मुद्रांक विक्रेत्यांनी वाढीव दर आकारू नये, अन्यथा गाठ शिवसेनेशी ः सिनगर

मुद्रांक विक्रेत्यांनी वाढीव दर आकारू नये, अन्यथा गाठ शिवसेनेशी ः सिनगर
कोपरगावच्या तहसीलदारांना शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षातर्फे निवेदन
नायक वृत्तसेवा, कोपरगाव
येथील तहसील कार्यालयाच्या आवारात अनेक अधिकृत शासनमान्य मुद्रांक विक्रेत्यांकडून ‘मुद्रांक व न्यायालयीन तिकीट’ यासाठी ठराविक रकमेपेक्षा जास्त पैसे आकारात असल्याबाबत आमच्या जिल्हा कार्यालयात लेखी तक्रारी प्राप्त झाल्या असून आमच्या तालुका पदाधिकार्‍यांनी तहसील परिसरात ‘स्टिंग ऑपरेशन’ केले आहे. त्याची तात्काळ दखल घेऊन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे यांच्या नेतृत्वाखाली नुकतीच तहसीलदार योगेश चंद्रे यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाची फसवणूक करणार्‍या मुद्रांक विक्रेते व पाठिशी घालणार्‍या अधिकार्‍यांवर कठोर कारवाई करून दोषींचे परवाने रद्द करण्याबाबत तात्काळ ठोस पावले उचलावीत. अन्यथा गाठ शिवसेनेशी असल्याचा इशारा शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे जिल्हाप्रमुख मुकुंद सिनगर यांनी दिला आहे.

संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यात कुठल्याही तालुक्यातील तहसील कार्यालयीन आवारात मुद्रांक व न्यायालयीन तिकिटापोटी अधिक रक्कम घेतली जात नसून मात्र कोपरगाव तहसील आवारात अधिकाराचा गैरवापर करत जनतेची दिवसा लुट सुरु असल्याचे चित्र आहे. आजपासून कुठल्याही ग्राहकाने अधिक पैसे देऊ नयेत असे आवाहनही शिवसेनेच्यावतीने यावेळी करण्यात आले.

नुकतीच कोपरगाव तालुक्यातील काही वृत्तपत्रांनी आपल्या दैनिकात 100 रुपयांच्या मुद्रांकासाठी 10 रुपये अधिक व न्यायालयीन तिकिटासाठी 2 रुपये अधिक घेऊन सर्वसामान्यांची लुट होत असल्याबाबतची बातमी प्रसिद्ध केली होती. याची शिवसेनेने तात्काळ दखल घेऊन तहसील परिसरात अनेक दिवसांपासून अनधिकृत दुकानदार मुद्रांक विक्री करत असल्याबाबत व अधिक पैसे घेत असल्याबाबत कक्ष उपतालुकाप्रमुख सतीश पवार व रोहित पवार यांनी स्टिंग ऑपरेशन केले आहे. याबाबत बोलताना शिवसेना जिल्हाप्रमुख झावरे म्हणाले, शिवसेनेच्या सत्तेचा केंद्रबिंदू सामान्य जनता असून जर जनतेची फसवणूक होत असेल तर शिवसेना कदापि सहन करणार नाही. शासकीय अधिकार्‍यांनी कुणालाही परवाने द्यावेत. परंतु अधिक पैसे आकारले जाऊ नयेत. तसेच जिल्हा कार्यालय प्रमुख अ‍ॅड.राहुल नवले म्हणाले, दुय्यम निबंधक व उपकोषागार अधिकारी यांनी कोपरगाव तालुक्यातील हा प्रकार कायमस्वरूपी बंद करावा. यापुढे अधिकृत परवानाधारक यांच्याकडूनच मुद्रांक व न्यायालयीन तिकीट विक्री केली जावी. तरी ही बाब अतिशय गंभीर असून तातडीने योग्य ते आदेश अथवा सूचना द्याव्यात. अन्यथा यासंदर्भात संबंधित अधिकार्‍यांना दोषी समजून जिल्हाधिकारी व ग्राहक न्यायालय यांच्येकडे तक्रार केली जाईल, असा इशारा दिला आहे.

यावेळी शिवसेनेचे शहरप्रमुख कलविंदर दडीयाल, वाहतूक सेनेचे शहरप्रमुख भरत मोरे, उपशहरप्रमुख गगन हाडा, विकास शर्मा, इरफान शेख यांच्यासह कोपरगावचे कक्ष उपजिल्हाप्रमुख सुधाकर वादे, कोपरगाव कक्ष तालुकाप्रमुख अशोक पवार, कक्ष शहरप्रमुख रवींद्र कथले, कक्ष उपतालुकाप्रमुख देविदास मोरे, कक्ष उपशहरप्रमुख राहुल देशपांडे, माधव आहेर, सतीश शिंगाणे, उत्तम जाधव, विकास माळवेसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Visits: 155 Today: 12 Total: 1585727

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *