कत्तलखान्यांवरील कारवाईतील दोघांना अखेर जामीन मंजूर! पसार असलेल्या सहाजणांमधील दोघांना शहर पोलिसांकडून अटक..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
अवघ्या राज्याला हादरवणार्‍या संगमनेरातील गोवंश कत्तलखान्यांवरील कारवाईतील दोघा आरोपींना सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे. गेल्या साडेतीन महिन्यांपासून त्यांच्यासह अन्य चौघे संगमनेरच्या कारागृहात कैद आहेत. जामीन मंजूर झालेल्या दोघांनी यापूर्वी कनिष्ठ न्यायालयांमध्ये जामीनासाठी अर्ज केले होते, मात्र ते फेटाळण्यात आल्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली. त्यांच्या जामीनअर्जावर सविस्तर सुनावणीनंतर न्यायमूर्ती विभा कंकणवाडी यांनी त्या दोघांनाही 50 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर सशर्त जामीन मंजूर केला आहे. दरम्यान या प्रकरणी फरार असलेल्या अन्य सहाजणांतील दोघांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले असून त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.गेल्या वर्षी गांधी जयंतीच्या दिनी येथील कत्तलखान्यांवरील कारवाईत अटकेत असलेल्या शाकीर उर्फ मोन्या मोहंमद शेख याच्या जामीन अर्जावरील सुनावणीत बचाव पक्षाकडून अ‍ॅड.व्ही.डी.होन यांनी जोरदार युक्तिवाद केला. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्रही सादर केल्याचे त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यासोबतच प्रत्यक्ष कारवाईच्यावेळी संबंधित आरोपी घटनास्थळी नव्हता. आरोपीचा थेट गोवंश कत्तलीशी कोणताही संबंध नसून तो केवळ कापलेल्या जनावरांचे मांस वाहून नेण्यासाठी लागणार्‍या वाहतुकीचे व्यवस्थापन करीत होता असा युक्तिवाद केला.


तो खोडून काढतांना सरकारी पक्षाचे वकील ए.एन.नागरगोजे यांनी आरोपी शाकीर शेखचा यापूर्वीच्या काही गुन्ह्यांमध्ये समावेश असल्याचे न्यायालयाला सांगताना त्याच्यावर दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यांची जंत्रीच न्यायालयासमोर मांडली. त्याच प्रमाणे संबंधित आरोपी 2018 सालच्या एका गंभीर गुन्ह्यात तेथील जिल्हा व सत्र न्यायालयाकडून मिळालेल्या जामीनावर बाहेर असतांना त्याच्याकडून सदरचा अपराध घडल्याने त्याची जामीनावर सुटका झाल्यास त्याच्याकडून गुन्हे घडण्याची शक्यता वर्तविली. मात्र न्यायालयाने सदर गुन्हेगाराची पार्श्‍वभूमी गुन्हेगारी स्वरुपाची असली तरीही प्रस्तुत प्रकरणात त्याची भूमिका विचारात घ्यावी लागेल असे सांगताना त्याचे घटनास्थळावर नसणे हा मुद्दाही विचारात घेवून त्याला जामीन मिळवण्याचा अधिकार असल्याचे सांगत त्याचा अर्ज मंजूर केला.


तर दुसरा आरोपी मुदस्सर अब्दुल उर्फ हाजी करीम कुरेशी याच्या जामीनावर बाजू मांडतांना बचाव पक्षाचे वकील एस.एस.जाधव यांनीही प्रकरणाचा तपास पूर्ण झालेला असल्याने आरोपीच्या कोठडीची आवश्यकता नसल्याचा मुद्दा मांडला. तसेच पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात त्याचा सक्रीय सहभाग दिसत नसल्याचेही त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. घटनास्थळी बंदी असलेले मांस, प्राण्यांना क्रूरतेने बांधून ठेवण्याच्या जागा व त्यांच्या कत्तलीसाठी शस्त्रे सापडली असली तरीही केवळ शारीरिक उपस्थिती सक्रिय भूमिका ठरवू शकत नाही असा जोरदार युक्तिवाद करीत आरोपी कडक अटींसह जामीनावर सुटण्यास पात्र असल्याचे सांगितले.


यावर निर्णय देतांना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातील न्यायमूर्ती श्रीमती विभा कंकणवाडी यांनी दोन्ही आरोपींना प्रत्येकी 50 हजारांच्या व्यक्तिगत जातमुचलक्यावर या प्रकरणातील पुरावे, साक्षीदार यांच्याशी कोणतीही छेडछाड न करण्याच्या, तसेच कोणताही गुन्हा न करण्याच्या अटीवर त्यांचा जामीन अर्ज मंजूर केला. तसेच आरोपींनी जामीनाच्या कालावधीत कोणताही अपराध केल्यास फौजदारी प्रक्रीया संहितेच्या कलम 439 (2) अंतर्गत जामीनअर्ज रद्द करण्याचा सरकारी पक्षाचा अधिकार अबाधित असल्याचा निर्वाळा दिला. त्यामुळे गेल्या साडेतीन महिन्यांपासून कारागृहात कैद असलेल्या सहा जणांमधून दोघांचे जामीन मंजूर झाले आहेत.


या दरम्यान पसार असलेल्या अन्य सहा आरोपींचा संगमनेर शहर पोलिसांकडून अद्यापही कसून शोध घेतला जात आहे. त्यात पोलिसांना मोठे यश मिळाले असून दाखल गुन्ह्यातील कत्तलखान्याचा चालक परवेझ हाजी कुरेशी व कमरअली गुलाम सौदागर हे दोन आरोपी पोलिसांच्या हाती लागले आहेत. यातील परवेझच्या कत्तलखान्यावरील छाप्यात साडेतीन हजार किलो गोवंशाचे मांस आढळले होते. या दोघांनाही सोमवारी न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना शुक्रवारपर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणात अटक झालेल्या आरोपींची संख्या आता आठ झाली आहे.


मागील वर्षी गांधी जयंतीच्या दिनी प्राणी संरक्षण अधिकारी यतींद्र जैन यांच्या माहितीवरुन अहमदनगर पोलिसांनी संगमनेरातील जमजम कॉलनी स्थित साखळी कत्तलखान्यांवर कारवाई केली होती. श्रीरामपूर उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या नेतृत्त्वाखाली पोलीस निरीक्षक हिरालाल पाटील, विजय करे, संगमनेर पोलीस ठाण्याचे निरीक्षक मुकुंद देशमुख या अधिकार्‍यांसह पोलिसांच्या पथकाने घातलेल्या छाप्यात वाहीद कुरेशी व मुदस्सर हाजी यांच्या वाड्यातून 12 हजार किलो गोवंश मांसासह 30 जिवंत गोवंश जनावरे व एक छोटा हत्ती टेम्पो (क्र.एम.एच.04/4846) असा एकूण 31 लाख 13 हजार 500 रुपयांचा, नवाज कुरेशी याच्या वाड्यातून 9 हजार किलो गोवंश मांसासह एक हजार किलो गोवंश मांस भरलेला आयशर कंपनीचा टेम्पो (क्र.एम.एच.03/सी.पी.8858) व 41 जिवंत गोवंश जनावरे असा एकूण 32 लाख 97 हजार 500 रुपयांचा,


जहीर कुरेशी याच्या वाड्यातून 11 लाख रुपयांचे 5 हजार 500 किलो तर परवेझ कुरेशी याच्या वाड्यातून सात लाख रुपये किंमतीचे 3 हजार 500 किलो गोवंशाचे मांस हस्तगत केले होते. यावेळी गोवंशाचे मांस वाहून नेण्यासाठी कत्तलखान्यांच्या परिसरात उभे करण्यात आलेले आयशर कंपनीचे दोन टेम्पो (क्र.एम.एच.04/जी.आर.0090) व (क्र.एम.एच.17/बी.वाय.2478) दोघांची मिळून एकूण किंमत 18 लाख रुपये असा एकूण एक कोटीहून अधिक मूल्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. या प्रकरणी सहाय्यक फौजदार रफियोद्दीन निजामोद्दीन शेख यांच्या फिर्यादीवरुन वरील पाच जणांसह एकूण बारा जणांवर विविध कलमांसह महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील एकूण सहा जणांना घटनेनंतर अटक करण्यात आली होती, तर उर्वरीत सहा आरोपी पसार होते. त्यातील दोघांना गेल्या दोन दिवसांत अटक करण्यात आली असून त्यांना शुक्रवारपर्यंत (ता.14) पोलीस कोठडीत पाठवण्यात आले आहे. या प्रकरणात आत्तापर्यंत आठ जणांना अटक झाली असून त्यातील दोघे जामीनावर सुटले आहेत तर चौघे अद्यापही पसार आहेत.


गांधी जयंतीच्या दिवशी झालेल्या या कारवाईत अहमदनगर पोलिसांनी 1 कोटी 4 लाख 50 हजार 50 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यासह बारा जणांवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले होते. त्यातील सहा जणांना कारवाईदरम्यान अटक करण्यात आली होती. त्यामुळे गेल्या साडेतीन महिन्यांपासून ते कारागृहात कैद होते. आता त्यांचा जामीन अर्ज मंजूर झाला असतांना या प्रकरणात पसार असलेल्या सहा जणांतील दोघे पोलिसांच्या हाती लागले आहेत. त्यामुळे दोघांची जामीनावर सुटका होतांना त्यांच्या जागी नवीन दोन आरोपी कारागृहात पोहोचले आहेत.

Visits: 257 Today: 3 Total: 1418730

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *