आई व आजोबाने लावले अल्पवयीन मुलीचे लग्न! वडिलांच्या तक्रारीवरुन मुलीच्या आईसह चौघांवर गुन्हा..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
आपल्या मुलीच्या लग्नाबाबत सासरकडच्या मंडळीकडून वारंवार विचारणा होवूनही ती अल्पवयीन असल्याचे सांगत वडिलांकडून त्याला विरोध होता. मात्र मुलीची आई व आजोबा यांनी संगनमत करुन मुलीच्या वडिलांना अंधारात ठेवून तिचे परस्पर लग्न लावून दिले. सदरची बाब लक्षात येताच अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी थेट पोलीस ठाण्यात धाव घेत आपले सासु-सासरे, मेव्हणा व चक्क आपल्याच पत्नी विरोधात तक्रार दिली असून त्यावरुन घारगाव पोलिसांनी वरील चौघांविरोधात बालविवाह प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हादाखल करण्यात आला आहे. सदरची घटना तालुक्याच्या पठारभागातील कोठे बुद्रुक येथून समोर आली आहे. वडिलांनीच आपल्या अल्पवयीन मुलीचे लग्न लावून दिल्याप्रकरणी तक्रार दाखल करण्याची ही घटना अतिशय विरळ आहे.

याबाबत घारगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदरची घटना 1 ऑक्टोबरच्या पूर्वी घडली आहे. याबाबत बिरेवाडी येथे राहणार्या 43 वर्षीय गृहस्थाने घारगाव पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार 2006 ते 2021 या कालावधीत ते ठाणे जिल्ह्यातील दिवा येथील एका कंपनीत कामास होते व तेथेच आपली पत्नी व तीन मुलींसह वास्तव्यास होते. 2021 मध्ये कोविड संक्रमणामुळे त्यांनी आपल्या साडेसतरा वर्षीय मुलीला शिक्षणासाठी आजोळी कोठे बुद्रुक येथे पाठविले होते. त्यानंतर काही दिवसांनी जानेवारी 2022 मध्ये त्यांची कंपनी बंद झाल्याने ते आपली पत्नी व दोन मुलींसह बिरेवाडी या आपल्या मूळगावी राहण्यासाठी आले.

याच दरम्यान त्यांच्या सासर्याने त्यांना फोन करुन आपल्या *** साठी चांगले स्थळ आलेले आहे, तिचे लग्न करायचे असल्याबाबत मुलीच्या वडिलांना सांगितले. मात्र आपल्या मुलीचे वय अजून 18 वर्षांचे नाही, त्यामुळे इतक्याच तिचे लग्न करायचे नसल्याचे त्यांनी ठणकावले. त्यानंतर दुसर्या दिवशी संबंधित इसम काही कामानिमित्त संगमनेरात आले होते, येथील काम आटोपल्यानंतर सायंकाळी ते त्यांच्या घरी परतले असता दुपारी सासरे घरी येवून गेल्याचे व स्थळ चांगले असल्याने लग्न कराच असा आग्रह करुन गेल्याचे त्यांच्या पत्नीने सांगितले व आपण त्यांचे ऐकू असा आग्रह देखील केला. मात्र त्यांनी ठामपणे आत्ताच मुलीचे लग्न लावण्यास नकार दिला.

9 जून रोजी त्या गृहस्थाला त्यांच्या एका मित्राने त्यांच्याच मुलीचे गळ्यात हार घातलेले व लग्न झाल्याचे काही फोटो पाठवले. ते फोटो त्यांनी आपल्या पत्नीला दाखवून हा काय प्रकार असल्याचे विचारताच तिने भांडणं करुन तेथून माहेर गाठलं. त्यानंतर 1 ऑक्टोबररोजी ‘त्या’ अल्पवयीन मुलीनेच आपल्या वडिलांना फोन करुन आजोबा, आजी, आई व मामाने आपले कळवा (जि.ठाणे) येथे आपले दिवा येथील एका मुलाशी लग्न लावून दिल्याची माहिती दिली. हा प्रकार ऐकूण हैराण झालेल्या त्या मुलीच्या पित्याने तेथून थेट घारगाव पोलीस ठाणे गाठून शुक्रवारी सायंकाळी आपली पत्नी, सासु-सासरे व मेव्हण्या विरोधात तक्रार दाखल केली.

त्यानुसार पोलिसांनी वरील चौघां विरोधात बालविवाह प्रतिबंधक कायद्याच्या कलम 9, 10 व 11 नुसार गुन्हा दाखल करुन तो पुढील तपासासाठी ठाणे पोलिसांकडे वर्ग केला आहे. आपल्याच अल्पवयीन मुलीच्या लग्नाची तक्रार एखाद्या वडिलांनी दाखल करावी ही घटना अतिशय विरळ असून एकीकडे या घटनेने खळबळ उडाली असली तरीही दुसरीकडे त्यातून ‘त्या’ पित्याने कणखर भूमिका घेत मोठा संदेश दिला आहे.

