पोलिसांच्या कृपेने पोसलेला ‘युसुफ’ पुन्हा गुटखा तस्करीत! लव्ह जिहादसह अनेक गुन्ह्यात सहभाग; जामीनावर असूनही साकारतोय गुन्हेगारी विश्‍व..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
पठारभागातील ‘लव्हजिहाद’च्या प्रकरणासह अर्धाडझन गुन्हेगारी प्रकरणात सध्या जामीनावर असलेल्या घारगावच्या कुख्यात युसुफ दादा चौगुले याच्या नावावर आणखी एका गुन्ह्याची नोंद झाली आहे. धक्कादायक म्हणजे अवघ्या तीन महिन्यांपूर्वीच कर्र्‍हेघाटात झालेल्या अलिशान वाहनाच्या अपघातातून गुटखा तस्करी उघड होवून त्याचे नाव समोर आले होते. मात्र त्या प्रकरणात संशयाच्या वलयात असलेल्या तालुका पोलिसांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्नच केला नाही. परिणामी त्याला अटकपूर्व जामीन मिळाला आणि तो पुन्हा गुटखा तस्करीच्या गुन्ह्यात कार्यरत झाल्याचे स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईतून स्पष्ट झाले आहे. घारगाव पोलिसांच्या नाकावर टिच्चून त्याने पठारभागात राजरोसपणे गुटखा तस्करीचा धंदा जोमात सुरु केल्याची जोरदार चर्चा असल्याने श्रीरामपूरपाठोपाठ पोलिसांच्या कृपेने तालुक्यातही गुन्हेगारी पोसली जात असल्याचे उघड झाले आहे. संगमनेर पोलिसांकडून दाखल प्रकरणाचा तपास किती गांभीर्याने होतो त्यावरुन ही गोष्ट स्पष्ट होणार आहे. वास्तविक एकामागून एका गंभीर प्रकरणात नाव समोर आल्यानंतर घारगावच्या या कुख्यात गुन्हेगारावर भारतीय न्यायसंहितेतील ‘संघटीत गुन्हेगारी’च्या कलमान्वये कठोर कारवाई होण्याची अपेक्षा आहे, मात्र त्याबाबत पोलिसांची मानसिकताच दिसत नसल्याने मोठा संशयही निर्माण झाला आहे.


अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने बुधवारी (ता.25) लोणी रस्त्यावरील लकी पान शॉपवर संशयावरुन छापा घातला होता. या कारवाईत टपरीचालक राजू बाबू शेख (वय 49, रा.विजयनगर, कुरणरोड) याच्या ताब्यातून 3 हजार 635 रुपयांच्या गुटख्यासह 18 हजार 635 रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन त्याला ताब्यात घेण्यात आले. शहर पोलीस ठाण्यात नेल्यानंतर त्याच्याकडे प्राथमिक चौकशी केली असता सदरचा गुटखा त्याने वसीम आणि युसुफ चौगुले (रा.घारगाव) या दोघांकडून विक्रीसाठी विकत घेतल्याची माहिती दिली. धक्कादायक म्हणजे यातील तिसर्‍या क्रमांकाचा आरोपी संगमनेरच्या गुन्हेगारी विश्‍वात कुप्रसिद्ध असून गुटखा तस्कर म्हणून पठारभागात ओळख असलेला हा महाभाग गेल्या वर्षभरात लव्ह जिहाद, गुटखा, गांजा आणि हत्यार तस्करीत वारंवार समोर आला आहे.


याप्रकरणी गुन्हे शाखेचे काँन्स्टेबल दीपक जाधव यांनी दिलेल्या तक्रारीवरुन शहर पोलिसांनी लकी पान स्टॉलचा चालक राजू शेख याच्यासह वसीम (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही..) व युसुफ चौगुले (रा.घारगाव) या तिघांवर अपराधी कृत्य करण्यासाठी विषारी पदार्थाचा वापर केल्याच्या दहा वर्षांची शिक्षा असलेल्या भारतीय न्यायसंहितेतील कलम 123 सह 223, 274, 275, 3 (5) प्रमाणे गुन्हा दाखल केला असून टपरीचालकाला अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार उर्वरीत दोघेही पसार झाले असून तालुका पोलिसांप्रमाणेच शहर पोलिसही या प्रकरणातील गुटख्याचा मुख्य पुरवठादार आणि कुख्यात आरोपी युसुफ दादा चौगुले याला गजाआड घालतात की त्याच्या ‘अटकपूर्व’चा मार्ग विस्तृत करतात यावर पोलिसांची या प्रकरणातील विश्‍वासार्हता टिकून आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास ढोकरे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.


दोन वर्षांपूर्वी घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दित घडलेल्या अपहरण, धर्मांतरण आणि निकाह (लव्ह जिहाद) प्रकरणाने राज्यात खळबळ उडाली होती. त्या प्रकरणाने संगमनेर तालुक्यात जातीय तणाव निर्माण झाल्याने पोलिसांनी तातडीचा तपास केल्यानंतर या संपूर्ण प्रकरणामागे तत्कालीन शरद पवार गटाच्या ग्रंथालय विभागाचा प्रदेश कार्यकारणी सदस्य असलेल्या युसुफ दादा चौगुले (रा.घारगाव) याचे पहिल्यांदाच नावही समोर आले आणि या संपूर्ण कृत्यामागे गुटखा तस्करीतून मिळणारा अमाप पैसा कारणीभूत असल्याचेही उघड झाले होते. या प्रकरणात सर्वप्रथम त्यालाच अटक झाली होती व तब्बल नऊ महिन्यानंतर गेल्यावर्षी मार्चमध्ये थेट सर्वोच्च न्यायालयाकडून सुटका होईस्तोवर तो कारागृहात कैद होता.


जामीनावर सुटताच अवघ्या महिन्याभरातच मध्यप्रदेशच्या सेंधवा पोलिसांनी गावठी कट्ट्यांची तस्कारी करताना त्याच्यासह अन्य दोघांना पकडले होते. त्या प्रकरणात दीर्घकाळ तुरुंगात राहिल्यानंतर घारगाव पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर करताना घातलेल्या अटींचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्याचा जामीन मंजूर करण्यासाठी न्यायालयात धाव घेवून त्याचा कोठडीतील मुक्कामही वाढवला होता. त्या प्रकरणातून जामीनावर बाहेर पडताच समनापूरनजीक ‘दाखवण्यात’ आलेल्या गांजा तस्करीच्या एका प्रकरणात सुरुवातीला त्याच्या नावाचा गजर झाला होता. मात्र शहर पोलीस ठाण्यातील तत्कालीन वादग्रस्त पोलीस उपनिरीक्षकाने नियोजनबद्ध पद्धतीने त्याला अलगद त्या प्रकरणातून बाहेर काढल्याची जोरदार चर्चाही त्यावेळी रंगली होती.


त्यानंतर गेल्या 9 जुलै रोजी पहाटेच्या सुमारास एका अलिशान वाहनाला सायखिंडी शिवारात अपघात झाला होता. तालुका पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर दरीत कोसळलेले अलिशान वाहन बाहेर काढण्यात आले. त्यावेळी या वाहनातून खचाखच भरलेल्या तब्बल 8 लाख 40 हजार रुपयांच्या 43 गोण्यांमधील गुटख्यासह 13 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत झाला होता. त्या प्रकरणात सदरचा गुटखा घारगावच्या युसुफ चौगुलेचा असल्याचे सुस्पष्टपणे समोरही आले होते. त्या प्रकरणाचा प्रामाणिकपणे तपास झाला असता तर गुटखा तस्करीचे गुजरात कनेक्शन उघड होण्याची दाट शक्यता होती. मात्र तालुका पोलिसांनी नेहमीप्रमाणे संशयास्पद भूमिका बजावताना सापट निर्माण केल्याने प्रकरणाच्या खुद्द सूत्रधाराला तपासकामी अटक होण्यापूर्वीच त्याला अटकपूर्व जामीन मिळाला. त्यामुळे तालुका पोलिसांवर जोरदार टीकाही झाली होती, मात्र त्याचा कोणताही परिणाम त्यांच्या कार्यपद्धतीवर झाल्याचे आजवर दिसून आले नाही.


आता पुन्हा एकदा गुटखा तस्करीच्या प्रकरणात त्याच नामचीन गुटखा तस्कराचे नाव पुन्हा एकदा समोर आले असून यावेळी घारगाव आणि संगमनेर तालुका पोलीस ठाण्यानंतर तालुक्यातील तिसर्‍या पोलीस ठाण्यातही गुटखा तस्करीचा गुन्हा दाखल झाला आहे. या कारवाईतून पुरवठादार म्हणून युसुफ दादा चौगुले याच्या नावाचा उल्लेख असल्याने शहर पोलीस त्याच्या मुसक्या आवळतात की तालुका पोलिसांच्याच पावलावर पाऊल ठेवून त्याच्या अटकपूर्व जामीनापर्यंत जाणारा मार्ग विस्तृत करतात हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.


श्रीरामपूर उपविभागाचे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी भारतीय न्यायसंहितेत असलेल्या ‘संघटीत गुन्हेगारी’च्या कलमाचा प्रभावी वापर करुन उपविभागातील काही कुख्यात गुन्हेगारी टोळ्यांचे कंबरडे मोडले आहे. मात्र लव्ह जिहाद सारख्या सामाजिक स्वास्थ बिघडवणार्‍या गंभीर संघटीत गुन्ह्यासह गुटखा, अंमलीपदार्थ आणि चक्क हत्यार तस्करीसारख्या अतिशय गंभीर प्रकरणात वारंवार समोर येवूनही युसुफ दादा चौगुले सारखा कुख्यात आरोपी मात्र या कठोर कारवाईपासून अद्यापही दूर असल्याने मोठे आश्‍चर्य निर्माण झाले आहे. अवघ्या तीन महिन्यांतच घडलेल्या गुटखा तस्करीच्या या दोन्ही प्रकरणांसह त्याचा पूर्वेतिहास पाहता आतातरी त्याच्यासह त्याच्या गुन्हेगारी टोळीवर संघटीत गुन्हेगारीच्या तरतुदींनुसार कारवाई होईल अशी अपेक्षा आहे.

Visits: 3 Today: 3 Total: 2261228

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *