… आणि माळ काढणार्‍यांना कोरोना गाठणारच! ः इंदुरीकर इंदुरीकर महाराज पुन्हा वादात; तृप्ती देसाईंची कारवाईची मागणी

नायक वृत्तसेवा, संगमनेर
समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांनी पुत्रप्राप्तीसंबंधी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे प्रकरण अद्याप न्यायालयात सुरू आहे. अशातच आता त्यांच्या कोरोनाबंधीच्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला आहे. ‘मी माळकरी आहे म्हणून मला कोरोना होणार नाही आणि माळ काढणार्‍यांना कोरोना गाठणारच,’ असे वक्तव्य इंदोरीकरांनी कीर्तनातून करून अंधश्रद्धा पसरविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी केला आहे. याबद्दल त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणीही देसाई यांनी केली आहे.

यासंबंधी देसाई यांनी म्हटले आहे, ‘कोरोना ही महाभयंकर महामारी आहे. सध्या तिसरी लाट येत आहे. याआधी अनेक जणांना कोरोनामुळे मृत्यूला सामोरे जावे लागले आहे. तर अनेक जण मृत्यूच्या दारातून बाहेर आले आहेत, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यातच सरकार सुद्धा जनजागृती करत आहेच, परंतु स्वतःला कीर्तनकार म्हणविणारे इंदुरीकर पुन्हा एकदा असे वक्तव्य करून अंधश्रद्धेला खतपाणी घालत आहेत. ‘मी माळकरी आहे म्हणून मला कोरोना होणार नाही आणि माळ काढणार्‍यांना कोरोना गाठणारच,’ असे सांगून कीर्तनाच्या माध्यमातून इंदुरीकर अंधश्रद्धा पसरवत आहेत,’ असा आरोप देसाई यांनी केला आहे.

यासंबंधी इंदुरीकरांवर कारवाई करा, अन्यथा अंधश्रद्धा पसरविण्यात सरकारचे प्रतिनिधी सुद्धा सामील आहेत असे जनतेला वाटेल, असे सांगून देसाई यांनी म्हटले आहे, ‘सरकारमधील नेते आणि विरोधी पक्षातील नेते यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमांना इंदुरीकर यांना बोलविले जाते. तेथे गर्दी जमा होते. आता लवकरच निवडणुका आहेत. म्हणूनच दरवेळी त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न या सर्व नेत्यांकडून केला जातो. यापूर्वी सुद्धा इंदुरीकर यांच्या कोरोनावरील वक्तव्यावर सरकारने कोणतीही कारवाई केली नाही. हिंमत असेल तर आणि आपल्या राज्यात सर्वांना कायदा समान असेल तर सरकारने इंदुरीकरांवर गुन्हा दाखल करावा. अन्यथा अंधश्रद्धा पसरवण्यात सरकारसुद्धा सामील आहे असे जनतेला वाटेल,’ असेही देसाई यांनी म्हटले आहे.

Visits: 206 Today: 1 Total: 1915324

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *