श्री राजेंद्र होंडामध्ये दुचाकीधारकांना वाहतूक नियमांबद्दल मार्गदर्शन
![]()
नायक वृत्तसेवा, संगमनेर
येथील श्री राजेंद्र होंडामध्ये ‘रस्ता सुरक्षा अभियान 2021’ अंतर्गत मोटार वाहन निरीक्षक संदीप निमसे यांनी दुचाकीधारकांना वाहतूक नियमांबद्दल मार्गदर्शन केले. तसेच दुचाकींना रिफ्लेक्टर्स लावत नियम पाळण्याचे आवाहन केले.

याप्रसंगी सामजिक कार्यकर्ते डॉ.सुचित गांधी, सीए.कैलास सोमाणी, श्री राजेंद्र होंडाचे संचालक ओंकार सोमाणी, महेश नावंदर आदी उपस्थित होते. डॉ.गांधी यांना हेल्मेट भेट देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी आयोजित छोटेखानी कार्यक्रमात, जानेवारी व फेब्रुवारी 2021 मध्ये उपप्रादेशिक परिवहन कार्यालय श्रीरामपूर यांचेकडून वाहतूक नियमांबद्दल प्रबोधन होण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे; त्याअंतर्गत परिवहन अधिकारी निमसे यांनी वाहतूक नियमांबद्दल जनजागृती केली आहे. त्यांनी दैनंदिन उपयोगातील प्राथमिक वाहतूक नियम, चालकाकडून होणार्या चुका व त्याचे परिणाम याबाबत सविस्तर विवेचन केले. तसेच आपले वाहन सुस्थितीत ठेवावे व हेल्मेटचा वापर करावा, असे आवाहन केले. रस्ते अपघातात दुचाकी वाहनांचे प्रमाण जास्त आहे. दुचाकींचे मागील दिवे बंद असल्याने अपघाताचे प्रमाण वाढते. दुचाकीला मागे लाल रिफ्लेक्टर्स असल्यास असे अपघात कमी होऊ शकतात. याकरिता उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी अशफाक खान यांच्या संकल्पनेतून संगमनेर येथे नाशिकरोड, मेनरोड, बाजारपेठ, बस स्थानक परिसरातील सुमारे दोन हजार दुचाकींना मोफत लाल रिफ्लेक्टर्स परिवहन कार्यालयातर्फे लावण्यात आले. याप्रसंगी प्रांताधिकारी डॉ.शशीकांत मंगरुळे उपस्थित होते. महाराष्ट्रात प्रथमच अशा प्रकारचे अभियान राबविण्यात आले. या अभियानासाठी संगमनेर शहरातील विविध वाहन वितरक, मोटर ड्रायव्हिंग स्कूलचे चालक, वाहन मालक-चालक यांचे प्रतिनिधी आदिंचे सहकार्य लाभले.
