कोरोना संकटामुळे शेतकरी पुन्हा नैराश्यात! कोठे बुद्रूकच्या कलिंगड उत्पादकाने मांडली व्यथा

नायक वृत्तसेवा, घारगाव
गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या कोरोना संकटामुळे शेती व्यवसाय अक्षरशः डबघाईला आला आहे. टाळेबंदीमुळे विस्कळीत झालेले जनजीवन पुन्हा हळूहळू पूर्वपदावर आले. परंतु, पुन्हा संक्रमण वाढू लागल्याने शेती व्यवसायावर मोठा परिणाम होवू लागला आहे. इंधन दरवाढ, महागाई, कवडीमोल बाजारभाव आणि बाजारपेठांचा अभाव यामुळे शेती व्यवसाय कोंडीत सापडला असून शेतकरी नैराश्याच्या गर्तेत गेले आहेत. याबाबतची व्यथा संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील कोठे बुद्रूक येथील शेतकर्‍याने आमच्या प्रतिनिधीशी बोलताना मांडली आहे.

कोठे बुद्रूक येथील शेतकरी रमेश वाकळे यांची परिसरात प्रयोगशील शेतकरी म्हणून ओळख आहे. सद्यपरिस्थितीत शेतीचे होत असलेले हाल बघता आमच्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी बोलताना शेतकरी वाकळे म्हणाले, मी दरवर्षी वेगवेगळे प्रयोग करुन विविध पिकांचे उत्पादन घेतो. परंतु, गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या कोरोना संकटामुळे शेती व्यवसाय अडचणीत आला आहे. मागच्या वर्षी कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी लागू केलेल्या टाळेबंदीमुळे शेतीमाल अक्षरशः शेतातच सडून गेला. शेतीमाल विक्रीसाठी वाहतूक आणि बाजारपेठा बंद असल्याने मोठ्या कष्टातून पिकविलेला माल अक्षरशः उघड्यावर अथवा शेतातच फेकून द्यावा लागला. यामुळे संपूर्ण हंगाम वाया गेला.

या मोठ्या संकटातून कसेबसे सावरुन उन्हाळ हंगामातील कलिंगडाची चार एकरावर लागवड केली. यासाठी सुमारे दोन लाख रुपये खर्चही केला. परंतु, काढणीला आलेले कलिंगड व्यापारी अवघ्या सहा रुपये प्रतिकिलो दराने मागत असल्याने खर्चही वसूल होण्याचा प्रश्न पडला आहे. तत्पूर्वी नगदी पीक म्हणून टोमॅटो, सिमला मिरचीची देखील लागवड केली होती. मात्र, त्यालाही बाजारभाव मिळाले नसल्याने तेथे पदरी निराशाच पडली. एकीकडे कोरोनाचे नाव पुढे करुन व्यापारी शेतकर्‍यांकडे कवडीमोल भावाने माल मागत आहे. तर दुसरीकडे केलेला खर्चही निघत नसल्याने शेती करावी की नाही अशी व्यथा शेतकरी वाकळे यांनी मांडली आहे.

कोरोना संकटामुळे शेतकरी, शेतमजूर, व्यावसायिक, उद्योग आदी क्षेत्रांवर विपरित परिणाम झाला आहे. यातून कसेबसे सावरत असतानाच पुन्हा कोरोनाचे संक्रमण वाढू लागले आहे. याचा प्रतिकूल परिणाम सध्या दिसू लागला आहे. यामुळे शेती करावी की नाही या निर्णयाप्रत शेतकरी आले असल्याचे दुर्दैवी चित्र दिसू लागले आहे.

Visits: 171 Today: 1 Total: 1597087

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *