अकोलेतील आठवीच्या विद्यार्थ्याने तयार केली इलेक्ट्रिक कार सोहमच्या इंडियन जुगाडाचे गणित-विज्ञान प्रदर्शनात झाले कौतुक
महेश पगारे, अकोले
गाड्यांचे जुगाड आपल्याला अनेकदा पाहायला मिळतात. अकोलेतील अभिनव इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिकणार्या आठवीच्या विद्यार्थ्याने टाकाऊपासून टिकाऊ इलेक्ट्रिक कार तयार केली आहे. त्याचे हे इंडियन जुगाड राजूरमध्ये भरलेल्या प्रदर्शनात उपकरण म्हणून सादर करण्यात आले होते.
अभिनव स्कूलचा विद्यार्थी सोहम उत्तम शेणकर याच्या घराचे काम सुरू होते. त्यावेळी प्लंबिंग आणि वीज जोडणी करताना मटेरियलचा बराचसा भाग उरायचा. त्यातून काहीतरी करावे असा विचार सतत सोहमच्या मनात घोळायचा. अखेर त्यातून त्याला इलेक्ट्रिक कार तयार करण्याची कल्पना सूचली. त्यानुसार त्याने एका-एका सुट्ट्या भागांची जुळवाजुळव सुरू केली. कुटुंबियांना देखील आधी काही समजेनाच. जेव्हा हळूहळू कारचा आकार येऊ लागल्याने ते देखील आचंबित झाले आणि त्यांनीच त्याला प्रोत्साहन दिले.
24 व्होल्टची पीएमडीसी मोटर, 12 व्होल्टची बॅटरी, प्लायवूड आणि यूपीव्हीसी पाईप अशा साधनांनी सोहमने इंडियन जुगाड करत प्रदूषणविरहित, कमी खर्चिक इलेक्ट्रिक कार तयार केली. यासाठी साधारण दहा हजार रुपयांच्या आसपास खर्च आला. तिची चाचणी घेऊन तिला राजूर येथील स्वामी समर्थ माध्यमिक विद्यालयातील 50 व्या गणित-विज्ञान प्रदर्शनात उपकरण म्हणून मांडण्यात आली होती. या प्रदर्शनाला भेट देणार्या विद्यार्थी आणि शिक्षणप्रेमी पालकांनी सोहमची ही भन्नाट कल्पना पाहून त्याचे भरभरुन कौतुक केले.