सोमवारनिमित्त मध्यमेश्वराचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी हर हर महादेवाचा केला जयघोष; भाविकांना शाबुदाणा खिचडीचा महाप्रसाद
नायक वृत्तसेवा, नेवासा
श्रावणातील चौथ्या सोमवारी (ता.22) तीर्थक्षेत्र नेवासा येथील प्रवरानदीच्या तीरावर असलेल्या पुरातन श्री मध्यमेश्वर मंदिरामध्ये भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. यावेळी वेदमंत्राच्या जयघोषात येथील प्रमुख मठाधिपती बालयोगी ऋषीनाथ महाराज यांच्या हस्ते जलाभिषेक घालण्यात आला.
पुरातन व अगाध महिमा असलेल्या या क्षेत्राचा ब्रम्हलिन योगी महंत श्री मनोहरनाथ महाराजांनी हे क्षेत्र नावारूपाला आणले. प्रभू रामचंद्रांचा पदस्पर्श या क्षेत्राला झाला असल्याने हे पवित्र क्षेत्र असल्याचे ते सांगत. श्रावणातील चारही सोमवारी भाविकांच्या येथे दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. यामध्ये महिला भगिनींची गर्दी लक्षणीय होती. सुवासिनींनी येथे बेलपत्र अर्पण करून व पंचारती ओवाळून मनोभावे पूजा केली. तसेच प्रत्येक सोमवारी सुवासिनींनी येथे तांदूळ, तीळ, मूग, जवस अशी शिवामूठ मध्यमेश्वर शिवलिंगास अर्पण केली. तर आलेल्या भाविकांना शाबुदाणा खिचडीचा महाप्रसाद देण्यात आला. यावेळी हर हर महादेवच्या गजराने येथील परिसर दुमदुमला होता.
दरम्यान, चौथ्या श्रावणी सोमवार निमित्ताने येथे पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांची रीघ लागली होती. या कालावधीत गावातील युवकांनी देखील दररोज पहाटेच्या सुमारास स्नान करून मध्यमेश्वर शिवलिंगास अभिषेक घातला. यावेळी मंदिर प्रांगण भक्तीमय व शिवमय बनले होते. पुरातन क्षेत्र असलेल्या मध्यमेश्वर मंदिर प्रांगणात योगी मनोहरनाथ महाराजांची समाधी मंदिर असून बाजूलाच प्रभू श्रीरामचंद्र, सीतामाई, लक्ष्मण, हनुमंतरायाच्या मूर्त्या आहेत. सध्या बालयोगी ऋषीनाथ महाराज हे मंदिराची देखभाल व व्यवस्थापन पाहत आहे.