अवैध दारू विक्री थांबवा; तहसीलदारांचे आदेश

नायक वृत्तसेवा, अकोले
अकोले तालुक्यात सुरू असणारी अवैध दारू विक्री पूर्णपणे थांबवण्याचे आदेश तहसीलदार सिद्धार्थ मोरे यांनी पोलिस व उत्पादनशुल्क विभागाला दिले आहेत.

आमदार डॉ.किरण लहामटे यांनी तालुक्यात सुरू असणाऱ्या अवैध दारू विक्री संदर्भात उत्पादन शुल्क विभाग तसेच पोलिस अधिकारी,पोलिस पाटील,सामाजिक कार्यकर्ते यांची एक बैठक काही दिवसांपूर्वी घेतली होती.तेव्हा तालुक्यातील ४४ गावांमध्ये अवैध दारू विक्री होत असल्याचे निदर्शनास आले होते.ही अवैध दारू विक्री बंद करण्याचे आदेश आमदार लहामटे यांनी दिले होते.त्या नंतर पोलिस व उत्पादन शुल्क विभागाने अनेक अवैध दारू विक्रेत्यांवर धाडी टाकल्या होत्या. मात्र अजूनही तालुक्यातील २० गावांमध्ये अवैध दारू विक्री सुरू आहे.ती अवैध दारू विक्री तत्काळ थांबून त्या विक्रेत्यांवर कडक कारवाया करण्याचे आदेश तहसीलदार सिद्धार्थ मोरे यांनी तालुका दारुबंदी समितीच्या बैठकीत अकोले व राजूर पोलिस निरीक्षक आणि उत्पादन शुल्क विभागाला दिले. त्याचप्रमाणे ज्या परवाना धारक दुकानातून ही दारू येते त्या दुकानांवर कारवाई करण्याचे आदेशही उत्पादन शुल्क विभागाला दिले.बैठकीला उत्पादनशुल्क अधिकारी एम. के. सहस्त्रबुद्धे, गटविकास अधिकारी अमर माने, पोलिस निरीक्षक मोहन बोरसे व सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक सरोदे व अशासकीय सदस्य हेरंब कुलकर्णी उपस्थित होते.

Visits: 133 Today: 2 Total: 1103196
