कत्तलखान्यात सापडलेल्या ‘डायरी’तील गायींच्या रक्ताचे लाभार्थी कोण? पोलीस अधिकार्‍यांसह नगरसेवक व पत्रकारांच्या नावाचा समावेश असल्याची जोरदार चर्चा..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेरातील बेकायदा कत्तलखान्यांवरील कारवाईला सहा दिवसांचा कालावधी उलटला आहे. या दरम्यान पोलीस आणि पालिका प्रशासनाने कत्तलखाने उध्वस्त करण्याची कारवाई केली आहे. मात्र त्यातून या कारवाईच्या आणि कत्तलखाने सुरु ठेवण्यास पाठबळ देणार्‍यांच्या चर्चा मात्र अद्यापही सुरुच आहेत. या कारवाई दरम्यान भिवंडीचे प्राणीकल्याण अधिकारी यतीन जैन यांना नवाज कुरेशी याच्या कत्तलखान्यातून एक डायरीही सापडली होती. मात्र त्या डायरीतील नोंदी अद्यापही सार्वजनिक नसल्याने संगमनेरात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. सदरचे कत्तलखाने विनाअडथळा सुरु राहावेत यासाठी त्यांच्या चालकांकडून महिनाकाठी मोठी रक्कम मोजली जात होती, त्याचे संपूर्ण विवरणच या डायरीत असल्याचीही चर्चा सुरु असून गायींच्या रक्ताचे लाभार्थी कोण यावर विविध तर्कवितर्क सुरु आहेत.

गेल्या शनिवारी (ता.2) गांधी जयंतीच्या दिवशी संगमनेरातील बेकायदा पाच कत्तलखान्यांवर श्रीरामपूरचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या नेतृत्त्वाखालील पथकाने छापा घातला होता. या कारवाईत पोलिसांनी एकाच वेळी 31 हजार किलो गोवंशाच्या मांसासह तब्बल एक कोटी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला होता. या कारवाईदरम्यान नवाज कुरेशी याच्या कत्तलखान्यावरील कारवाईत पोलिसांना 4 लाख 28 हजार रुपयांची रोकड आणि एक डायरी हाती लागली होती. अर्थात सदरची रक्कम आणि ‘त्या’ डायरीचा शोध बजरंग दलाचे प्राणीकल्याण अधिकारी यतीन जैन यांनी लावला होता व मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी सदरची डायरी आपल्याकडेच ठेवली होती. मात्र त्या डायरीत नेमकी कोणकोणाची नावे आहेत याचा उलगडा कारवाईनंतर सहा दिवस झाले तरीही होत नसल्याने संगमनेरात उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत.

दैनिक नायकला मिळालेल्या माहितीनुसार या कारवाई दरम्यान सापडलेल्या ‘त्या’ डायरीत कत्तलखाने सुरळीत सुरु रहावेत यासाठी महिन्याकाठी ज्यांना ज्यांना ‘लाच’ दिली जात होती, त्या सर्वांची नावे आहेत. त्यात काही पोलीस अधिकारी, काही कर्मचारी, तसेच संगमनेरातील आजी व माजी असलेले सहा नगरसेवक, काही सामाजिक कार्यकर्ते व चक्क दोघा पत्रकारांची नावे असल्याची चर्चा आहे. या कारवाईत घडलेल्या सगळ्या गोष्टी आजवर समोर आल्या आहेत, मात्र कारवाईत सापडलेली ‘ती’ डायरी अजूनही समोर येत नसल्याने आश्चर्यही व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे कारवाईत सापडलेल्या सगळ्या गोष्टी रेकॉर्डवर घेतल्या जातात, मात्र पोलिसांकडून मिळालेल्या माहितीत त्या डायरीचा कोठेही उल्लेख नसल्याने कत्तलखान्यांवरील शंका मात्र आजही जिवंतच आहे.

सदरच्या डायरीत कत्तलखाने सुरु ठेवण्यासाठी ज्यांची मदत आवश्यक आहे अशा सगळ्यांची नावे आणि त्यांना महिनाकाठी मोजल्या जाणार्‍या रकमेचे तपशील आहेत. ती डायरी पोलिसांच्या हाती लागली असती तर आत्तापर्यंत नष्टही झाली असती, याची पूर्ण कल्पना असल्यानेच प्राणी कल्याण अधिकारी यतीन जैन यांनी ती आपल्या ताब्यात घेतल्याचे बोलले जात. मात्र त्यांचा कारवाईमागील हेतू स्पष्ट असतानाही त्या डायरीतील नावे अजूनही समोर येत नसल्याने आश्चर्यही व्यक्त होत आहे. त्यामुळे शहरात कत्तलखान्यांवरील कारवाई अजूनही चर्चेत असून ‘त्या’ डायरीत नमूद गायींच्या रक्ताचे लाभार्थी कोण असा सवाल विचारला जात आहे.

Visits: 138 Today: 3 Total: 1101842

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *