अमरधाम प्रकरणी भाजयुमोच्या शहराध्यक्षांची 48 तासांतच कोलांटी! गणपुले म्हणजे ‘बोले तैसे चाले; पुरावे असतील तर अमर कतारी यांनीच तक्रार दाखल करण्याचेही दिले आव्हान..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष अॅड.श्रीराम गणपुले यांनी संगमनेरच्या अमरधाम प्रकरणात ज्या प्रमाणे सांगितले, त्या प्रमाणे कामही करुन दाखवले. जिल्हाधिकारी कार्यालयातील कामकाज कसे चालते याबाबत आपले अज्ञान होते. त्यामुळे तक्रार केली की लागलीच कारवाई होते हा आपला समज झाल्याने या प्रकरणातून आपल्याला डावलल्याचा गैरसमज निर्माण झाला. हाच धागा पकडून शिवसेनेचे (ठाकरे गट) शहरप्रमुख अमर कतारी यांनी आपल्याशी फोनवर संपर्क साधून झाल्या संवादाचे भांडवल केले व त्याचे अनेक अर्थ काढून आपल्याबद्दल समाजात गैरसमज निर्माण केल्याचा गंभीर आरोप भाजयुमोचे शहराध्यक्ष दीपेश ताटकर यांनी आज प्रसिद्धी पत्रकातून केला आहे. त्यांच्या या बदललेल्या भूमिकेने शहरात नव्या चर्चेला तोंड फुटले असून शिवसेनेसारख्या मोठ्या पक्षाच्या शहरप्रमुखांनी कोणतीही खातरजमा न करता व सबळ पुरावा हाती नसतांनाही थेट लाचखोरीचे केलेले आरोप आता त्यांच्याच अंगलट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

गेल्यावर्षी 15 डिसेंबररोजी भाजपाशी संलग्न असलेल्या भारतीय जनता युवा मोर्चाने संगमनेरच्या हिंदू स्मशानभूमीच्या झालेल्या कामाच्या नव्याने दोन निविदा काढण्यात आल्याचा मुद्दा समोर आणला होता. या प्रकरणात युवामोर्चाचे शहराध्यक्ष दीपेश ताटकर यांनी पालिकेच्या मुख्याधिकार्यांना निवेदन देवून सदरच्या निविदा रद्द करण्याचीही मागणी केली होती. मात्र त्यावर कोणतीही कारवाई न झाल्याने भाजयुमोसह भाजपाने 28 डिसेंबररोजी साखळी उपोषणासह 31 डिसेंबररोजी अमरधामचा जनता पंचनामही केला होता. या प्रकरणात भाजयुमो व भाजप या दोन्ही संघटना सुरुवातीपासूनच सोबत असल्याचे दिसून आले होते. मात्र त्यानंतरच्या विविध पातळीवरील कायदेशीर लढाईत मात्र या प्रकरणाची सगळी सूत्रे भाजपाचे शहराध्यक्ष अॅड.श्रीराम गणपुले व सरचिटणीस जावेद जहागिरदार यांनी आपल्या हाती घेतली.

या दरम्यान विविध पातळ्यांवर घडलेल्या घडामोडी, या प्रकरणाच्या चौकशीसाठी गेलेला वेळ, 2 मार्चरोजी नगरला थेट पोलीस अधीक्षकांकडे आर्थिक गुन्हे शाखेमार्फत झालेली चौकशीची मागणी, त्यानंतर जिल्हाधिकार्यांनी नियुक्त केलेली द्विसदस्यीय समिती आणि समितीचा अहवाल, प्रत्यक्ष गुन्हा दाखल करण्यात झालेला मोठा विलंब, चौकशी समितीच्या अहवालाबाबतची साशंकता, त्यानंतर मूळ फिर्यादींना वगळून 16 सप्टेंबरच्या मध्यरात्री श्रीरामपूरच्या मुख्याधिकार्यांच्या सहीने दाखल झालेला गुन्हा आणि त्यातून वगळली गेलेली राजकीय नावे या घटनाक्रमातून सुरुवातीला सोबत असलेल्या भाजयुमोच्या शहराध्यक्षांना वगळण्यात आले होते. त्यामुळे भाजपाचे शहराध्यक्ष अॅड.श्रीराम गणपुले काहीतरी वेगळीच डाळ शिजवत असल्याचा त्यांचा समज होवून त्यांनी याबाबत सोशल माध्यमातून नाराजीही व्यक्त केली होती.

सोशल माध्यमात त्यांनी लिहिलेला प्रपंच वाचून शिवसेनेचे (ठाकरे गट) शहरप्रमुख अमर कतारी यांनी त्यांच्याशी दूरध्वनीवरुन संपर्क साधला व नेमके काय घडले याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी या दोघांत झालेल्या संभाषणातून भाजपाच्या शहराध्यक्षांनी अमरधाम प्रकरणातून एका मोठ्या अधिकार्यासह पाच राजकीय नावे वगळण्यासाठी 30 लाखांची लाच घेतल्याचा निष्कर्ष काढून 4 सप्टेंबररोजीच कतारी यांनी सोशल माध्यमात तशी पोस्ट व्हायरल केली होती. त्यानंतर 16 सप्टेंबरला प्रत्यक्ष गुन्हा दाखल झाला तेव्हा गुन्ह्यातून आठातील सहा नावे वगळली गेल्याचे व केवळ नगर अभियंता व कनिष्ठ अभियंत्यांवरच गुन्हा दाखल झाल्याचे समोर आल्यानंतर कतारी यांच्या ‘त्या’ दाव्याला बळ मिळाल्याने त्यांनी सोमवारी (ता.19) शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेवून थेट भाजपाच्या शहराध्यक्षांवर 30 लाखांची लाच घेतल्याचा गंभीर आरोपही केला. यावेळी त्यांनी भाजयुमोच्या शहराध्यक्षांशी झालेल्या त्यांच्या संवादाचे रेकॉर्डही पत्रकारांना ऐकवले.

या घटनेला 48 तास लोटायच्या आंतच शिवसेनेच्या (ठाकरे गट) शहराध्यक्षांनी भाजयुमोच्या शहराध्यक्षांच्या नावाने केलेला लाचखोरीचा आरोप खोडून काढला व उलट त्यांनाच आव्हान दिले आहे. याबाबत त्यांनी आपल्या सहीने प्रसिद्धपत्रक काढले असून त्यातून यासर्व गोष्टींवर स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला आहे. दीपेश ताटकर यांनी दिलेल्या निवेदनात ते म्हणतात की, संगमनेर शिवसेनेने (ठाकरे गट) दोन दिवसांपूर्वी माझे नाव घेत पत्रकार परिषद घेतली. मी अमुक बोललो, मी तमूक बोललो असे सांगत शहरप्रमुख कतारी यांनी माझ्या नावाचा वापर करुन भाजपच्या शहराध्यक्षांवर आरोप केले. आपल्याकडे (शिवसेना) अमरधाम प्रकरणाची सगळी कागदपत्रे व इंत्यभूत माहिीत आहे तर आपणच आपल्या सद्सद्विवेक बुद्धीने विचार करुन आपण स्वतः (अमर कतारी) अथवा आपल्या पक्षाच्या (शिवसेना) औरंगाबाद खंडपीठ किंवा पक्षाच्या व्यासपीठावरुन तक्रार का दाखल करीत नाहीत? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

या पत्रकात ताटकर पुढे म्हणतात; मी वकीलही नाही आणि मला न्यायालयीन कामाकाजाची माहिती नाही. भाजपा शहराध्यक्ष अॅड.श्रीराम गणपुले यांनी संगमनेर अमरधाम प्रकरणात जे सांगितले, तसे कामकाज केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील कामकाज कसे चालते याबाबत आपण पूर्णतः अनभिज्ञ आहोत. त्यामुळे आपण तेथे तक्रार केली की लगेच कारवाई होते असा आपला समज होता. त्यामुळे आपणास या प्रकरणातून भाजपने वगळले तर नाही ना? असा आपला गैरसमज झाला होता. या प्रकरणात पोलीस ठाण्यात घेतलेल्या जवाबात अनेकांवर आरोप होते, मात्र प्रत्यक्षात त्यांना आरोपी करण्यात आले नाही. म्हणून समोरच्या परिस्थितीनुरुप आपला गैरसमज झाला. याबाबत संगमनेर शिवसेनेचे (ठाकरे गट) शहरप्रमुख अमर कतारी यांनी दूरध्वनीवरुन आपल्याशी संपर्क केला व माझ्याशी झालेल्या संवादाचे अनेक अर्थ काढून माझ्याबद्दल गैरसमज पसरवल्याचा आरोपही ताटकर यांनी पत्रकातून केला आहे.

संगमनेरच्या अमरधाम प्रकरणात भाजपाने काय केले यापेक्षा मला वाटते की, अमर कतारी यांनी स्वतः सदर प्रकरणामध्ये उर्वरीत राहीलेल्या आरोपींवर कायदेशीर कारवाई व्हावी अशी मागणी करावी असे आपले मत आहे. समाजातील भ्रष्टाचार संपलाच पाहिजे, तो फक्त भाजपानेच काढावा असेही काही नाही. तर त्याबाबत आपण (कतारी) तक्रारदार व्हावे आणि भ्रष्टाचार करणार्यांवर वचक निर्माण करावा असे आवाहनही त्यांनी केले आहे. जर आपल्याकडे या प्रकरणाबाबत सर्व कागदपत्रे आहेत तर आपल्या म्हणण्यानुसार प्रकरण दाबण्यासाठी पैशांचा व्यवहार होत असेल तर सदर प्रकरण दाबण्यासाठी आपल्यालाही मोठी रक्कम मिळेल. आपण त्याचा अनुभव घ्यावा व त्यानंतर पत्रकार परिषद घेवून जनतेला सखोल माहिती द्यावी असे आव्हानही त्यांनी दिले आहे.

माझ्या बोलण्याला महत्त्व देण्यापेक्षा कृतीला महत्त्व द्यावे. भाजयुमोने अमरधाम प्रकरणात केलेल्या आरोपींवरील आरोप सिद्ध झाले आहेत, कारवाई सुरु आहे. परंतु या प्रकरणात काही त्रुटी दिसत असतील व इतरांना घाई झाली असेल तर त्यांनी खटला दाखल करुन तातडीने कारवाई व्हावी यासाठी शासनावर दबाव निर्माण करावा असे आव्हानही भाजयुमोचे शहराध्यक्ष दीपेश ताटकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनातून दिले आहे. आता त्यांच्या या आव्हानाला संगमनेर शहर शिवसेनेचे शहरप्रमुख अमर कतारी कसे उत्तर देतात याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

