कोविड नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर कोपरगाव शहर पोलिसांची कारवाई गेल्या तीन दिवसांत विविध गुन्ह्यांप्रकरणी 35 हजार रुपयांचा दंड केला वसूल

नायक वृत्तसेवा, कोपरगाव
कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने निर्गमित केलेल्या नियमांची कोपरगाव शहर पोलिसांकडून कडक अंमलबजावणी होत आहे. गेल्या तीन दिवसांत (ता.28, 29 व 30) कोविड नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी तब्बल 34 हजार 900 रुपयांचा दंड वसूल केला आहे. अद्यापही कारवाई सुरूच असून, नागरिकांची नियमांचे पालन करुन सहकार्य करण्याचे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड यांनी केले आहे.

कोविडची दुसरी लाट ओसरु लागली असली तरी तिसर्‍या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता नियमांचे पालन करणे हाच सुरक्षित उपाय आहे. त्यासाठी शासनाने पुन्हा पंधरा जूनपर्यंत कठोर निर्बंधामध्ये वाढ केली आहे. याची प्रशासनातील विविध विभाग अंमलबजावणी करत असताना पोलीस महत्त्वाची भूमिका निभावत आहे. यानुसार कोपरगाव शहर पोलिसांनी कारवाईचा सिलसिला सुरू ठेवून उल्लंघन करणार्‍यांवर गुन्हे दाखल करुन दंड वसूल करत आहे. यामध्ये शुक्रवारी (ता.28) विनामास्क फिरणार्‍या दोघांवर कारवाई करुन एक हजार रुपयांचा दंड, विहित वेळेपेक्षा जास्त वेळ आस्थापना चालू ठेवल्याप्रकरणी तिघांकडून 3 हजार रुपयांचा दंड, सुरक्षित अंतराचे पालन न केल्याप्रकरणी 41 जणांवर कारवाई करुन 8 हजार 200 रुपयांचा दंड तर कलम 188 नुसार दोघांवर गुन्हा दाखल करुन एकूण 12 हजार 200 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच 56 जणांच्या आरटीपीआर चाचण्या केल्या आहेत.

शुक्रवारीही कारवाई सुरूच ठेवून विनामास्क फिरणार्‍या सात जणांकडून 3 हजार 500 रुपयांचा दंड, सुरक्षित अंतर न ठेवल्याप्रकरणी 31 जणांकडून 6 हजार 200 रुपयांचा दंड तर विना ई-पास प्रवास केल्याप्रकरणी 1 हजार रुपयांचा दंड असा एकूण 10 हजार 700 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच उपकारागृहातील 70 कैद्यांची रॅपिड अँटीजेन तपासणी केली असता सर्व निष्कर्ष निगेटिव्ह आले आहेत. या कारवाईत सातत्य ठेवून रविवारी केलेल्या कारवाईत विना मास्क फिरणार्‍या आठ जणांकडून 4 हजार रुपयांचा दंड, विहित वेळेपेक्षा जास्त वेळ आस्थापना चालू ठेवल्याप्रकरणी दोघांकडून 4 हजार रुपयांचा दंड, तर सुरक्षित अंतराचे पालन न केल्याप्रकरणी 20 जणांकडून 4 हजार रुपयांचा दंड असा एकूण 12 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. एकूणच संपूर्ण कारवाईत आत्तापर्यंत पोलिसांनी 34 हजार 900 रुपयांचा दंड वसूल केला असून, अद्यापही कारवाई सुरूच राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी कोविड नियमांचे पालन करुन प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन सहा.पोलीस निरीक्षक आव्हाड यांसह शहर पोलिसांनी केले आहे.

Visits: 178 Today: 1 Total: 2062420

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *