प्रशासनाच्या आश्वासनानंतर शिर्डी भाजपचे आंदोलन मागे
प्रशासनाच्या आश्वासनानंतर शिर्डी भाजपचे आंदोलन मागे
नायक वृत्तसेवा, शिर्डी
साईनगरीतील साईबाबा संस्थानने नगरपंचायतीचा जाण्या-येण्याचा मार्ग बंद केला आहे. यामुळे नागरिकांना मोठा मनःस्ताप सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने नगरपंचायत कार्यालयान आंदोलन केले. यावेळी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी के. एच. बगाटे आणि पोलीस उपाधीक्षक संजय सातव यांनी चर्चा करुन मार्ग काढेपर्यंत आंदोलन मागे घेण्यास सांगितले. त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

द्वारकामाई मंदिराजवळून जाणारा नगरपंचायतीचा रस्ता साईसंस्थानने बंद केला आहे. हा रस्ता नगरपंचायतीचा असून, ग्रामस्थांच्या दृष्टीने बाजारपेठेतील महत्वाचा रस्ता आहे. कुठलेही संयुक्तीक कारण नसताना साईसंस्थानने अडथळे उभे करून हा रस्ता बंद केला आहे. त्यानंतर नगरपंचायतीची विनंती ऐकण्याची तयारी देखील संस्थानच्या अधिकार्यांची नाही. यामुळे या भागातील रहिवाशांची मोठी गैरसोय होते आहे. अन्य लांबच्या रस्त्याचा वापर करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. दरम्यान, नगराध्यक्षा अर्चना कोते यांनी विनंती करूनही हा रस्ता खुला केला जात नाही. त्यामुळे संतापलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी पालिकेमध्ये आंदोलन केले. येत्या दोन दिवसांत हा रस्ता खुला झाला नाही तर भाजपच्यावतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा पक्षाचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांनी यावेळी दिला.

