‘अखेर’ भिक्षेकर्यांचे ग्रहण सुटले; बसस्थानकाचे प्रवेशद्वार मोकळे! दैनिक नायकच्या वृत्ताचा परिणाम; पोलीस उपअधीक्षक व शहर पोलिसांची संयुक्त कारवाई..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात वाढ झालेल्या भिक्षेकर्यांनी संगमनेर बसस्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वाराचा ताबा घेतला होता. सुमारे शंभराहून अधिक भिक्षेकर्यांनी बसस्थानकाचे प्रवेशद्वार म्हणजेच आपला हक्काचा निवारा मानल्याने प्रवाशांसह आसपासच्या व्यापार्यांनाही त्यांचा मोठा त्रास सहन करावा लागत होता. प्रदीर्घकाळापासून या मंडळींनी तेथेच बस्तान बांधल्याने कोट्यावधी रुपयांचा खर्च करुन उभारण्यात आलेल्या या देखण्या इमारतीला एकाप्रकारे भिक्षेकर्यांचे ग्रहणच लागले होते. याबाबत दैनिक नायकने गुरुवारच्या अंकात जळजळीत प्रकाश टाकल्यानंतर पोलिसांनी सायंकाळी उशिराने या परिसरात कारवाई करीत संगमनेरच्या वैभवशाली बसस्थानकाचे प्रवेशद्वार भिक्षेकर्यांच्या कचाट्यातून मोकळे केले. या कारवाईनंतर अनेकांनी दैनिक नायकशी संपर्क साधून समाधान व्यक्त केले व पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेबाबत आभारही मानले.

राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या महत्त्वकांक्षी प्रकल्पातील एक असलेल्या संगमनेर बसस्थानकाची इमारत जिल्ह्यात सर्वाधीक देखणी ठरली आहे. बसस्थानकाच्या बाह्य बाजूस असलेले दुमजली व्यापारी संकुल, त्यात थाटलेल्या आकर्षक दुकानांनी वाढलेले या इमारतीचे वैभव, पुणे-नाशिक महानगरांदरम्यान वसल्याने दिवसभर प्रवाशांची मोठी वर्दळ अशा वेगवेगळ्या कारणांनी संगमनेरच्या नूतन बसस्थानकाने संगमनेरच्या वैभवात मोठी भर घातली.

मात्र गेल्या दोन वर्षातील कोविड संक्रमणाचा काळ आणि त्यात भर म्हणून राज्य परिवहन महामंडळाचा सुमारे सहा महिने चाललेला संप यामुळे या बसस्थानकातून होणारी सार्वजनिक बस वाहतूक प्रभावित झाल्याने प्रदीर्घकाळ येथील प्रवाशांचा वावर थांबला होता. कोविड संक्रमणाच्या पहिल्या लाटेत पश्चिम महाराष्ट्रातून नाशिकच्या दिशेने मोठ्या प्रमाणात मजूरांचे स्थलांतर झाले. वाहतूक व्यवस्था बंद असल्याने या काळात हजारों मजूर शेकडों किलोमीटर पायी प्रवास करीत आपल्या घरांकडे निघाले, वाटेत ठिकठिकाणी दानशूर संस्था, संघटना व व्यक्तिंनी त्यांच्या अन्नपाण्याची व्यवस्था केली.

हा काळ भिक्षेकर्यांसाठीही मोठ्या कसोटीचा ठरल्याने त्यांच्याही पोटाचा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे अनेकांनी स्थलांतर करणार्या मजूरांसह एका गावाहून दुसरे गाव गाठीत आपल्या अन्नपाण्याची व्यवस्था केली. या कालावधीत संगमनेरातील अनेक सामाजिक संघटना व व्यक्तिंनी अशा लोकांची उपासमार होवू नये यासाठी त्यांना दोनवेळा अन्न व पाण्याचा पुरवठा केल्याने अनेकांनी निर्मनुष्य असलेल्या संगमनेर बसस्थानकाचा आधार घेतला. तेव्हापासून येथील भिक्षेकर्यांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे स्पष्ट आहे.

संगमनेर बसस्थानकाच्या परिसराला भिक्षेकर्यांचा सहवास नवा नाही, पूर्वीपासून येथील भिक्षेकर्यांचा मुक्काम दत्त मंदिराच्या परिसरातच असायचा. मात्र कोविडच्या प्रभावाने येथील भिक्षेकर्यांची संख्या अनेक पटीत वाढल्याने बसस्थानकाच्या परिसरात जागेवरुन त्यांच्यात संघर्ष होवू लागले. त्यातूनच अनेकांनी आपल्या हक्काच्या निवार्यासाठी मोकळी दिसेल ती जागा ‘रिझर्व्ह’ केल्याने संगमनेरच्या वैभवशाली बसस्थानकाच्या प्रशस्त प्रवेशद्वारावर भिक्षेकर्यांचा अंमल सुरु झाला. त्यात काही अनैतिक व्यवसाय करणार्या महिलांचाही शिरकाव झाल्याने हा परिसर रात्री उशिरापर्यंत जागता राहू लागला आणि त्यातून या भागात गुन्हेगारी तत्त्वांचाही वावर वाढल्याने प्रवाशांची सुरक्षाच धोक्यात आली होती.

‘बांधिलकी जनहिताची’ हे ब्रीद घेवून पाच वर्षांपूर्वी संगमनेरकरांच्या सेवेत रुजू झालेल्या दैनिक नायकने आपली सामाजिक बांधिलकी मानून या गंभीर विषयाला गुरुवारच्या (ता.5) वाचा फोडली. त्याची तत्काळ दखल घेत संगमनेर उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक राहुल मदने, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी फौजफाट्यासह सायंकाळी उशिराने बसस्थानकाचे मुख्य प्रवेशद्वार भिक्षेकर्यांच्या तावडीतून मोकळे केले. मोठ्या कालावधीनंतर हा परिसर मोकळा झाल्याने अनेकांना पहिल्यांदाच त्याच्या भव्यतेचेही दर्शन घडले.

अर्थात, येथे वास्तव्य करणारे सर्वच भिक्षेकरी निराधार आहेत, त्यांना कोठेही हक्काचा निवारा नसल्याने मानवतेच्या दृष्टीने त्यांच्या वास्तव्याची व्यवस्था हवी. मात्र सध्यातरी संगमनेरात अशी व्यवस्था नसल्याने पोलिसांनी बसस्थानकाच्या प्रवेशद्वारातून हुसकावलेल्या भिक्षेकर्यांना दत्त मंदिराच्या परिसरातच थांबण्याची तंबी दिली आहे. मात्र त्यांच्याकडून पुन्हा बसस्थानकाच्या प्रवेशद्वाराचा व प्रवाशांसाठीच्या बाकड्यांचा ताबा घेतला जाणार नाही यासाठी पोलिसांकडूनही या परिसरात वारंवार तपासणी होण्याची व भिक्षेकर्यांच्या आडून होणार्या अनैतिक उद्योगांची तपासणी होण्याची गरज परिसरातील व्यापार्यांमधून व्यक्त होत आहे.

दैनिक नायकमध्ये गुरुवारी प्रसिद्ध झालेल्या बातमीची तत्काळ दखल घेत संगमनेरचे पोलीस उपअधीक्षक राहुल मदने व पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी सायंकाळी कारवाई करीत बसस्थानकाचे प्रवेशद्वार भिक्षेकरी मुक्त केले, दैनिक नायकने मांडलेल्या या ज्वलंत भूमिकेबद्दल अभिनंदन. दैनिक नायकने यापूर्वीही जनहिताचे विषय मांडून वेगवेगळ्या स्थानिक प्रश्नांना वाचा फोडली असून सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे, आपले कार्य असेच सुरु रहावे यासाठी शुभेच्छा.
अमोल खताळ
सामाजिक कार्यकर्ते

