जिल्हाधिकार्‍यांच्या संवादामुळे राहीबाईंच्या डोळ्यातून तरळले आनंदाश्रू! महिला दिनाच्या पूर्वसंध्येला बांगरवाडीतील मायलेकीला मिळाली अनोखी भेट

नायक वृत्तसेवा, अकोले
तालुक्याच्या आदिवासी पट्ट्यातील बांगरवाडी येथील राहीबाई भांगरे व त्यांची सावत्र मुलगी सीताबाई सुपे या वृध्द मायलेकी अनेक दिवसांपासून हक्काच्या पेन्शनपासून वंचित होत्या. याबाबत वृत्तपत्रातून माहिती मिळाल्यावर अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला सोमवारी (ता.7) अचानकपणे बांगरवाडी गाठत आपुलकीने व आस्थेवाईकपणे त्यांच्याशी संवाद साधला. जिल्हाधिकार्‍यांनी आपुलकीने साधलेल्या संवादामुळे राहीबाई भांगरेंच्या डोळ्यातही आनंदाश्रू दाटून आले.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांच्यासोबत अकोलेचे तहसीलदार सतीश थेटे, नायब तहसीलदार गणेश माळवे उपस्थित होते. याप्रंगी जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी राहीबाईंना तब्येत कशी आहे? घरकुल हवे आहे का? असे प्रश्न विचारुन त्यांची परिस्थिती जाणून घेतली. जिल्हाधिकार्‍यांच्या अनपेक्षित भेटीनं व विचारपूस केल्यानं राहीबाईंचा हुंदका दाटून आला. यावेळी जिल्हाधिकार्‍यांनी त्यांना द्राक्षेही भेट दिले.

बांगरवाडी येथील भेटीनंतर जिल्हाधिकार्‍यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या पेन्शनबाबत अकोले तालुका प्रशासनाची बैठक घेतली. तहसील कार्यालयाने यापुढे ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन मिळत आहे का? याची नियमित चौकशी करावी. ज्येष्ठ नागरिकांची परस्पर पेन्शन लाटणार्‍या व्यक्तींवर गुन्हा दाखल करा. तसेच यापुढे ज्येष्ठांची फसवणूक होणार नाही यंची दक्षता प्रशासनाने घ्यावी, असा आदेशच जिल्हाधिकार्‍यांनी प्रशासनाला दिला.

Visits: 198 Today: 1 Total: 2121814

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *