाणपुर्यात राहणारे त्यांचे नातेवाईक या वाड्यात वास्तव्यास आले व त्यांनी सोनाबाईप्रमाणेच देवीची सेवा सुरु ठेवली. सन 1970 च्या सुमारास या वाड्याचे मूळ मालक असलेल्या आमले कुटुंबाने सदरचा वाडा खराडी येथील लक्ष्मण विष्णु काकडे यांना विकला. त्यांनी सदरचा वाडा पाडून तेथे आठ खोल्या बांधल्या, एका खोलीत ते स्वतः आपल्या कुटुंबासह वास्तव्यास राहीले व उर्वरीत सात खोल्या त्यांनी भाडेकरुंना दिल्या.

बांधकाम सुरु असतानाच दर्शनीभागात असलेला देवीचा तांदळाही त्यांच्या नजरेस आला होता. श्रद्धेचा भाग असल्याने त्यांनी तो खराडी येथे नेवून तेथील मंदिरात स्थानापन्न केला व पुन्हा आपल्या घरी परतले. यावेळी घरात पाऊल ठेवताच त्यांना देवी पुन्हा आपल्या मूळस्थानीच येवून बसल्याचे दिसले. हा प्रकार पाहून त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. मात्र त्यानंतरही त्यांनी घरात देवीचे स्थान नको म्हणून तीनवेळा देवीचा तो तांदळा प्रवरा नदीपात्रात नेवून वाहत्या पाण्यात विसर्जीत केला, पण प्रत्येकवेळी ते घरी पोहोचण्याआधीच देवी पुन्हा आपल्या मूळस्थानावर येवून बसू लागली. त्यामुळे त्यांनी या घटनेकडे दुर्लक्ष करुन देवीचा तांदळा अडगळीत ठेवून दिला.

त्याचा परिणाम लक्ष्मण काकडे खूप आजारी पडले. याकाळात त्यांच्या पत्नी पार्वताबाई यांनाही आजाराने ग्रासले आणि त्यातच त्यांचे निधनही झाले. त्यांचा एकुलता एक मुलगा मच्छिंद्र त्यावेळी खुप लहान होता. या काळात त्याचा सांभाळ त्यांची आत्या तुळसाबाई यांनी केला. मात्र एकामागून एक घटना घडूनही देवीच्या तांदळाकडे होणारे दुर्लक्ष यामागे असल्याचे कोणालाही लक्षात आले नाही. मात्र या नंतरच्या काळातही या गल्लीत राहणार्या अनेकांना देवीचा साक्षात्कार झाल्याचे तेथील नागरिक बोलताना सांगतात. तेथील विजय पाथरकर यांची अवघ्या तीन वर्षांची कन्या वरच्या मजल्यावरुन डोक्यावर पडली, मात्र तिला कोणतीही दुखापत झाली नाही. स्वर्गीय तुकाराम अरगडे पाय घसरुन भिंतीवरुन पडले तरीही त्यांना कोणतीही इजा पोहोचली नाही.

दरम्यानच्या काळात आत्याच्या प्रेमात वाढलेला मच्छिंद्र मोठा झाला. तो जेव्हा आप्लया घरात येई तेव्हा साक्षात देवी त्याच्याशी बोलत असे ते स्वतः सांगतात. त्यांच्या म्हणण्यानुसार दोनवेळा देवीच्या सांगण्यावरुन त्यांनी देवीला दुधाचा प्याला दिला, आणि देवीने त्यांच्या समोरच तो रिताही केला हा सगळा प्रकार अनुभल्यानंतर मे प्रचंड घाबरले. मात्र आपल्याला येत असलेले अनुभव आपण लोकांना सांगीतले तर ते आपल्यावर विश्वास ठेवणार नाहीत, आपल्याला वेडा म्हणतील म्हणून भितीपोटी काहीच न बोलता त्यांनी आपले राहते घर सोडून गल्लीतीलच झावरे टेलर यांच्या खोलीत राहण्यास सुरुवात केली. मात्र ते जेव्हाही वाड्यात जायचे तेव्हा देवी त्यांच्याशी बोलायची.

मच्छिंद्र काकडे यांच्या कुटुंबावर एकामागून एक संकटे येत असल्याचे पाहून परिसरातील मनोहर पाथरकर व तेथील एका टेलरने त्यांच्यासह वेल्हाळे येथील दावलमलिक बाबा व गवळीबाबांच्या स्थानावर जावून तेथील पुजार पूंजाजी आव्हाड यांना घडत असलेले सगळे प्रकार सांगितले. त्यांनी हा
रेणुकामातेचा महिमा आहे, त्याकडे दुर्लक्ष करता येणार नसल्याचे सांगत देवीच्या मूळस्थानी मंदिर बांधून मातेची प्रतिष्ठापना करण्याचा सल्ला त्यांना दिला. त्यानुसार सन 1994 साली आहे त्याच ठिकाणी देवीचे मंदिर बांधून रेणुका मातेचा तांदळा स्थापित करण्यात आला व देवीचे वार्षिक उत्सव, नवरात्री, कोजागिरीसारखे उत्सव येथे साजरे होवू लागले. वारंवार आलेल्या अनुभवातून मच्छिंद्र काकडे यांना साक्षात देवीची अनुभूती मिळाल्याने दरवर्षी कोजागिरी पोर्णिमेला ते नवरात्री उत्सवाची सांगता म्हणून साळीवाड्यात महाप्रसादाचेही आयोजन करुन लागले. सन 1997 साली या परिसरातील शरद गोविंद तांबे यांच्या पत्नी भारती यांनी घरात हळदी-कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यासाठी त्यांनी गल्लीतील सगळ्या महिलांना आवतनं दिली आणि आनंदाने हा कार्यक्रमही पार पडला. मात्र त्याच दिवशी पहाटे देवीने त्यांना दृष्टांत दिला व मला हळदी-कुंकवाला का बोलावले नाही? असा सवाल त्यांना केला. या प्रकाराने त्यांना अक्षरशः घाम फुटला. त्यांचा थरथरणारा देह पाहून त्यांचे पती शरद यांनी विचारणा केली असता त्यांनी घडला प्रसंग सांगीतला. त्यावर त्या दाम्पत्याने देवीच्या स्थानी जावून माफी मागीतली.

याच दरम्यानच्या काळात देवी मच्छिंद्र काकडे यांच्याशी बोलत असतांना वाड्यात राहणारे भाडेकरी गोपाळ टिळे यांना तो भुताटकीचा प्रकार वाटला. त्यामुळे त्यांनी आपल्या हातात कंबरेचा पट्टा घेवून तो मच्छिंद्र काकडे यांच्यावर उगारला, त्याचवेळी देवीच्या स्थानातून लख्ख प्रकाश बाहेर पडला आणि त्यातून आवाज येवून ‘थांब, तो माझा भक्त आहे, त्याच्यावर हात उगारु नकोस..’ असे शब्द त्यांच्या कानी पडले आणि हातातील चांबडी पट्ट्याचे तुकडे झाले. यानंतर आजपर्यंत या पिरसरात राहणार्या नागरिकांना देवीने वेळोवेळी आपला महिमा दाखविला आहे. आजही असंख्य संगमनेरकर या ठिकाणी येवून देवीच्या तांदळासमोर नतमस्तक होतात आणि आपल्या मनोकामना मागतात. देवीही आपल्या भक्तांचे मनोरथ पूर्ण करते अशी भाविकांची श्रद्धा आहे.

2006 साली परिसरातील नागरिक व तरुणांनी एकत्र होत देवीच्या वार्षिक उत्सवांना सार्वजनिक स्वरुप देण्याचा निर्णय घेतला, त्यासाठी या दिव्य स्थानाचे मूळमालक असलेल्या मच्छिंद्र काकडे यांची परवानगी घेवून देवीला मूर्तीस्वरुपात त्याच ठिकाणी स्थापित करण्यात आले. यावेळी प्राणप्रतिष्ठेसह नऊ दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तेव्हापासून आजतागायत दरवर्षी नवरात्रीत या देवीचा मोठा उत्सव साजरा केला जातो. कोजागिरी पोर्णिमेला महाप्रसादही होतो, संगमनेरातील जवळपास 12 ते 15 हजार भाविक प्रसादाचा लाभही घेतात. याशिवाय तेथील तरुणांनी देवीच्या नावाने विविध सामाजिक उपक्रमही राबविण्यास सुरुवात केली आहे. अतिशय रोमांचकारी कथा असलेल्या या ठिकाणी देवीभक्तांनी एकदा नतमस्तक होवून देवीचा आशीर्वाद प्राप्त करावा असे आवाहनही या निमित्ताने रेणुकामाता उत्सव समितीने केले आहे.

