घुलेवाडीच्या लोकनियुक्त सरपंचाविरुद्ध अविश्‍वास ठराव मंजूर! लोकनियुक्तिच्या अलिकडच्या काळात घडलेल्या ‘अविश्‍वास’ प्रकाराने राजकीय वर्तुळात खळबळ..

 
नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर तालुक्यातील राजकीय दृष्टीने अत्यंत महत्त्वाची समजली जाणारी घुलेवाडी ग्रामपंचायत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. घुलेवाडीचे लोकनियुक्त सरपंच सोपान राऊत यांच्या विरोधात ग्रामपंचायत सदस्यांनी दाखल केलेल्या ‘अविश्‍वास’ ठरावानंतर आज विशेष सभा बोलावण्यात आली होती. त्यात उपस्थित सतरा सदस्यांसह सरपंचांचे मतदान घेतल्यानंतर ठरावाच्या बाजूने सोळा मते पडल्याने अविश्‍वास ठराव मंजूर करण्यात आला आहे. याबाबतचा सविस्तर अहवाल जिल्हाधिकार्‍यांना पाठविण्यात आला आहे. या विशेष सभेचे अध्यासी अधिकारी म्हणून तहसीलदार अमोल निकम यांनी कामकाज पाहीले.


संगमनेर शहरालगतच असलेली घुलेवाडी ग्रामपंचायत महसुलाच्या बाबतीत तालुक्यात श्रीमंत समजली जाते. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्यासह अमृत उद्योग समूहाचे बहुतेक प्रकल्प, तालुका दुध संघ, कामगार वसाहत, संगमनेर महाविद्यालयासह विविध शैक्षणिक संस्था असलेल्या घुलेवाडीत संगमनेर शहरातील विस्तारीत वसाहतींचाही मोठ्या प्रमाणात सहभाग आहे. त्यामुळे राजकीय दृष्टीकोनातून तालुक्याच्या राजकारणात घुलेवाडीला अनन्य महत्त्व आहे. या ग्रामपंचायतवर महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे नेहमीच वर्चस्व राहीले आहे.


मागील मोठ्या कालावधीपासून घुलेवाडीचे लोकनियुक्त सरपंच सोपान राऊत यांच्याविरोधात सदस्यांमध्ये खद्खद् सुरु होती. त्याचे पर्यवसान अविश्‍वास ठराव आणण्यात झाले. त्यानुसार आज (ता.5) अध्यासी अधिकारी तथा संगमनेरचे तहसीलदार अमोल निकम यांच्या अध्यक्षतेखाली घुलेवाडी ग्रामपंचायतीची विशेष सभा बोलावण्यात आली होती. या सभेला सतरा सदस्यांसह सरपंच उपस्थित होते. यावेळी अविश्वास ठरावाच्या नोटीसमध्ये नमूद मुद्द्यांवर सर्वांची मते जाणून घेण्यात आली. सरपंच सोपान राऊत यांनीही आपली बाजू मांडली. त्यानंतर अविश्वास ठरावावर मतदान घेण्यात आले. यावेळी सोळा सदस्यांनी ठरावाच्या बाजूने तर अवघ्या दोघांनी ठरावाच्या विरोधात मतदान केले. ठरावाच्या बाजूने तीन चतुर्थांशपेक्षा अधिक मते असल्याने सदरचा अविश्‍वास ठराव मंजूर करण्यात आला.


मात्र, सरपंच राऊत हे थेट जनतेतून निवडून आल्याने आज पार पडलेल्या विशेष सभेचा संपूर्ण अहवाल जिल्हाधिकार्‍यांना पाठविण्यात आला असून त्यांचेकडील पुढील आदेशानुसार घुलेवाडीतील ग्रामसभेत याबाबत मतदानाची प्रक्रिया राबविली जाईल असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले आहे. मतदान प्रक्रियेनंतरच घुलेवाडीचे सरपंचपद रिक्त होईल किंवा नाही हे चित्र स्पष्ट होणार आहे. संगमनेर तालुक्याच्या राजकारणात घुलेवाडीचा नेहमीच वरचष्मा राहीला आहे. संगमनेर तालुक्यातील सर्वाधीक लोकसंख्या आणि महसुल असलेली ग्रामपंचायत अशी ओळख असलेल्या घुलेवाडीच्या लोकनियुक्त सरपंचांवर अविश्‍वास ठराव मंजूर झाल्याने तालुक्यासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. अलिकडच्या काळात लोकनियुक्त पदाधिकार्‍यावर अशा पद्धतीने अविश्‍वास ठराव मंजूर होण्याची बहुधा ही पहिलीच वेळ असल्याने जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघाले आहे.


सुमारे साडेतीन वर्षांपूर्वी झालेल्या राज्यातील ग्रामपंचायत निवडणूकांमध्ये सरपंचाची निवड थेट जनतेतून करण्यात आली होती. या निवडणूकीत संगमनेरच्या राजकारणात अनन्य महत्त्व असलेल्या घुलेवाडी सरपंचपदासाठी सोपान व त्यांचा भाऊ बाळासाहेब राऊत हे दोघे सख्खे भाऊ निवडणूकीच्या रिंगणात उतरल्याने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष्य घुलेवाडीकडे खिळले होते. प्रत्यक्ष मतदानानंतर अपक्ष म्हणून उभ्या राहीलेल्या सोपान राऊत यांनी आपल्याच भावाचा मोठ्या मताधिक्क्याने पराभव करीत सरपंच पटकाविले होते, तेव्हापासून ते सतत चर्चेत आहेत. आज त्यांच्यावरील अविश्‍वास ठराव मंजूर झाल्याने जिल्हाधिकार्‍यांच्या निर्णयापर्यंत ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

Visits: 17 Today: 1 Total: 115530

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *