रशिया-यूक्रेन युद्ध थांबविण्यासाठी संगमनेरात कॅन्डल मार्च हजारो महिलांनी विविध वेशभूषा साकारुन केले शांततेचे आवाहन

नायक वृत्तसेवा, संगमनेर
‘युद्ध नको, शांती हवी, युद्ध थांबवा, जग वाचवा, पुतीन गो बॅक अशा घोषणा देत संगमनेरातील हजारो महिलांनी नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांच्या नेतृत्वाखाली जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर देशात प्रथम कॅन्डल मार्च काढून यूक्रेन- रशिया युद्ध थांबवत जगात शांतता निर्माण व्हावी यासाठी आवाहन केले आहे.

संगमनेर बसस्थानक येथून जयहिंद लोकचळवळ व संगमनेरमधील विविध सेवाभावी संस्था, बचत गट, शिक्षिका, डॉक्टर, वकील, गृहिणी, इंजिनियर भगिनी यांच्यावतीने महिलांचा कॅन्डल मार्च संपन्न झाला. यावेळी नगराध्यक्षा दुर्गा तांबे, शरयू देशमुख, अ‍ॅड. निशा शिवूरकर, दीपाली पानसरे यांसह हजारो महिला उपस्थित होत्या. महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर हजारो महिला भगिनींनी शांततेत एकत्र येत संगमनेर बसस्थानक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, चावडी, मेनरोड, गवंडीपुरा, लिंक रोड, नवीन नगर रोड असा मोर्चा काढून नवीन नगर रोड येथे यूक्रेन-रशिया युद्धाचा निषेध केला.

यावेळी नगराध्यक्षा दुर्गा तांबे म्हणाल्या की, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी जगाला सत्य व अहिंसेचा मार्ग दिला आहे. जगामध्ये शांतता नांदण्यासाठी युद्ध नको आहे. यूक्रेन आणि रशिया हे वर्चस्ववादातून जगावर युद्ध लागत आहे. हे अत्यंत भयावह आहे. आत्ताच कोरोनाच्या संकटातून जग सावरत असताना नवे युद्धाचे ढग जगासमोर दाटले आहे. ते तातडीने थांबवावे, संपूर्ण मानव जातीला शांततेतून प्रगती हवी आहे. यामध्ये कोणताही वर्चस्ववाद न करता सर्व देशांनी एकत्र येऊन शांततेच्या मार्गाने चर्चा करून प्रश्न सोडवले पाहिजे. सध्या सुरू असलेल्या यूक्रेन-रशिया युद्धामध्ये हजारो निष्पाप लोक मारले गेले आहेत. हे अत्यंत दुःखदायक आहे. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुक्याने कायम राज्याला व देशाला रचनात्मक कार्याची दिशा दिली आहे. संपूर्ण भारतात संगमनेरमधून प्रथम या युद्धाचा कॅन्डल मार्चने निषेध करण्यात आला आहे. तरी तातडीने या दोन्ही देशांनी युद्ध थांबवले पाहिजे असे आवाहन करताना हे युद्ध थांबविण्यासाठी जगातील सर्व देशांनी पुढाकार घ्यावा.

तसेच अ‍ॅड. निशा शिवूरकर म्हणाल्या, संगमनेरने कायम राज्याला दिशा दिली आहे. आज या आंदोलनाची महाराष्ट्रातून सर्वप्रथम सुरुवात येथे होत आहे. युद्धातून मनुष्यहानी होते आहे. आज झालेली प्रगती अनेक दशकांची आहे. मात्र विध्वंसक हा काही क्षणांचा आहे. जग टिकवायचे असेल, मानव धर्म टिकवायचा असेल या युद्धाचा निषेध केलाच पाहिजे. संगमनेरमधील हजारो महिला रस्त्यावर एकवटल्या आहेत. महिला दिनानिमित्त मोठी ताकद जगाला कळणार असल्याचेही त्या म्हणाल्या.

या मार्चमध्ये हजारो महिला सहभागी झाल्या होत्या. छोट्या-छोट्या विद्यार्थिनींनी राष्ट्रपिता महात्मा गांधी, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, रमाबाई आंबेडकर, राजमाता जिजाऊ, मदर तेरेसा, इंदिरा गांधी अशा विविध राष्ट्रपुरुष व महिलांच्या वेशभूषा करून रशिया-यूक्रेन युद्धाचा निषेध केला.

Visits: 13 Today: 1 Total: 116821

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *