नरभक्षक बिबट्याने महिलेचा घोट घेतला! मेंढवण परिसरात दहशत; सायंकाळी सातच्या सुमारास घडली घटना..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
भक्ष्य व पाण्याच्या शोधासाठी पाणथळ भागातील बिबट्यांचा संचार तसा संगमनेर तालुक्याला नवा नाही. प्रवरा पट्ट्यातील ऊसाच्या मोठ्या क्षेत्रात बिबट्यांचा मुक्काम हमकास असतो. त्यांच्याकडून पाळीव प्राण्यांवरील हल्लेही तालुक्याला नियमीत आहेत. आज मात्र या सामान्य संचाराने हिंसेचे रुप घेत चक्क महिलेवरच झडप घातली. आधीच घात लावून बसलेल्या बिबट्याने नेमका हल्ला केल्याने या दुर्देवी महिलेला बचावाची संधीच मिळाली नाही. घरातल्या लोकांनी कालवा केल्यानंतर नरभक्षक बनलेला हा बिबट्या महिलेला सोडून निघून गेला. या घटनेने परिसरात दहशतीचे वातावरण तयार झाले आहे.
याबाबत समजलेल्या माहितीनुसार सदरची घटना आज सायंकाळी तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दितील मेंढवण गावच्या बढे वस्तीवर घडली. येथील हिराबाई एकनाथ बढे (वय 45) ही महिला आपल्या घराच्या बाहेरील बाजूस आवरासावर करीत असतांना जवळच्या झुडपात घात लावूल बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर अचानक घात केला. सदरचा बिबट्या त्या महिलेपासून अगदी एकाच टप्प्याच्या अंतरावर असल्याने त्याने थेट त्या महिलेचा गळाच जबड्यात पकडला, त्यामुळे त्यांना प्रतिकार करण्याची संधीच मिळाली नाही. बिबट्याचे दात त्या महिलेच्या गळ्यात खोलवर घुसल्याने त्यातून त्यांना गंभीर दुखापत झाली, त्यात बिबट्याच्या नखांनीही शरीरावर अन्यत्र जखमा झाल्याने त्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला.
त्यांच्या कुटुंबातील अन्य लोकांसह आसपासच्या मंडळींनी आरडाओरड केल्यानंतर बिबट्याने काही अंतर ओढीत नेल्यावर त्या महिजलेला सोडून दिले व तेथून धूम ठोकली. त्यांच्या नातेवाईकांनी तातडीने खासगी वाहनातून त्यांना प्रवरा ग्रामीण रुग्णालय येथे दाखल केले. मात्र दुर्दैवाने उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक पांडूरंग पवार, उपनिरीक्षक विरु खंडीझोड, वनक्षेत्रपाल सागर माळी, वनपाल प्रशांत पुंड, वनरक्षक संतोष पारधी, एस,बी.सोनवणे यांच्यासह पोलीस कर्मचार्यांनी मेंढवणमध्ये धाव घेतली. सदर महिलेचा मृत्यू बिबट्याच्या हल्ल्यातच झाल्याच्या वृत्ताला वनपाल पुंड यांनी दुजोरा दिला आहे. या घटनेने परिसरात बिबट्याची दहशत निर्माण झाली असून आतातर त्याने मानवावर हल्ला केल्याने त्याचा त्वरीत बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.