संघाच्या प्रांत संघचालकपदी नानासाहेब जाधव

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे संघचालक म्हणून सुरेश तथा नानासाहेब जाधव यांची पुढील तीन वर्षांसाठी निवड झाली आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत निर्णय अधिकारी म्हणून पश्चिम महाराष्ट्र प्रांत प्रचार प्रमुख दिलीप क्षीरसागर यांनी ही निवड घोषित केली.

दर तीन वर्षांनी संघाच्या जिल्ह्यापासून वरील सर्व स्तरावरील संघचालक पद व अखिल भारतीय सरकार्यवाह यांच्या निवडणुका होत असतात. त्याशिवाय अखिल भारतीय प्रतिनिधींची देखील निवड होत असते. कोरोना संकटाने ऑनलाईन घेण्यात आलेल्या बैठकीत नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर व कोल्हापूर या जिल्ह्यातील निर्वाचित संघ शाखा प्रतिनिधींनी ही निवड केली. नानासाहेब जाधव हे मूळ बेलापूर (श्रीरामपूर) येथील रहिवासी असून सध्या अहमदनगर येथे स्थायिक आहेत. त्यांनी कृषी अभियांत्रिकीमधील एम. टेक. पदवी प्राप्त केलेली असून माती आणि पाणी संवर्धनासाठी त्यांचा विशेष अभ्यास आहे. राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठात ते 1983 ते 2012 या काळात प्राध्यापक आणि शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत होते. त्यांनी पदवी परीक्षा प्राप्त केल्यावर संघाचे पूर्णवेळ प्रचारक म्हणून मावळ, शिरूर तालुका तसेच जळगाव जिल्हास्तरावर सहा वर्षे काम केले आहे. यापूर्वी संघाच्या जिल्हा, विभाग व प्रांत स्तरावर त्यांनी विविध जबाबदार्‍या सांभाळलेल्या असून 2013 पासून प्रांत संघचालक पदावर ते कार्यरत आहेत. त्यांच्या निवडीनंतर प्रांत कार्यवाह डॉ.प्रवीण दबडघाव यांनी त्यांचे अभिनंदन करताना प्रांतातील संघकामासाठी त्यांच्या मार्गदर्शनाचा पुढील काळात पुनश्च लाभ मिळणार असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. या बैठकीत प्रांतातील सर्व जिल्हा, विभाग व प्रांत स्तरावरील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

Visits: 14 Today: 1 Total: 119031

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *