जिल्हा शिक्षण-प्रशिक्षण संस्था कर्मचार्‍यांचे उपोषण चार महिन्यांचे थकीत वेतन देण्याची उपोषणकर्त्यांची मागणी

नायक वृत्तसेवा, संगमनेर
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यासाठी शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्राच्या प्रक्रियेत महत्त्वपूर्ण योगदान देणार्‍या जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या अधिकारी व कर्मचार्‍यांचे वेतन गेले दोन वर्षापासून नियमित स्वरूपात होत नाही. तर गेली चार महिने कर्मचार्‍यांचे वेतनच झालेले नाही. यामुळे राज्यातील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतील कर्मचारी, अधिकारी यांनी पुणे येथील शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे. याचबरोबर सोमवारी (ता.7) अहमदनगर जिल्ह्यातील अनेक अधिकारी देखील या उपोषणात सहभागी झाले होते.

राज्यात प्रत्येक जिल्ह्यासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण स्थापन करण्यात आले आहे. यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकारने यासाठीचा संयुक्त खर्च करणे अपेक्षित आहे. केंद्र सरकारकडून अनुदान वेळेवर उपलब्ध होत नसल्याचे कारण सांगात राज्य सरकारने आपला हिस्सा टाकून वेतन करणे अपेक्षित होते. मात्र केंद्राचा हिस्सा प्राप्त झालेला नाही त्यामुळे वेतन करण्यात अडचणी येत असल्याचे सांगण्यात आले. या संस्थेत अंगणवाडी ते बारावी वर्गाला अध्यापन करणार्‍या शिक्षकांच्या प्रशिक्षणासोबत जिल्ह्याची शैक्षणिक गुणवत्ता उंचावणे, केंद्र व राज्य सरकारच्या शैक्षणिक उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करणे. यांसारख्या विविध कामाची जबाबदारी पार पाडण्यासाठी महत्त्वपूर्ण जबाबदारी या संस्थेवर आहे. या संस्थेत उच्च श्रेणीतील प्राचार्य, वर्ग एकमधील चार ज्येष्ठ अधिव्याख्याता, वर्ग 2 चे सहा अधिव्याख्याता, त्याचबरोबर ग्रंथपाल, लेखापाल, सांख्यिकी सहाय्यक, तंत्रज्ञ, लघुलेखक, लिपीक यांसारखे अनेक पदे कार्यरत आहे.

राज्यातील या कर्मचार्‍यांचे वेळेवर वेतन होणे अपेक्षित आहे. तथापि गेली दोन वर्षे वेतनात मोठ्या प्रमाणावर अनियमितता आढळून येत आहे. सातत्याने मागणी करून, निवेदने देऊन वेतन वेळेवर होण्याची अपेक्षा होती. मात्र वेतन वेळेवर होऊ शकलेले नाही. चार ते पाच महिने वेतनच नसल्याने अखेरचा मार्ग म्हणून साखळी उपोषणाला प्रारंभ केला आहे. सोमवारी झालेल्या साखळी उपोषणात अहमदनगर जिल्ह्यातील बाबुराव कांबळे, रमेश लोटके, आशिष राऊत, बळीराम शिंदे, श्री. लोणारी, श्री. टिळेकर आदी सहभागी झाले आहेत. त्याचबरोबर औरंगाबाद येथील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, विभागीय प्राधिकरण येथील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Visits: 129 Today: 1 Total: 1848547

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *