संघाच्या विजयादशमी संचलनाचे पालिकेला वावडे! नगरसेवकाच्या पत्रानंतरही कारवाई नाही; पालिकेच्या दुटप्पी भूमिकेचीही चर्चा..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
शतकोत्तर स्थापनादिवस साजरा करणार्‍या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मंगळवारी निघालेले पथसंचलन शहरात आकर्षणाचा विषय ठरले असतानाच एरवी ‘विशिष्ट’ मिरवणुकांचे स्वागत करण्यासाठी आग्रही असणार्‍या पालिकेने मात्र त्यापासून राखलेले अंतरच अधिक चर्चेत आले आहे. विशेष म्हणजे पालिकेच्या एका विद्यमान नगरसेवकाने अन्य धार्मिक मिरवणुकांप्रमाणे संघाच्या स्थापनादिवस संचलनाचे स्वागत करण्याबाबत पालिकेशी पत्रव्यवहारही केला होता. मात्र त्या उपरांतही प्रशासनासह सत्ताधारीगटाने दसर्‍याच्या दिनी निघालेल्या संचलनाच्या स्वागतापासून फारकत घेतल्याने ‘त्या’ अपक्ष नगरसेवकाने पालिकेच्या प्रवेशद्वारावरच फटाक्यांच्या जोरदार आतषबाजीसह पृष्पवृष्टी करीत अभूतपूर्व स्वागत केले. त्यामुळे ‘टीपू’ सुलतानाची प्रतिमा मिरवणार्‍या धार्मिक मिरवणुकांचे स्वागत करण्यासाठी धडपडणार्‍या पालिकेला संघाच्या संचलनाचे मात्र वावडे का? यावरुन आता प्रश्‍न उपस्थित होत असून एकमेकांना टाळ्या देत नवनवीन चर्चेचे फडही रंगू लागले आहेत.


स्थापनेचे शतक पूर्ण करणार्‍या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संगमनेर नगरपालिकेशी खूप जिव्हाळ्याचे नाते आहे. पूर्वीपासून पालिकेच्या प्रांगणातच संघाच्या दैनंदिन शाखा लागतात व त्यात शेकडों तरुण व लहान मुलं सहभागी होतात. संघाची स्थापना भगवा झेंडा समोर ठेवून केली गेल्याने स्वतःला धर्मनिरपेक्ष मानणार्‍या काँग्रेसने सुरुवातीपासूनच त्याचा द्वेष केल्याचे असंख्य दाखले आहेत. तळागाळात जावून, समाजाशी समरस होवून काम करण्याच्या संघाच्या पद्धतीमुळे भविष्यात त्यातूनच सत्ता परिवर्तनाचा जन्म होईल अशी राजकीय भीती असल्याने तत्कालीन काँग्रेसच्या राज्यकर्त्यांनी हरप्रकारे संघाला चिरडण्याचा प्रयत्न केला. नथुराम गोडसेचा संघाशी संबंध जोडून महात्मा गांधींच्या हत्येचा ठपका ठेवून संघबंदीही घालण्यात आली.


आजही काँग्रेससह डाव्या अथवा निरपेक्ष विचारसरणीची सरकारं असलेल्या राज्यात संघाच्या पथसंचलनावर बंदी घातली जाते आणि न्यायालयांकडून ती उठवली जात असल्याचे प्रकारही घडतात. तामीळनाडूनच्या विजय सरकारचा आदेश आणि त्यावर चेन्नई उच्च न्यायालयाचा निर्णय अतिशय बोलका आहे. त्यामुळे काँग्रेससह डाव्या पक्षांनी नेहमीच संघाला लक्ष्य केले आहे, मात्र प्रत्येकवेळी संघाने न डगमगता आपला प्रवास सुरु ठेवताना तळागाळात आणि गावखेड्यात पोहोचून शतकाचा प्रवासही पूर्ण केला आहे आणि प्रत्येकवेळी संघावर लावण्यात आलेल्या आरोपांना आपल्या सामाजिक कृत्यातून सडेतोड उत्तरही दिले आहे.


यंदाच्यावेळी संगमनेरात घडलेल्या राजकीय घडामोडी पाहता एरवी विशिष्ट धार्मिक मिरवणुकांसाठी आग्रही असणार्‍या आणि हजारोंच्या भावना दुखावून टीपू सुलतानासारख्या क्रूर राज्यकर्त्याचे महिमामंडन करणार्‍या जुलूसचे स्वागत करण्यातही मागेपुढे न पाहणार्‍या पालिकेकडून बदललेल्या राजकीय स्थितीशी जुळवून घेत संघ संचलनाचे स्वागत होईल असे अपेक्षित होते. मात्र विजयादशमीची पूर्वसंध्या येवूनही तशी हालचाल नसल्याने अपक्ष नगरसेवक योगेश उर्फ चिकू जाजू यांनी मुख्याधिकार्‍यांची भेट घेवून त्यांना संगमनेरच्या संघ पथसंचलनाचे ऐतिहासिक महत्व आणि पालिकेकडून केल्या जाणार्‍या धार्मिक मिरवणुकांच्या स्वागताचे संदर्भ देत या सोहळ्याच्या स्वागताचेही आयोजन करण्याची मागणी केली.


मात्र त्यांच्या देहबोलीतूनच त्यासाठी ते फारकाही उत्साही असल्याचे दिसून आले नाही. त्यामुळे नगरसेवक जाजू यांनीच पुढाकार घेत पालिकेच्या प्रवेशद्वारावरच बाजारपेठ व्यापारी मंडळाच्या नावाखाली मंच उभारुन फटाक्यांची जोरदार आतषबाजी आणि पृष्प पाकळ्यांची उधळण करीत विजयादशमीच्या दिनी संघाच्या शतकोत्तर पथसंचलनाचे जोरदार स्वागत केले. हा सोहळा डोळ्यात भरण्यासाठी इतक्या सकाळीही महात्मा फुले आणि शास्त्री चौकात गर्दी जमली होती. अनेकांनी पालिकेच्या ऐतिहासिक प्रवेशद्वाराच्या पार्श्‍वभूमीवर खासगी मंडळाकडून सुरु असलेल्या स्वागत सोहळ्याचे चित्रण करुन आपापल्या विचारांच्या ओळींसह त्याला सोशल समूहाच्या सागरात लोटून दिले, त्यावरुन रस्त्यापासून मोबाईलपर्यंत पालिकेच्या दुटप्पी भूमिकेवरुन चर्चा रंगात येवून त्यांनी चौक आणि गल्ल्यांमध्येही स्थान मिळवले. विशिष्ट धार्मिक मिरवणुकांमध्ये काही प्रकार वादग्रस्त ठरत असताना पालिकेकडून होणारे स्वागत आणि संघाच्या पथसंचलनापासून मात्र फारकत यावरुन प्रत्येक ठिकाणच्या चर्चेचा रंगही बदलता आहे.


मध्यंतरी हजरम मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीच्या जुलूसमध्ये हजारोंची कत्तल घडवणारा आणि इतिहासाच्या पानांत अतिशय कडवा आणि क्रूर शासक म्हणून ओळख असलेल्या टीपू सुलतानची प्रतिमा आणि बहुसंख्य लोकांच्या वस्तीत राजरोसपणे त्याला दुग्धाभिषेक घालण्याचा प्रकार घडला होता. तो रोखण्यासाठी वरीष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी हस्तक्षेपही केला होता, मात्र त्यांच्यावर जमावाने दबाव आणून ताब्यात घेतलेल्या तरुणाची बेकायदा सुटका करुन पोलिसांनी मनाई केलेली प्रतिमा पुन्हा नाचवून त्याला दुग्धाभिषेकही घातला गेला होता, मात्र पालिकेला त्यात कोणताही कट्टरतावाद दिसला नाही. तळागाळात जावून, नैसर्गिक आपत्तीत सर्वात आघाडीवर राहणार्‍या, राष्ट्रप्रथम मानून देशासाठी प्रसंगी काहीही करण्याची तयारी असलेला संघ मात्र धार्मिक कट्टर असल्याने संचलनाच्या स्वागतापासून फारकत अशा पालिकेच्या या दुटप्पी भूमिकेवरुन शहरभर चर्चा रंगली असून पालिकेला संघाचे वावडे का? असा प्रश्‍न विचारला जात आहे.

Visits: 14 Today: 14 Total: 2225481

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *