श्रावणातही जाणताराजा मैदानावर तळीरामांचा मेळा! शहर पोलिसांचा अचानक छापा; मद्य रिचवणार्‍यांची एकच पळापळ..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
परमिटरुममध्ये बसून दारु पिण्यासाठी अतिरीक्त शुल्कांसह ओळख उघड होण्याचीही भीती असल्याने गेल्याकाही वर्षांपासून सार्वजनिक आडोशाच्या जागांवर तळीरामांचा वावर वाढला आहे. त्यातही संगमनेरातील जाणताराजा मैदानासह प्रवरा आणि म्हाळुंगी नद्यांच्या काठांवरही तळीरामांचे मेळे भरु लागल्याने त्यातून परस्परांमध्ये वादावादी होवून परिसरातील वातावरणही दुषित होत आहे. सार्वजनिक ठिकाणांवर बसून बिनधास्त मद्य रिचवणार्‍यांवर कठोर कारवाई व्हावी अशी वारंवार मागणीही होत असते. त्याला अखेर प्रतिसाद देत शहर पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळनंतर अशा ठिकाणांवर अचानक छापे घालून नऊजणांवर महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये कारवाई केली आहे. या छापासत्रादरम्यानच आडोशाचा फायदा घेत ‘कल्याण’ मटका चालवणार्‍यासह चक्क पोलीस ठाण्याच्या परिसरातच हातात कोयता घेवून दहशत निर्माण करणार्‍या एकाच्या मुसक्याही आवळण्यात आल्या आहेत. या कारवाईने परिसरात राहणार्‍यांनी समाधान व्यक्त करतानाच कारवाईत सातत्याची अपेक्षाही व्यक्त केली आहे.


याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार यातील पहिली कारवाई नेहरु चौकातील एका बोळाच्या आडोशाला सुरु असलेल्या ‘कल्याण’ नावाचा मटका चालवणार्‍या ठिकाणावर करण्यात आली. या छाप्यात आकडा घेणार्‍या अर्जुन रुपचंद पवार (वय 39, रा.नवघर गल्ली) याच्यावर महाराष्ट्र जुगार कायद्यानुसार कारवाई करीत त्याच्या ताब्यातून साडेआठशे रुपयांच्या रोकडसह आकडा घेण्याचे साहीत्य जप्त करण्यात आले. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल हरिश्‍चंद्र बांडे यांनी फिर्याद दिली आहे. या कारवाईनंतर पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी आपला मोर्चा सार्वजनिक ठिकाणांचा नशेखोरीसाठी वापर करणार्‍यांच्या दिशेने वळवला.


शासकीय वाहन पाहून नशेबहाद्दर गायब होवू नयेत यासाठी पोलिसांनी आपल्या वाहनावरील दिवा बंद करुन संगमनेर टेक्सटाईलजवळील रस्त्याने व्हाया बालभवनजवळून थेट जाणताराजा मैदानावर प्रवेश केला. रात्री आठचा सुमार असल्याने संपूर्ण मैदानावर काळोख दाटलेला होता. त्यात काही ठिकाणी दोघे-तिघे अशा गटांनी मांड्या घालून बसल्याचे आणि नशेत तर्राट होवून मोठमोठ्याने आरडाओरड आणि शिवीगाळ करीत असल्याचे पोलिसांना दिसले. अशा गटांच्या जवळ वाहन नेत पोलिसांनी एकाचवेळी चारही दिशेने धाव घेण्यास सुरुवात करताच भानावर आलेल्या तळीरामांची पळापळ सुरु झाली, मात्र त्यातून त्यांना वाचता आले नाही. पोलिसांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनचरित्र महानाट्याच्या रुपाने पाहिलेल्या आणि त्यांच्याच नावाने ओळखल्या जाणार्‍या या मैदानावर दारुचा नशा करुन शांतता भंग करणार्‍या नऊजणांना ताब्यात घेतले.


त्यात संदीप रघुनाथ रिंधे (वय 29), साहील बाबासाहेब वर्पे (वय 25, दोघेही रा.कनोली), अक्षय सुनील दाणी (वय 26, रा.रंगारगल्ली), यशवंत भाऊसाहेब हासे (वय 31, रा.चिखली), ललित शरद शिंपी (वय 35, रा.अच्युतनगर) व अविनाश अशोक ओझा (वय 38, रा.इंदिरानगर) अशा सहाजणांवर मुंबई दारुबंदी कायद्यान्वये कारवाई केली. त्यानंतर पोलिसांनी आपला मोर्चा पंचवटीजवळील फास्टफूडच्या हातगाड्यांकडे वळवला. यावेळी पोलिसांना जब्बार नवाब शेख (वय 37, रा.अलकानगर), बाळासाहेब सयाजी भुजबळ (वय 53, रा.इंदिरानगर) व बंडू आबा चितळे (वय 38, रा.मालदाड रोड) अशा तिघांसह एकूण नऊजणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करीत त्यांना दंडाधिकार्‍यांसमोर हजर राहण्याच्या नोटीसा बजावल्या.


सदर प्रकरणात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरु असतानाच रात्री अकराच्या सुमारास पोलिसांना शहर पोलीस ठाण्याच्या समोरच असलेल्या संजय गांधीनगर वसाहतीत एकजण हातात कोयता घेवून दहशत निर्माण करीत असल्याचे समजले. त्यानुसार पोलिसांच्या एका पथकाने परिसरात जावून पाहीले असता मनोज अमृत खजुरे (वय 41, रा.संजय गांधीनगर) हा इसम हातात कोयता घेवून शिवीगाळ व धमक्या देत असल्याचे दिसून आले. त्याला शस्त्रासह ताब्यात घेत कॉन्स्टेबल अजित कुर्‍हे यांच्या तक्रारीवरुन शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली.


जाणताराजा मैदान व पंचवटी हॉटेलच्या परिसरात करण्यात आलेल्या कारवाईत पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्यासह पोलीस कॉन्स्टेबल आत्माराम पवार, हरिश्‍चंद्र बांडे, विशाल करपे व सागर नागरे यांचा समावेश होता. या कारवाईने वाईन शॉपमधून कमाल विक्री दराने मद्य घेवून सार्वजनिक ठिकाणांवर रिचवणार्‍या तळीरामांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी अशाप्रकारच्या कारवायांमध्ये सातत्य ठेवल्यास सार्वजनिक ठिकाणी सुरु असलेल्या अशा प्रकारांना आळा बसेल अशी अपेक्षाही नागरिकांकडून व्यक्त करण्यात आली आहे.


सध्या श्रावणमास असल्याने शहर व परिसरातील बिअरबार व वाईन शॉपमधील गर्दी काही प्रमाणात घटली आहे. अशावेळी शहर पोलिसांनी जाणताराजा मैदान आणि पंचवटी जवळील खाद्यान्नाच्या हातगाडीवर कारवाई करीत नऊजणांवर कायद्याचा धाक निर्माण केला. या कारवाईत 25 ते 38 वयोगटातील आठजणांचा समावेश आहे. ऐन श्रावणमासात झालेल्या कारवाईतून आजची तरुणाई किती वेगाने नशेच्या आहारी जात आहे याचेही उदाहरण उभे राहीले आहे. पोलिसांनी केलेल्या या कारवाईतून ताब्यात घेतलेल्या नऊजणांवर अटकेची कारवाई झाली नसली तरीही या सर्वांना रात्रभर पोलीस ठाण्यात बसवण्यात आले होते. त्यांच्या पालकांनी ‘त्या’ रात्री आपली मुलं कोठे होती? याची त्यांच्याकडे विचारणा करण्याची आणि त्यांना वेळीच यापासून परावृत्त करण्याची गरज आहे.

Visits: 405 Today: 3 Total: 1106097

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *